Tuesday, 11 May 2021

शिवाजी विद्यापीठाच्या इनक्युबेशन केंद्रास

राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘उदयोन्मुख’ दर्जा

५० लाख रुपयांचा निधी मंजूर






कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिसला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून उदयोन्मुख केंद्राचा दर्जा प्राप्त झाला असून त्याअंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती केंद्राचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख यांनी दिली आहे.

डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून राज्यातील विद्यापीठातील नवोपक्रम केंद्रांच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. संस्थेच्या आढावा बैठकीमध्ये विविध विद्यापीठांचे बिगिनर्स (प्राथमिक), इमर्जिंग (उदयोन्मुख) आणि लीडर (नेतृत्वकर्ता) अशी विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये उदयोन्मुख प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

याअंतर्गत शिवाजी विद्यापीठास दोन टप्प्यात मिळून एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. याअंतर्गत नवीन स्टार्टअप उपक्रमांची सुरवात, विविध कार्यक्रम, कार्यशाळा, हॅकेथॉन इत्यादी उपक्रमांचे आयोजन, नवीन सहकार्य संधींचे विकसन, नवीन मेंटॉर्सना प्रशिक्षण, रोजगार निर्मितीस प्रोत्साहन आणि स्टार्टअप्सना बाह्य संस्थांकडून निधीप्राप्तीस प्रोत्साहन इत्यादी उपक्रम केंद्राकडून राबविण्यात येणार आहेत.

शिवाजी विद्यापीठास महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून लाभलेल्या दर्जाबद्दल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस स्थापन करण्यामागे विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील नवकल्पना निर्माण करणाऱ्या, काही वेगळ्या संकल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या युवकांना, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. राज्य नवोपक्रम संस्थेकडून प्राप्त झालेला दर्जा आणि निधी यामुळे अशा नवसंकल्पनांना लॅब टू लँड अँड टू मार्केट असे मूर्त स्वरुप देणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात नवोपक्रम विकास व प्रोत्साहनाचे नियोजन केंद्रामार्फत करण्यात येईल.

No comments:

Post a Comment