कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: येथील प्रसिद्ध विज्ञान
लेखक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नेताजी तथा व्ही.एन. शिंदे यांना
मराठी विज्ञान परिषदेकडून प्रतिष्ठेचा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार-२०२४ जाहीर
करण्यात आला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी मुंबई येथे पुरस्कार प्रदान सोहळा होईल. परिषदेचे
कार्यवाह प्रा. भालचंद्र भणगे यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात
विज्ञान प्रसार व जागृतीच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित मराठी विज्ञान
परिषदेतर्फे समाजात विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता किमान
दहा वर्षे विविध प्रकारे कार्य करणाऱ्या, पण ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या
व्यक्तीला सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते. सन २०२४च्या
पुरस्कारासाठी डॉ. व्ही. एन. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. रुपये २५ हजार आणि
सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. २८ एप्रिल रोजी होणाऱ्या मराठी विज्ञान
परिषदेच्या ५८व्या वर्धापन दिन कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात
येईल. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर प्रमुख पाहुणे असतील, तर
परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील.
डॉ. शिंदे हे
गेली अनेक वर्षे विज्ञान लेखनाच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रसार व जागृतीचे कार्य
करीत आहेत. एककांचे मानकरी, हिरव्या बोटांचे किमयागार, असे घडले भारतीय
शास्त्रज्ञ, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, एककांचे इतर मानकरी आणि
कृषीक्रांतीचे शिलेदार ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यासाठी डॉ. शिंदे
यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशन
(पुणे) यांचा मो.वा. चिपळोणकर पुरस्कार, मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा कै.
अशोक कोरे स्मृती पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कृ.गो. सूर्यवंशी पुरस्कार, एन्वायर्नमेंट कॉन्झर्वेशन अँड रिसर्च
ऑर्गनायझेशनचा वसुंधरा पुरस्कार तसेच किर्लोस्कर समूहाचा किर्लोस्कर वसुंधरा
सन्मान पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. शिंदे यांच्या विज्ञान प्रसार कार्याचा गौरव: कुलगुरू डॉ. शिर्के
कुलसचिव डॉ.
शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी अभिनंदनाचे पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. ‘डॉ. शिंदे गेली दहा वर्षांहून अधिक काळ आपली लेखणी, वाणी आणि प्रत्यक्ष कार्य या माध्यमातून विज्ञानविषयक
जागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे वैज्ञानिक कार्य स्तुत्य स्वरुपाचे आहे. हा
पुरस्कार त्यांच्या या कार्याचा गौरव आहे. शिवाजी विद्यापीठाचा परिसर ही त्यांच्या
जल, वनस्पती आणि विज्ञानविषयक कार्यासाठीची प्रयोगशाळाच आहे. त्यामुळे विद्यापीठास
त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. यापुढील काळातही ते विज्ञान प्रसाराच्या
क्षेत्रातील प्रबोधनाचे कार्य निरंतर करीत राहतील आणि स्वतःबरोबर विद्यापीठाचे
नावही उज्ज्वल करतील,’ असा विश्वास कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केला.
यावेळी
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर
डेळेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment