डॉ. रवींद्र ठाकूर |
शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' वाहिनीवरुन महात्मा फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान देताना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर |
कोल्हापूर, दि. ११
एप्रिल: महात्मा जोतीराव फुले हे प्रखर बुद्धीवादी लेखक, साहित्यिक होते; मात्र, त्यांचा कोणीही
साहित्यिक म्हणून उल्लेख केला नाही, हे वेदनादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ
साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे फुले, शाहू, आंबेडकर सप्ताह
साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज सकाळी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने
विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरून डॉ. ठाकूर यांचे ‘महात्मा फुले: व्यक्ती आणि वाङमय’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात
आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. ठाकूर म्हणाले,
महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यात विपुल लेखन केले. अखंड काव्यरचना, ‘तृतीय रत्न’सारखे नाटक, शेतकऱ्याचा
असूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी यांसारखे ग्रंथ, पोवाडे अशी महत्त्वपूर्ण
साहित्यनिर्मिती केली. सत्सारसारखे नियतकालिक काढून पत्रकारिताही केली. मात्र
त्यांना या समाजाने साहित्यिक म्हणून मान्यता दिली नाही. ते प्रखर बुद्धीवादी
होते. त्यांच्या विचारधारेत अंधश्रद्धेला थारा नाही. त्यांनी वर्णवर्चस्ववाद,
जातिश्रेष्ठत्वाची मानसिकता यांविरुद्ध या बुद्धीवादाच्या बळावर रान उठविले.
विद्येपासून वंचित समाजाला विद्यार्जनाचा मार्ग दाखविला. त्यांनी जसा सामाजिक विषमतेला
विरोध केला, तसाच आत्माही नाकारला. त्यांनी धार्मिक कर्मकांडांपेक्षा विचारांना
महत्त्व दिले.
डॉ. ठाकूर म्हणाले, इंग्रजांनी
बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली म्हणून त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले, तर
त्यांना इंग्रजधार्जिणे ठरविण्यात आले. हिंदू धर्मातील विषमतावादी, अंधश्रद्धा
पसरविणाऱ्या चालीरितींना विरोध केला, म्हणून ब्राह्मणद्वेष्टेही ठरविण्यात आले.
प्रत्यक्षात फुले ना इंग्रजधार्जिणे होते, ना ब्राह्मणद्वेष्टे. ‘ख्रिस्त, महंमद, मांग
ब्राह्मणांसी। धरावे पोटाशी। बंधुपरी।।’ असे सांगणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे कसे असू शकतील, असा प्रश्न ठाकूर यांनी
उपस्थित केला.
महात्मा फुले यांच्या
विचार व कार्याकडे अभ्यासकांचे, साहित्यिकांचे लक्ष जाऊ लागले आहे. त्यांच्या
साहित्याविषयी संशोधन, लेखन होऊ लागले आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचेही डॉ.
ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन करून
आभार मानले.
No comments:
Post a Comment