Thursday 25 April 2024

डॉ. प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारिता व्रत आणि व्यवहाराच्या संतुलनाचे प्रतीक: डॉ. अनिल काकोडकर

 पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी (डावीकडून) डॉ. बाबासाहेब खोत, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अरुण कणबरकर.


शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर. मंचावर (डावीकडून) डॉ. बाबासाहेब खोत, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अरूण कणबरकर

शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर समारंभात बोलताना दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव

(प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)





कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारिता म्हणजे व्रत आणि प्रामाणिक व्यवहार यांच्या संतुलनाचे मूर्तीमंत उदाहरण तथा प्रतीक आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२४ दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना डॉ. काकोडकर यांच्या हस्ते आज राजर्षी शाहू सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. काकोडकर यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ आणि एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी पद्मश्री डॉ. जाधव यांच्या सिंहायन या गौरव ग्रंथातील प्राचार्य कणबरकर यांच्या लेखाचा दाखला देऊन डॉ. काकोडकर म्हणाले, डॉ. जाधव यांनी व्रत आणि प्रामाणिक व्यवहार यांची सांगड घालून पत्रकारिता केल्याचे प्रतिपादन प्राचार्य कणबरकर यांनी केले आहे. यावरुन शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या नावे असलेल्या पुरस्कारासाठी डॉ. जाधव यांची केलेली निवड अत्यंत सार्थ आहे, याची प्रचिती येते. पत्रकारितेमध्ये प्रबोधनाचे कार्य उच्च मानून अन्यायग्रस्तांसाठी आधारस्तंभ म्हणून तिचा वापर त्यांनी केला. लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. डॉ. जाधव यांच्या वक्तव्यातूनच त्यांच्या वैचारिक, तात्त्विक आणि मानसिक उंचीची झलक पाहावयास मिळाली, असेही ते म्हणाले.

डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, प्रगल्भ समाजव्यवस्थेमध्ये दर्जेदार संस्था, उत्तम पायाभूत सोयीसुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि चांगले कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन या चार बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानच असते. त्यामध्ये भलेबुरेपणाची चर्चा गैरलागू असते. वापरणारे त्याचा वापर कोणत्या दिशेने करतात, यावर ते अवलंबून असते. म्हणूनच प्रगल्भ समाजामधील जीवनमूल्यांशी प्रामाणिकता, पाशवी वृत्तीवरील नियंत्रण, त्याच्यामधील मूल्यसंवर्धनाची क्षमता आणि सामाजिक जडणघडणीचा साकल्याने विचार या बाबी तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराला प्रेरणा देतात. शोषणविरहित आणि सर्वांचे सक्षमीकरण अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर होणे चांगल्या समाजनिर्मितीसाठी आवश्यक आहे. त्यात शिक्षण आणि समाज प्रबोधनाचे महत्त्व मोठे आहे.

हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेचा; पुढारीच्या वाचकाचा: डॉ. प्रतापसिंह जाधव

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाने प्रदान केलेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेचा तसेच पुढारीच्या वाचकाचा असल्याचे सुरवातीलाच सांगितले आणि त्यांच्या वतीने आपण अत्यंत विनम्रतेने पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले. प्राचार्य कणबरकर यांच्याशी आपला अतिशय जवळचा स्नेह होता, त्यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षणाला समर्पित होते. समाजाला शिक्षण देण्यासाठीच त्यांनी आपली लेखणी आणि वाणी वापरल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणामध्ये त्यांनी ज्ञानाचे कालातीत महत्त्व विषद केले. ते म्हणाले, आजच्या कालखंडात बौद्धिक संपदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भौतिक संपत्ती लुटली जाऊ शकते, मात्र बौद्धिक संपत्ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यामुळेच ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. शिक्षक हे वर्गाला शिकवितात, मात्र संपादक-पत्रकार समाजाला शिकवितात. या शिक्षण परंपरेचा आपण आदर करायला हवा. भारताला नालंदा, तक्षशीला विद्यापीठांची प्राचीन शैक्षणिक-सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. तिचा मला नितांत अभिमान आहे. आपला साक्षरतेचा दर ७४ टक्क्यांपर्यंत गेला असला तरी अद्याप ४३ कोटी जनता अशिक्षित आहे. त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे, कारण शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. कोठारी आयोगाने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के इतका खर्च शिक्षणावर करण्याची शिफारस केली होती, मात्र अद्याप तिची अंमलबजावणी केली गेलेली नाही. ती व्हायला हवी, असे त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव पुढे म्हणाले, राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे. कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही. सर्वसामान्य नागरिकापेक्षा कोणतेही अतिरिक्त अधिकार पत्रकारांना नाहीत. तथापि, निकोप पत्रकारितेची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांमध्ये सुसंवादाचा मोठा अभाव निर्माण झाल्यामुळे पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी वाढली आहे. साहित्य आणि पत्रकारितेमध्ये समाजाचे प्रतिबिंब आढळते. साहित्यिकाकडे अभिव्यक्तीसाठी वेळ असतो, पत्रकाराकडे मात्र नसतो. त्यामुळे साहित्यिकाच्याही पुढे दोन पावले तो असतो. त्यामुळे समाजबदलाचा कानोसा त्याला लगोलग घेता येतो. उद्योगपती आणि राजकारणी या दोन शक्ती प्रसारमाध्यमांचा ताबा घेऊ लागल्या आहेत. हे एक मोठे आव्हान आज पत्रकारितेसमोर उभे ठाकले आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचेही आव्हान आहे. मात्र, तंत्रज्ञान कितीही बदलले तरी पत्रकारितेचा सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा जो आत्मा आहे, तो मात्र कदापि बदलणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कणबरकर यांच्या नावे शिष्यवृत्तीसाठी देणगी

यावेळी डॉ. जाधव यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेमध्ये स्वतःकडील तितक्याच रकमेची भर घालून त्यामधून प्राचार्य डॉ. कणबरकर यांच्या नावे विद्यापीठाने शिष्यवृत्ती सुरू करावी, असा प्रस्ताव ठेवला. त्याचा स्वीकार करून सदर प्रस्ताव अधिकार मंडलांसमोर घेऊन जाण्याची ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कणबरकर यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वाच्या नावचा पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वास प्रदान करताना विद्यापीठास मोठा आनंद होतो आहे. विद्यापीठात ललितकला विभागाच्या स्थापनेबाबत कुलगुरू कणबरकर यांच्या कारकीर्दीत त्यांच्याच अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात डॉ. जाधव यांनी पुढाकार घेतला. पुढे त्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच आले आणि विद्यापीठात ललितकला विभागाची स्थापना झाली. आज विद्यापीठात पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाची अत्यंत देखणी वास्तू उभी राहिली आहे. त्यासाठीचा पाठपुरावा आणि शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठीचे प्रयत्न डॉ. जाधव यांनी केले आहेत. सात कोटी रुपयांहून अधिक निधी त्यामधून मिळाला. देशातील पत्रकारितेच्या या पहिल्या अध्यासनात डिजीटल पत्रकारितेसह बी.ए. इन फिल्म मेकिंग, कम्युनिटी रेडिओ असे आधुनिक अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरू होत आहेत, याचे संपूर्ण श्रेय डॉ. जाधव यांनाच जाते. गेल्या चाळीस वर्षांत शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांची प्रचिती देणारे हे प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भालबा विभूते यांनी मानपत्राचे वाचन केले. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. जाधव यांचा सत्कार केला. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास दै. पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, डॉ. वसंत भोसले, डॉ. नमिता खोत, डॉ. अंजली साबळे यांच्यासह कणबरकर कुटुंबिय, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, दै. पुढारीचे अधिकारी-कर्मचारी, उद्योग-व्यवसाय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment