Wednesday, 10 April 2024

फुले, शाहू, आंबेडकरांकडून देशाला समाजबदलाचा कृतीशील कार्यक्रम: सुधाकर गायकवाड

 शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे सुधाकर गायकवाड लिखित 'दलित सौंदर्यशास्त्र' ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) प्रा. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, श्री. गायकवाड, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. देवानंद सोनटक्के व डॉ. सचिन गरूड

शिवाजी विद्यापीठात फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधाकर गायकवाड.

शिवाजी विद्यापीठात फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधाकर गायकवाड. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. १० एप्रिल: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रयीने विषमतावादी मूल्यांना नाकारून समाजबदलासाठीचा कृतीशील कार्यक्रम देऊन समता प्रस्थापनेच्या दिशेने समाजाला नेण्याचे काम केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन आज राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री. गायकवाड लिखित दलित सौंदर्यशास्त्र या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. गायकवाड म्हणाले, तत्कालीन प्रचलित समाजव्यवस्था ही विषमतेला धर्मसत्तेचा आधार देऊन तिचे समर्थन करीत होती. या मानवी वर्तन नियंत्रित करणाऱ्या विषमताधारित समाजव्यवस्थेला आव्हान देऊन नाकारण्याचे काम बुद्धानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी केले. भौतिक बदलांपेक्षा माणसाच्या माणसाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात, वर्तनात आणि निकषांत बदल करण्यासाठी त्यांनी कृतीशील कार्य केले. सामाजिक न्यायाची संकल्पना समाजाच्या मानसिक व बौद्धिक रचनेत बदल घडविण्याचा प्रयत्न करते. या न्यायाचा पुरस्कार त्यांनी केला. या चिकित्सेतूनच फुले सार्वजनिक सत्यधर्माकडे तर बाबासाहेब बुद्धाकडे वळले. शाहू महाराजांनी आपल्या राज्यसत्तेचा वापर समाजरचनेतील अधिसत्तेला आव्हान देण्यासाठी केला आणि त्याद्वारे त्यांनी लोकांना त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाटप केले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, आजच्या समाजाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी काम करणे अपेक्षित आहे. ते करीत असताना फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी वाटचाल केल्यास प्रगती होईल.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्यामध्ये स्त्री सन्मान, शेतकऱ्यांप्रती आस्था आणि शिक्षण हे समान धागे आहेत. महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना इतके ज्ञानवंत केले की त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. संस्कृतमध्ये बुधभूषणसारखा महाग्रंथ लिहीण्याइतके पांडित्य त्यांनी प्राप्त केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांनी महाराष्ट्रात खूप मोठी वैचारिक क्रांती डवून आणली. त्या क्रांतीला कृतीशीलतेची मोठी जोड होती. बुद्धीवादाचा वापर मानवी जीवन सुकर व सुखकर होण्यासाठी त्यांनी केला, हे त्यांच्या कार्याचे मोठे वेगळेपण ठरते. बुद्धीच्या वापराने मानवी वर्तन नियंत्रित वा अनियंत्रित होत असते. या बुद्धीचा नियंत्रित वापर सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून करणे आवश्यक आहे, ही प्रेरणा या त्रयीकडून आपणास मिळत राहते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर गायकवाड लिखित दलित सौंदर्यशास्त्र या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथावर झालेल्या चर्चेत डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. सचिन गरूड आणि प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपा श्रावस्ती यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. कैलास सोनवणे, उपकुलसचिव विलास सोयम यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment