Friday, 13 March 2026

राजकीय व्यवहार विसंगतीवर राज्यशास्त्रीय मंथन व्हावे: डॉ. पी.डी. देवरे

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय चर्चासत्राला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय राज्यशास्त्र चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. पी.डी. देवरे.


शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय राज्यशास्त्र चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. पी.डी. देवरे. मंचावर (डावीकडून) डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अरुण चव्हाण, डॉ. भारती पाटील, डॉ. रविंद्र भणगे व डॉ. शिरीषकुमार पवार.

डॉ. रविंद्र भणगे यांच्या 'भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. पी.डी. देवरे. सोबत (डावीकडून) डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अरुण चव्हाण, डॉ. भारती पाटील, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. भणगे व डॉ. शिरीषकुमार पवार.

(राज्यशास्त्र राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन: लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १३ मार्च: राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये वाढत चाललेली विसंगती समजून घेणे आणि त्यावर नव्या पद्धतीने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. पी. डी. देवरे यांनी आज येथे केले. ‘राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहांचे चर्चाविश्व’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बीजभाषक म्हणून बोलताना देवरे यांनी बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत विचारप्रवाहांची नवी मांडणी करण्याची गरज अधोरेखित केली.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आज उद्घाटन झाले. मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. प्राचार्य व्ही.एम. पाटील उद्घाटन समारंभाचे तर डॉ. भारती पाटील बीजभाषण सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. देवरे म्हणाले, विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्राचे सिद्धांत, संकल्पना आणि विचारधारा शिकविल्या जातात; मात्र प्रत्यक्ष राजकारण आणि समाजव्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसून येते. ही तफावत समजून घेऊन विद्यार्थ्यांना आणि समाजाला वास्तव परिस्थिती समजावून सांगणे ही राज्यशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांची जबाबदारी आहे. विचारसरणींच्या इतिहासात कोणताही विचार कायमस्वरूपी संपत नाही; उलट एका विचारातून दुसरा विचार जन्म घेतो. हेगेलने मांडलेली ‘थिसिस-अँटीथिसिस-सिंथेसिस’ ही प्रक्रिया समाजातील वैचारिक परिवर्तन सातत्याने घडवत राहते, असे त्यांनी नमूद केले.

समाजातील बदल, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि माहितीचा प्रस्फोट यामुळे नव्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगताना डॉ. देवरे म्हणाले, मोबाईल, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या प्रभावामुळे माहिती सहज उपलब्ध झाली असली तरी ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण झाला आहे का, हा प्रश्न आहे. सोशल मीडियाद्वारे कृत्रिम आणि बनावट विचारनिर्मिती होण्याचा धोका वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

विकासाच्या प्रक्रियेतील विसंगतींकडे लक्ष वेधताना डॉ. देवरे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाढत असतानाही समाजातील मोठा वर्ग अद्याप मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहे. भौतिक विकास झाला असला तरी त्याची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोणतीही विचारसरणी समाजाच्या वास्तव परिस्थितीपासून वेगळी असू शकत नाही. मार्क्सवादाचा प्रभाव जगभर पडला असला तरी प्रत्येक समाजाच्या परिस्थितीनुसार त्यात बदल झाले. भारताच्या संदर्भात शरद पाटील यांनी मार्क्सवादी विचारांसोबत फुले-आंबेडकरांच्या विचारांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

विद्यापीठे आणि महाविद्यालये ही संवादाची केंद्रे म्हणून अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ. देवरे म्हणाले, व्यवस्था आणि विचार यांच्यातील संघर्षातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नव्या पद्धतीने विचार करणे ही आजच्या राज्यशास्त्रज्ञांची जबाबदारी असून लोकशाहीची वाटचाल समजून घेताना तिच्यातील विसंगती आणि नव्याने उद्भवणारे प्रश्न यावर बौद्धिक नेतृत्वाने मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. समाजातील वैचारिक वारसा जपून त्याला नव्या संदर्भात पुढे नेण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, अन्यथा लोकशाहीची वैचारिक पायाभरणी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

उद्घाटनपर मनोगतात बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करीत असताना त्या विकासाला मानवी चेहरा देण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या बळावरच हा विकास शक्य आहे. त्यासाठी राज्यशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय धोरणांचा मिलाफ आवश्यक आहे.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, राजकारणाचा सार्वत्रिक आणि सर्वस्तरीय ऱ्हास, नैतिक पतन या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्रीय संकल्पना मुळातून समजून घेणे आणि त्यांचे सातत्याने अधोरेखन करणे आवश्यक आहे. आदर्श राज्यनिर्मितीसाठी अर्थकारण समजून घेतल्याखेरीज राजकारण समजून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता माहिती देणारे न होता विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक होऊन त्यांचे ज्ञानवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही.एम पाटील म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा राज्यशास्त्रीय विचारप्रणाली आणि प्रवाह यांच्यावर मोठा प्रभाव पडला आहे. त्या प्रभावांचा आणि प्रवाहांचा वेध घेण्याच्या दृष्टीने सदरचे चर्चासत्र उपयुक्त भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र भणगे यांनी लिहीलेल्या भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सुरवातीला डॉ. भणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. दत्ता सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. श्रीराम पवार, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. बी.बी. पाटील, सिकंदर जमादार यांच्यासह परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्राचे अध्यापक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आज दिवसभरात झालेल्या उर्वरित सत्रांपैकी एका सत्रात 'भारतीय राजकीय विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता' या विषयावर डॉ. अशोक चौसाळकर यांनी मार्गदर्शन केले. तर, पुढील सत्रात डॉ. के. के. उर्फ काशिनाथ कावळेकर स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. जयदेव डोळे यांनी 'सामाजिक चळवळ आणि राजकारण' या विषयावर विचार प्रकट केले.

Monday, 9 March 2026

महिलांना संधीचा अभाव ही गंभीर सामाजिक समस्या: डॉ. जगन्नाथ पाटील

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेत बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. प्रविण पाटील, डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. भारती पाटील, डॉ. विजय चोरमारे आदी.

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेत बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील. 

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेत बीजभाषण करताना डॉ. जगन्नाथ पाटील. 


(आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ९ मार्च: शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये मुली सातत्याने अव्वल येत असतानाही उच्च शिक्षण, संशोधन आणि कामकाजाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या पातळीवर त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसते. ही संधीच्या अभावाची परिस्थिती समाजातील आर्थिक प्राधान्यक्रम, पितृसत्ताक मानसिकता आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे निर्माण झालेली गंभीर सामाजिक समस्या आहे, असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन, केंद्रीय तक्रार निवारण समिती आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बीजभाषक म्हणून ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, दहावी-बारावीच्या निकालांमध्ये मुली मोठ्या प्रमाणात अव्वल येतात. अनेक विद्यापीठांतील सुवर्णपदकेही मुलींनाच मिळतात; मात्र काही वर्षांनंतर या प्रतिभावान मुली उच्च शिक्षण, संशोधन किंवा व्यावसायिक क्षेत्रात फारशा दिसत नाहीत. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांची संख्या कमी होत जाण्याच्या या प्रक्रियेला जगभरात ‘लिकी पाइपलाइन’ असे संबोधले जाते. कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे, ग्रामीण भागात मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याबाबतचा संकोच, तसेच विवाह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या करिअरमध्ये येणारा खंड ही या समस्येची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक स्तरावरील अभ्यासांचा उल्लेख करताना डॉ. पाटील म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेताना मुलींचे प्रमाण चांगले असले तरी संशोधन आणि नेतृत्वाच्या पदांवर त्यांची उपस्थिती कमी आहे. महिलांना समान संधी दिल्यास देशाच्या आर्थिक वाढीतही मोठी भर पडू शकते. या समस्येवर उपाय म्हणून उच्च शिक्षणासाठी मुलींना अधिक शिष्यवृत्ती, कार्यक्षेत्रात लवचिक कामकाज पद्धती, बालसंगोपनासाठी आवश्यक सुविधा, तसेच शिक्षण व प्रशासनातील महत्त्वाच्या पदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज आहे. समाजातील मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत, मुलींच्या शिक्षणाला व करिअरला प्राधान्य दिल्यास देशाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात पदवी घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या गेल्या दशकभरात सातत्याने ५० टक्क्यांहून अधिक राहिली आहे. तथापि, पुढील कारकीर्दीमध्ये त्यांचे प्रमाण तितके राहात नाही, हे चिंताजनक आहे. त्यासाठी महिला समानतेची आणि सक्षमीकरणाची सुरवात ही घरापासून होणे अत्यावश्यक आहे.

सुदृढ समाजासाठी महिलांना त्यांचे न्याय्य हक्क प्रदान करणे आवश्यक असल्याचे सांगताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, समतेच्या संदेशाचे सार्वत्रिकीकरण होत नाही, तोवर सुदृढ समाज घडणार नाही. स्त्रियांप्रती आदर असलेल्या समाजाचीच भरभराट होत असते. म्हणूनच महिला दिवस हा उत्सवीकरणाचा नव्हे, तर सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण कुठवर पोहोचलो आहोत, याचे पुनरावलोकन करीत पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा आहे, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.

उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात पुणे येथील जेएसपीएम विद्यापीठाच्या डॉ. ज्योती शिंदे, शहाजी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रविण पाटील आणि ज्येष्ठ संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी मार्गदर्शन केले.

स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. प्रतिभा देसाई होत्या. कार्यक्रमास विविध अधिविभागांतील शिक्षिका, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Friday, 6 March 2026

पोर्ट्रेट, लँडस्केप चित्रकलेविषयी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रा. अभिजीत कांबळे


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रा. अभिजीत कांबळे

शिवाजी विद्यापीठातील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेअंतर्गत अधिविभागात असे भव्य भित्तीचित्र रेखाटले.

शिवाजी विद्यापीठात चित्रकला कार्यशाळेप्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई, प्रा. अभिजीत कांबळे, बबन माने आणि विजय उपाध्ये यांच्यासमवेत  सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी.

(चित्रकला कार्यशाळेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दोनदिवसीय चित्रकला कार्यशाळा आज उत्साहात पार पडली. कार्यशाळेचा विषय “पोर्ट्रेट, लँडस्केप अँड कॉम्पोझिशन” असा होता. दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. अभिजीत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगत मार्गदर्शन केले.

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे सभागृह आणि परिसरात कार्यशाळा झाली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पोर्ट्रेट, लँडस्केप तसेच चित्ररचनेतील संतुलन, रंगसंगती आणि मांडणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारची चित्रे साकारली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या भिंतीवर चित्रकला पदविकेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले भित्तीचित्र पाहून उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यासोबत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात पोर्ट्रेट, निसर्गचित्रे आणि विविध संकल्पनांवर आधारित चित्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना उपस्थित कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करण्यात आले.

अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बबन माने, विजय उपाध्ये यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. कार्यशाळेसाठी प्राचार्य अजेय दळवी, डॉ. मानसिंग टाकळे, चित्रकार विजय टिपुगडे, संग्राम भालकर, सुदर्शन वंडकर, गजानन वाघमारे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, चित्रकला शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची

कर्नाटक, तमिळनाडूतील सेवाभावी संस्थांना भेट

कर्नाटक राज्य आदिवासी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

बंगळुरू येथील ओअॅसिस इंडिया या संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेताना शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. ६ मार्च: समाजकार्याच्या अभ्यासामध्ये सैद्धांतिकतेबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवालाही मोठे महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही महत्त्वाच्या सामाजिक, सेवाभावी संस्थांना भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली.

शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच कर्नाटकातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बंगळुरू, अॅसिस इंडिया, कॅडबॅम्स हॉस्पिटल, अक्षयपात्रा फाऊंडेशन, स्टंप शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू, राणे ग्रुप, मैसुरू, आदिवासी संशोधन केंद्र, मैसुरू इत्यादी रुग्णालये, उद्योग समूह आणि स्थानिक सेवाभावी संस्थांना भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची माहिती घेतली. या अभ्यास सहलीत एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समाजकार्य अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर, डॉ. उर्मिला दशवंत आणि सौरभ धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल पार पडली.

या अभ्यास सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वर्गात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष क्षेत्रात अनुभव देणे, विविध सामाजिक संस्थांची कार्यपद्धती समजून घेणे आणि समाजकार्याच्या विविध क्षेत्रांतील संधींबाबत व्यापक दृष्टीकोन निर्माण करणे हा होता. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, पुनर्वसन, पोषण, आदिवासी विकास, समुदाय संघटन आणि शाश्वत विकास या विविध क्षेत्रांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.

बंगळुरूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस येथे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सेवा, आधुनिक निदान पद्धती आणि बहुविद्याशाखीय उपचार प्रणालीचा अभ्यास केला. समाजकार्य विभागातील अधिकाऱ्यांनी मानसोपचार प्रक्रियेत समाजकार्यकर्त्यांची भूमिका, कुटुंब समुपदेशन, पुनर्वसन आणि समुदाय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रमांची माहिती दिली. अॅसिस इंडिया संस्थेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांनी बेघर, व्यसनाधीन व्यक्ती आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन कार्यक्रमांची माहिती घेतली. तर, कॅडबॅम्स हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती उपचार, समुपदेशन आणि दीर्घकालीन पुनर्वसन प्रक्रियेबाबत जाणून घेतले. बंगळुरूमधील अक्षयपात्रा फाउंडेशन येथे विद्यार्थ्यांनी शालेय मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीतील अत्याधुनिक स्वयंपाकगृह, गुणवत्ता नियंत्रण आणि वितरण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास केला. म्हैसूर येथील आदिवासी संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती, परंपरा आणि विकास धोरणांविषयी माहिती मिळाली. याशिवाय, मनुष्यबळ विकास शिकणाऱ्या स्टंप शूल अँड सोमप्पा स्प्रिंग्ज प्रा. लि., बंगळुरू आणि राणे ग्रुप, मैसुरू येथे औद्योगिक व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि मानव संसाधन विकासाच्या पद्धतींचा अभ्यास केला. उटी येथे विद्यार्थ्यांनी स्थानिक समुदाय व स्वयंसहायता गटांशी संवाद साधून शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी माहिती घेतली.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठात ग्रंथपालनविषयक दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथपालनविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, डॉ. मोहन खेरडे, डॉ. विनय पाटील, डॉ. एस.ए.एन. इनामदार.

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथपालनविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

 एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. विलास जाधव यांना 'मुकला' संघटनेचा सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्रदान करताना शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. धनंजय सुतार, डॉ. मोहन खेरडे, डॉ. विनय पाटील, डॉ. प्रकाश बिलावर आणि डॉ. एस.ए.एन. इनामदार

(परिषदेच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ६ मार्च: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्येही वाचनाचे, ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित राहणार असून कोणतेही तंत्रज्ञान पुस्तकांना पर्याय ठरणार नाही, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

महाराष्ट्र विद्यापीठे आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल (मुकला) संघटना, शिवाजी विद्यापीठ शाखा, विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भवितव्य’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मुकला संघटनेचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे अध्यक्षस्थानी होते.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी व्यक्तीगत आयुष्यातील काही उदाहरणे देत ग्रंथालयांचे महत्त्व आपल्या भाषणात विषद केले. त्या म्हणाल्या, एक शिक्षक आणि संशोधक म्हणून आयुष्याला ग्रंथांनी खरा आकार दिला. ३६ वर्षांच्या संशोधकीय वाटचालीमध्ये ग्रंथालये आणि त्यांच्या ग्रंथपालांचे योगदान खूप मोलाचे ठरले आहे. ग्रंथालये ही ज्ञानाचे वाहक आणि प्रज्ञेचे निर्माते आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही या मूळ स्रोतांचे महत्त्व अबाधित राहणार आहे. कारण वस्तुनिष्ठ माहितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेलाही अंतिमतः ग्रंथांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. या युगात वाढलेल्या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयांकडे आकर्षित करण्याचे आव्हान निश्चितपणे ग्रंथपालांसमोर उभे असून त्यामध्ये ते नक्की यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिषदेचे संचालक डॉ. एस.ए.एन. इनामदार म्हणाले, जग आज एका ऐतिहासिक वळणावर उभे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या परिवर्तनाचे आपण साक्षीदार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या वर्तमानावर मोठा प्रभाव टाकत आहे आणि भविष्याला आकार देण्यास सज्ज झाली आहे. ग्रंथालयांसाठी ती एक सक्षम संधी म्हणून सामोरी आली आहे. ग्रंथालयांनी नेहमीच तंत्रज्ञानातील बदल स्वीकारले आहेत. संगणकाच्या आगमनानंतर ग्रंथालयांचे ऑटोमेशन झाले. इंटरनेटमुळे ग्रंथालये डिजिटल प्रवेशद्वारे बनली. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे स्वयंचलित कॅटलॉगिंग, मेटाडेटा निर्मिती आणि वर्गीकरण ही ग्रंथालयातील नियमित तांत्रिक कामे अधिक जलद आणि अचूक होतील. एआय-आधारित चॅटबॉट विद्यार्थ्यांना, संशोधकांना २४ तास संदर्भ आणि रेफरल सेवा देऊ शकते. मशीन लर्निंग अल्गोरिदम वर्तन आणि शैक्षणिक ट्रेंडच्या वापराचे विश्लेषण करून ग्रंथपालाला संग्रह विकासात मदत करू शकते. तथापि, तंत्रज्ञान डेटा प्रक्रिया करू शकते, परंतु मानवी बुद्धिमत्तेची, ज्ञानाची जागा घेऊ शकत नाही. भविष्यातील ग्रंथपाल केवळ पुस्तके आणि डेटाबेस व्यवस्थापित करणार नाही तर डेटा ग्रंथपाल आणि माहिती साक्षरता शिक्षक, संशोधन डेटा व्यवस्थापक, डिजिटल ज्ञान निर्माता आणि माहितीमध्ये नैतिक मार्गदर्शन करेल. आणि हे परिवर्तन साध्य करण्यासाठी, ग्रंथपालांना नवीन क्षमता आत्मसात करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोहन खेरडे म्हणाले, ग्रंथालयांचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन मुकला कार्यरत आहे. ग्रंथपाल हे केवळ प्रशासक नाहीत, तर सेवा पुरवठादार असण्याबरोबर ते शिक्षक आणि संशोधकही आहेत. त्यामुळे ग्रंथालयांना नव्या युगातील संधी आणि आव्हाने यांसाठी सक्षम करण्याची जबाबदारी ते निश्चितपणे पेलतील. ग्रंथालये आणि प्रभावी आणि उपयुक्त बनविण्याच्या कामी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने ग्रंथपालांनी विचारविमर्श करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या महर्षी धोंडो केशव कर्वे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. विलास जाधव यांना यंदाचा मुकला सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कारप्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सुरवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि रोपास पाणी वाहून मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिनकुमार पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुकलाचे महासचिव डॉ. विनय पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सौ. एस.डी. हजारे आणि अमृता देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांनी आभार मानले.

Thursday, 5 March 2026

आण्णासाहेब लठ्ठे महत्त्वाचे लोकशिक्षक: आनंद मेणसे

शिवाजी विद्यापीठात आयोजित आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य आनंद मेणसे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य आनंद मेणसे. मंचावर (डावीकडून) सुहास पाटील, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे.

(व्याख्यानमालेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ मार्च: शाहूकार्याशी बांधिलकी आणि गांधीविचारांशी निष्ठा अशा मुशीतून घडलेले दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे हे एक महत्त्वाचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेमध्ये आण्णासाहेब लठ्ठे: जीवन आणि कार्य या विषयावर ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्राचार्य मेणसे यांनी आपल्या भाषणात प्रोफेसर लठ्ठे यांनी कोल्हापूरसह बेळगाव परिसरात केलेल्या विविधांगी कार्याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, लठ्ठे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक भूमिका पटलेली होती. विशेषतः कोल्हापूरमध्ये त्यांनी जैन विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वसतिगृहाच्या कृतीमुळे ते प्रभावित झाले होते. या माध्यमातून ते महाराजांच्या अधिक जवळ आले. त्यांच्या विचारकार्याशी त्यांनी अखेरपर्यंत बांधिलकी सांभाळली. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात अस्पृश्यता निवारण, दलित आणि महिलांचे प्रश्न विषयपत्रिकेवर घेतल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतील अन्य मंडळींसह लठ्ठेही त्यांच्यासमवेत उभे राहिले. गांधींच्या श्रमप्रतिष्ठेच्या विचाराचे ते पाईक होते.

मेणसे पुढे म्हणाले, जयंती नदीवरील पूल, नगरविकास नियोजन, राजाराम महाविद्यालयांत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या गुणवंत शिक्षकांना आणून येथील शिक्षणव्यवस्था दर्जेदार करणाऱ्या लठ्ठे यांचा कोल्हापूर घडविण्यात जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो बेळगावच्या राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासामध्येही आहे. १९३७ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळगाव उत्तरमधून लठ्ठे विजयी झाले आणि मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्रीही झाले. त्यावेळी त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आदर्शवत स्वरुपाचा होता. त्यात त्यांनी दारूबंदीचे सूतोवाच केले. आणि त्यापोटी बुडणारा महसूल घोड्यांच्या शर्यती आणि श्रीमंतांच्या घरभाड्यावरील कर इत्यादी मार्गांनी वसूल करण्याची योजना केली. दक्षिण कोकण शिक्षण संस्थेची स्थापना आणि वृद्धी याकामीही त्यांनी फार मोलाचे योगदान दिले. आजही संस्थेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त चालतो, याला लठ्ठे यांनी घालून दिलेला आदर्श कारणीभूत आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्रासह त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहीली. त्यांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या कृती केल्या, त्यामागील कार्यकारणभाव आजच्या पिढीने जाणीवपूर्वक समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन व अभ्यास करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुहास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. अशोक चौसाळकर, सुरेश शिपूरकर, डॉ. अनिल गवळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. रफिक सूरज, डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. सुभाष पाटील यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Wednesday, 4 March 2026

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला

शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा संघ.

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा क्रीडा अधिविभागाचा संघ

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेत तृतीय स्थान मिळविणारा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा संघ


कोल्हापूर, दि. ४ मार्च: शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने सलग चौथ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. क्रीडा अधिविभाग दुसऱ्या तर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.

शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल येथे झाल्या. यामध्ये कॅम्पसवरील सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा: क्रिकेट (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट.

क्रिकेट (महिला): क्रीडा आधिविभाग, रसायनशास्त्र, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गणित.

थ्रो बॉल (महिला): फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वाणिज्य व व्यवस्थापन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल अँड डेव्हलपमेंट, प्राणीशास्त्र.

व्हॉलीबॉल (पुरुष): स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, क्रीडा,

बुद्धिबळ (पुरुष): आदित्य सावळकर (क्रीडा), अनिकेत धोतुरे (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), अपूर्व कदम (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बुद्धिबळ (महिला): प्रतीक्षा गोसावी (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), सुरभी सिंग (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग), नेहा कटके (स्कूल ऑफ इंजिनिअरिंग).

बॅडमिंटन (पुरुष): स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अर्थशास्त्र, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.

बॅडमिंटन (महिला): डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संगणकशास्त्र.

रस्सीखेच (महिला): क्रीडा, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गणित, शिक्षणशास्त्र.

रस्सीखेच (पुरुष): शिक्षणशास्त्र, पर्यावरणशास्त्र, क्रीडा.

अॅथलेटिक्स पुरुष आणि महिला गटात सर्वसाधारण विजेते अनुक्रमे: क्रीडा, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मराठी.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले.