Wednesday, 12 March 2025

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले - माजी प्राचार्य गणपतराव कणसे



कोल्हापूर, दि.12 मार्च - यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असे प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आज येथे केले.



           शिवाजी विद्यापीठाच्या कै.यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने भारताचे दिवंगत उपपंतप्रधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 'यशवंतराव चव्हाण : संस्काराचे अमृतकुंभ' या विषयावर माजी प्राचार्य गणपतराव कणसे (कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी माजी प्राचार्य कणसे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख उपस्थित होते.

            पुढे बोलताना माजी प्राचार्य कणसे म्हणाले, व्यक्ती संपत्तीवर मोठा होत नाही तर त्यांनी अंगीकारलेल्या संस्कारावर मोठा होतो. हे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत दाखवून दिले आहे. ते आपल्या संस्काराच्या भक्कम पायांवर उभे राहिले म्हणून आज आपण सगळे त्यांचे स्मरण करतो.व्यक्ती पेक्षा देश मोठा ही पवित्र भावना यशवंतराव चव्हाणांनी लोकांच्या मनामध्ये रूजविली.देवराष्ट्र सारख्या एका दूर्गम भागात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला.आई, वडील आणि गुरूजनांकडून मिळालेल्या संस्कारूपी शिदोरीच्या जोरावरच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला-क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली.  शिक्षण क्षेत्रामुळे सर्व क्षेत्रांला ऊर्जा प्राप्त होते याचे भान त्यांना होते. कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी ते आग्रही होत आणि म्हणूनच प्रसंगी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यासही ते मागे-पुढे पाहिले नव्हते. सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या निर्णयामुळे प्रचंड क्रांती झाली.  महाराष्ट्र ही भारत देशाची प्रयोगशाळा ठरते ही सगळी किमया यशवंतराव चव्हाण यांची आहे. आई, वडील आणि गुरूजनांचा नेहमी सन्मान राखावे असे ते म्हणत.  जीवसृष्टी चिरंतन काळापर्यंत अबाधीत राहण्यासाठी आजच्या तरूणांनी पर्यावरण आणि पाणी प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी प्राचार्य कणसे यांनी व्यक्त केले.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख म्हणाले, दुर्गम भागातील व्यक्ती आपल्या संस्काराच्या जोरावर देशाच्या प्रगतीमध्ये आणि जडणघडणीमध्ये मोठे योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य यशवंतराव चव्हाण यांचे कडून घडले. राज्याची, देशाची प्रगती व्हावी, सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा, अशा पध्दतीची नितीमत्ता त्यांनी बाळगली आणि त्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.सहकार क्षेत्रामध्ये केलेले त्यांचे कार्य देशाला दिशादर्शक ठरले.

            यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हसते करण्यात आला.या विविध स्पर्धेतील विजेत्यांची नांवे अनुक्रमे अशी: पोस्टर स्पर्धा - वरूण अमृते, नेहा शिंदे, सुकन्या निकम.निबंध स्पर्धा - नेहा शिंदे, सुकन्या निकम, श्रेया म्हापसेकर.रिल स्पर्धा - आरपीता सावंत, आदित्य देसाई, प्रथमेश पाटील.

            कार्यक्रमाच्या सुरूवातीस यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ.नितीन माळी यांनी स्वागत प्रास्ताविक केले.डॉ.उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ.उमेश गडेकर यांनी आभार मानले.यावेळी डॉ.कविता वड्राळे, डॉ.संतोष सुतार यांचेसह विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.


यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

          यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्धाटन माजी प्राचार्य डॉ.गणपतराव कणसे (कराड) आणि मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख यांनी केले.या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.


             तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तुकाराम चौगुले, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, डॉ.संतोष सुतार, डॉ.उमेश गडेकर, डॉ.कविता वड्राळे, डॉ.वैशाली भोसले, डॉ.गजानन साळुंखे, डॉ.परशुराम वडार, डॉ.दादा ननावरे, डॉ.प्रताप खोत, डॉ.उर्मिला दशवंत यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

                                                                             ----- 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनविषयी संशोधन महत्त्वाचे: डॉ. सुनील पवार

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. दादा नाडे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. शशीभूषण महाडिक आणि डॉ. आसावरी जाधव.

(भारतीय मान्सूनविषयक कार्यशाळेचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १२ मार्च: मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठात हवामान बदल आणि भारतीय मान्सूनया विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग, हवामान बदल आणि शाश्वत केंद्र, पर्यावरण शास्त्र विभाग, संख्याशास्त्र अधिविभाग आणि पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. पवार म्हणाले, भारतीय उपखंडाच्या दृष्टीने मोसमी वारे आणि मोसमी पावसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि अंदाज या बाबी आवश्यक आहेत. तो केवळ हवामान अगर पर्यावरणाचा घटक नाही, तर भारतीय अर्थकारणाचा प्रमुख स्रोत म्हणूनच आपण त्याकडे पाहिले पाहिजे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी मान्सून हा आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एका अर्थाने आपले संपूर्ण जीवन त्यावर अवलंबून आहे. हवामान बदलाचेही तीव्र परिणाम जगभर दिसून येत आहेत. औद्योगिकीकरण, वायू प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. वाढते तापमान, बेभरवशाचे वातावरणीय बदल, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर या साऱ्या बाबींचे शेती, जलसंपत्ती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. या हवामान बदलाचे परिणाम भारतीय मान्सूनवरही होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास आणि संशोधन यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आय.आय.टी.एम.मध्ये विद्यार्थ्यांचे सदैव स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवाजी विद्यापीठ आणि आय.आय.टी.एम. यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत चांगले काम सुरू असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, हवामान बदल हा आता काही केवळ भूगोल किंवा पर्यावरणशास्त्राचा विषय राहिलेला नाही. कोणताही विषय अथवा क्षेत्र त्यापासून अस्पर्शित राहिलेले नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील अभ्यासक, संशोधकांनी त्यासाठी पुढे येणे आवश्यक बनले आहे. समाजाच्या विद्यापीठाकडून अनेक अपेक्षा असतात. त्यांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने आयआयटीएमसारख्या राष्ट्रीय संस्थेसोबत जोडले जाणे महत्त्वाचे असते. आज गतीने बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज तितक्याच गतीने वर्तविण्याचे आव्हानही आपल्यासमोर आहे. तसे झाल्यास आपण जिवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात रोखू शकतो. विद्यार्थी व संशोधकांनी त्या दृष्टीने आपल्या अभ्यासाच्या दिशा केंद्रित कराव्यात. विद्यापीठाचे पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्र आणि भूगोल अधिविभाग येथे आयआयटीएम काही अत्याधुनिक उपकरणे बसविणार आहे. त्या डेटाचाही संशोधन व विश्लेषणासाठी मोठा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारती विद्यापीठाचे डॉ. दादा नाडे प्रमुख उपस्थित होते. डॉ. सचिन पन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले, डॉ. आसावरी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉ. शशीभूषण महाडिक यांनी आभार मानले.

या कार्यशाळेत पुढे दिवसभरात झालेल्या विविध सत्रांत आयआयटीएमचे प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ डॉ. हाफजा वरिकोडण, डॉ. सुरज के.पी. आणि डॉ. प्रशांत पिल्लई यांनी मान्सूनवरील हवामान बदलाचा प्रभाव, संभाव्य परिणाम आणि त्यावरील वैज्ञानिक उपाययोजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Tuesday, 11 March 2025

मिड स्वीडन विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाचा करार

 शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क माफ; आंतरराष्ट्रीय क्रेडिट मिळणार

शिवाजी विद्यापीठ आणि स्वीडनमधील मिड स्वीडन विद्यापीठ यांच्यादरम्यान करण्यात आलेल्या करारपत्रांचे हस्तांतर प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रा. मॅग्नस हमलगार्ड. सोबत (डावीकडून) डॉ. एस.बी. सादळे, डॉ. महादेव देशमुख, प्रा. मनिषा फडतरे, प्र-कुलुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. अजितसिंह जाधव.

(करार हस्तांतर कार्यक्रमाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ११ मार्च: शिवाजी विद्यापीठासमवेत मिड स्वीडन विद्यापीठाचा झालेला करार विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदानाच्या पलिकडे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा म्हणून अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युरोपमधील मिडस्वीडन विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा स्वीडनमधील मिड स्वीडन विद्यापीठासमवेत गेल्या नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक व संशोधकीय साहचर्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार झाला आहे. त्या कराराच्या पुढच्या टप्प्यातील अधिक सविस्तर असे करारपत्र आज या दोन्ही विद्यापीठांदरम्यान करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

प्रा. हरलगार्ड म्हणाले, गेल्या दोन दिवसांत शिवाजी विद्यापीठातील अनेक अधिविभागांना भेटी देऊन तेथील प्रयोगशाळा, उपलब्ध संशोधन सामग्री, उपकरणे यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील संशोधक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमवेत झालेल्या चर्चेमधून या दोन्ही विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधनामध्ये, उपलब्ध सुविधांमध्ये साम्य आढळून आले. त्यामुळे दोन्ही विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकमेकांसमवेत आपले अनुभव वाटून घेऊन आणखी प्रगतीशील संशोधनाच्या दिशा धुंडाळता येऊ शकतील. करारपत्राद्वारे जरी विद्यार्थ्यांचे आदानप्रदान होणार असल्याचे दिसत असले तरी भारत आणि स्वीडन यांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान होऊन हे बंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी या करारपत्राच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, या कराराद्वारे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी अध्ययनासाठी मिड स्वीडन विद्यापीठामध्ये जाऊ शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या विद्यापीठाने विशेष बाब म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फी) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे. या करारामुळे आणखी एक गोष्ट प्रथमच घडून येणार आहे, ती म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट मिळविता येणार आहेत. पाश्चात्य देशांमधील प्राध्यापक संशोधनाच्या पुढे जाऊन स्वतःचे पेटंट, स्वतःच्या कंपन्या स्थापन करतात. मिड स्वीडन विद्यापीठ त्याला अपवाद नाही. आपल्या संकल्पनेचे उद्यो-व्यवसायांत रुपांतर करून समाजाला आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्याची संस्कृती आपल्या विद्यार्थ्यांत त्यामुळे विकसित होईल. एका वेगळ्या प्रकारची संशोधन संस्कृती आणि ज्ञानसंस्कृती त्यांना अनुभवता येईल आणि अंगिकारताही येईल.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्या मिड स्वीडन विद्यापीठात संशोधक, प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. मनिषा फडतरे यांच्या अखंडित प्रयत्नांमुळे सदरचे करार साकार झाले आहेत, याचा मनस्वी अभिमान वाटतो. या दोन्ही विद्यापीठांमधील सहकार्य आणखी कोणकोणत्या क्षेत्रांपर्यंत विस्तारता येईल, याचा या चमूने अभ्यास करावा. संयुक्त अध्ययन, संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदान यापलिकडे जाऊन या दोन्ही विद्यापीठांमध्ये निर्माण झालेले सहकार्याचे बंध पुढील काळात शाश्वत कसे राहतील, या दृष्टीने मंथन व्हायला हवे. मिड स्वीडन विद्यापीठात शिकण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे. त्याचप्रमाणे मिड स्वीडनच्या विद्यार्थ्यांनीही शिवाजी विद्यापीठास भेट द्यावी. येथील कला, क्रीडा, संस्कृती अभ्यासावी, तसेच भविष्यात शिक्षणासाठीही येथे यावे, यासाठीही प्रयत्न व्हावेत. शिक्षकांमध्ये अधिक चांगले संबंध निर्माण होण्यासाठी ऑनलाईन संवाद वेळोवेळी घडवून आणावेत, असेही त्यांनी सुचविले.

यावेळी प्रा. मनिषा फडतरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एस.बी. सादळे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.

 

आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी

डॉ. प्रभंजन माने फ्रान्सला रवाना

 

डॉ. प्रभंजन माने


कोल्हापूर, दि. ११ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने हे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत.

फ्रान्समधील ले मान्स विद्यापीठात दि. १३ व १४ मार्च २०२५ रोजी सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक डब्ल्यू. समरसेट मॉम यांच्या साहित्यावर आधारित हाउ गुड मॉम वॉज: ए क्रिटिकल रिअ‍ॅसेसमेंटया विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या प्रतिष्ठित परिषदेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांना मॉम यांची प्रसिद्ध कादंबरी ऑफ ह्युमन बाँडेजविषयी शोधनिबंध सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

परिषदेच्या निमित्ताने विविध देशांतील संशोधक, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांना मॉम यांच्या साहित्यिक योगदानाचा नव्याने विचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मॉम यांच्या कथालेखन, कादंबऱ्या, नाटके, निबंध, प्रवासवर्णन, चित्रपट रूपांतरणे आणि सांस्कृतिक स्थानांतरण या विविध साहित्यप्रकारांवरील योगदानाचा सखोल अभ्यास आणि विचारविनिमय परिषदेत होणार आहे.

डॉ. माने यांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून ४० शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या हाताखाली ६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन केले आहे. मॉम यांच्या ऑफ ह्युमन बाँडेज या कादंबरीमधील नैतिकता, स्वातंत्र्य आणि आत्मसाक्षात्कार यांचे संशोधनात्मक व चिंतनशील विश्लेषण त्यांनी केले आहे. अस्तित्ववाद, स्पिनोजाचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक नैतिकतेचे बंधन यांचा प्रभाव कसा पडतो, याविषयीही आपल्या शोधनिबंधात त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे.

Monday, 10 March 2025

महाराष्ट्राच्या विकासाकांक्षी नेतृत्वांत लोकनेते बाळासाहेब देसाई अग्रणी

शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादातील सूर

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष परिसंवादात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. विजय चोरमारे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अरूण भोसले आणि डॉ. अवनीश पाटील.

(परिसंवादाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १० मार्च: सन १९६० ते १९८० या कालखंडातील महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व विकासाकांक्षी होते आणि लोकनेते बाळासाहेब देसाई त्यामधील अग्रणी नाव होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये उमटला.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री, बांधकाम मंत्री, गृहमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आज (दि. १०) शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनामार्फत महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व (१९६० ते १९८०)या विषयावरील एकदिवसीय परिसंवाद झाला. परिसंवादामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉ.  विजय चोरमारे, ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरुण भोसले सहभागी झाले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राजकीय नेतृत्व या विषयाच्या अनुषंगाने बोलताना डॉ. विजय चोरमारे यांनी देसाई यांच्या सुरवातीच्या कालखंडातील खडतर आयुष्याविषयी माहिती दिली. अत्यंत कष्टाने, प्रसंगी उपाशी राहूनही त्यांनी कोल्हापूर येथून कायद्याच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्याचे सांगून ते म्हणाले, प्रचंड अपेष्टा सोसून स्वतःचे आयुष्य घडविणाऱ्या लोकनेते देसाई यांनी महाराष्ट्रात राबविलेल्या ई.बी.सी. योजनेने शिक्षणव्यवस्थेचे चरित्र आणि चारित्र्य बदलून टाकले. या योजनेमुळे राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मोलाची मदत झाली. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे जसे योदान होते, तसेच शिक्षणमंत्री म्हणून देसाई यांचेही योगदान राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरातच व्हावे, या मागणीसाठी प्रसंगी मंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी त्यांनी ठेवली होती. गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क आणि प्रतापगड येथील महाराजांचे पुतळे हे त्यांनी उभारले. त्याकामी जनसहभाग मिळविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. मुंबई-गोवा महामार्ग संकल्पित निधीपेक्षाही कमी खर्चात निर्माण करणारा त्यांच्यासारखा बांधकाम मंत्री विरळाच. शिक्षण, पाटबंधारे, महसूल, कृषी, सहकार आदी क्षेत्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. तळागाळातील वंचित घटकांबद्दल प्रचंड आस्था असणारे देसाई आपल्या विरोधकांशीही समंजस व सुसंस्कृतपणे संवाद साधत असत.

ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी १९३० ते १९६० या कालखंडातील महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाच्या जडणघडणीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, १९६० नंतरचा महाराष्ट्र समजून घेण्यापूर्वी त्यापूर्वीचा महाराष्ट्र समजून घेणे आवश्यक आहे. गुजरात, कच्छ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाचा समावेश असलेल्या व्यापक आणि गुजराती, मराठी व कन्नड अशा त्रैभाषिक मुंबई राज्याचा हा सारा पसारा होता. १९३०च्या आसपास महाराष्ट्रात काँग्रेसच्या बरोबरीने ब्राह्मणेतर, दलित, कामार इत्यादी चळवळींचा उदय झाला. टिळकपंथी नेतृत्वाचा प्रभाव कमी होऊन तळागाळातील नेत्यांचा उदय होऊ लागला. शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे आणि पुढे केशवराव जेधे यांचा प्रभाव काँग्रेसमध्ये वाढला. १९३५च्या कायद्याने १९३६ साली मुंबई राज्य विधानसभेची निर्मिती झाली. १९३७मध्ये पहिली निवडणूक झाली. काँग्रेसला ७८ जागा मिळून बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९४६मध्ये पुन्हा खेरच मुख्यमंत्री झाले. १९५२ पर्यंत या सरकारवर गुजराती मंत्र्यांचे वर्चस्व होते. या मंत्र्यांचे कामकाज अतिशय निम्न दर्जाचे असून त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संसाधनांचे वाटप आव्हानात्मक बनले होते. १९४८मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. १९५२मध्ये ३१४पैकी २६५ जागा काँग्रेसला मिळाल्या. यावेळी संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त कर्नाटक आणि विशाल आंध्र चळवळी मूळ धरत होत्या. भाषावार प्रांतरचनेचा आग्रह तीव्र होत निघाला. शंकरराव देव यांनी या संदर्भात घेतलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे त्यांचे नेतृत्व झुगारून देण्याच्या निर्णयापर्यंत काँग्रेस आली. मोरारजी देसाई यांना नवी मुंबई हे ४४ जिल्ह्यांचे मोठे राज्य हवे होते. उत्तर प्रदेशच्या तोडीचे हे राज्य त्यांना पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी आवश्यक वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात वातावरण निराळे असल्याने काँग्रेसमध्ये नेतृत्वाची नवी फळी उदयास आली. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई, राजारामबापू पाटील, शंकरराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, गोपाळराव नाईक इत्यादींचा त्यात समावेश होता. अभ्यास करण्याची, अथक परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्या या नेतृत्वाला जनतेच्या प्रश्नांचीही जाण होती. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील नेतृत्व मागे पडून नवे विकासाकांक्षी नेतृत्व महाराष्ट्रात या काळात उदयास आले, असे मत त्यांनी मांडले.

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरूण भोसले यांनी १९६० ते १९८० या कालखंडाती महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाविषयी मांडणी केली. ते म्हणाले, हा कालखंड महाराष्ट्राच्या भरभराटीचा होता. सक्षम राजकीय नेतृत्वाचा हा उदयकाळ होता. या दोन्ही दशकांवर यशवंतराव चव्हाण यांचा प्रभाव होता, तर लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यांचे उजवे हात होते. कृषी-औद्योगिक संरचनेच्या स्वीकारामुळे राज्यात सहकार चळवळ निर्माण झाली, जी संपूर्ण देशासाठी आदर्श, मार्गदर्शक ठरली. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा त्याने पालटून गेला. साहित्य, संगीत, नाट्य, विविध कला यांच्या ऊर्जितावस्थेचाही हा काळ होता. नवा महाराष्ट्र घडविण्याची या नवनेतृत्वाची आकांक्षा व जिद्द होती. यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केली आणि राज्याला तशी ओळख प्रदान केली. लोकमान्य टिळक यांच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेला नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण होत. लोकनेते देसाई यांच्याशी त्यांचे हृद्य संबंध होते. महाराष्ट्राच्या विकासकार्यात देसाई यांचेही त्यांना पूर्ण पाठबळ लाभले. महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार असलेल्या या जोडीला जनता सूर्य-चंद्र अगर राम-लक्ष्मण म्हणत असे. मात्र, देसाई यांनी जुलै १९७०मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा का दिला, याची विश्वसनीय उकल आजही होत नाही. ते इतिहासात एक कोडे बनून राहिले आहे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ई.बी.सी. सवलतीच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात लाखो विद्यार्थ्यांना आणून डोंगराएवढे मोठे काम केले आहे. शिक्षणव्यवस्थेकडे ते सर्जनशील संवेदनशीलतेने पाहात होते. त्यातूनच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ होण्यासाठी आग्रही राहणे, येथे गूळ संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, तंत्रशिक्षण महाविद्यालय यांच्या उभारणीतून सर्वांगीण शिक्षणासाठीचा त्यांचा आग्रह दिसून येतो. राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणाऱ्या महाराष्ट्रीय नेतृत्वाच्या फळीतील ते एक आघाडीचे नेते होते. आदर्श नेतृत्वाचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे.

कार्यक्रमात सुरवातीला अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.

Friday, 7 March 2025

‘शिवस्पंदन’च्या अखेरच्या दिवसावर तंत्रज्ञान अधिविभागाचे वर्चस्व

 

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत महिला क्रिकेटच्या अतिम सामन्यास प्रारंभ प्रसंगी डॉ. ज्योती जाधव, डॉ. शरद बनसोडे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. राहुल माने, डॉ. नवनाथ वलेकर यांच्यासह खेळाडू व पंच

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात पुरूष रस्सीखेच स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा तंत्रज्ञान अधिविभागाचा संघ



कोल्हापूर, दि. ७ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामध्ये आज अखेरच्या पाचव्या दिवशी क्रिकेटसह बास्केटबॉलमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद मिळविले.

आज सकाळच्या सत्रात झालेल्या महिलांच्या क्रिकेटमधील अंतिम सामन्यात गणित अधिविभागावर मात करीत तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम क्रमांक मिळविला. गणित अधिविभागाला द्वितीय आणि नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाने तृतीय क्रमांक पटकावला.  

महिलांच्या बास्केटबॉल स्पर्धेतही तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम क्रमांक मिळविला. गणित अधिविभागाने द्वितीय तर क्रीडा अधिविभागाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेत नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम, क्रीडा अधिविभागाने द्वितीय आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट (वाय.सी.एस.आर.डी.)ने तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या रस्सीखेच स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाने प्रथम, वाय.सी.एस.आर.डी.ने द्वितीय आणि क्रीडा अधिविभागाने तृतीय क्रमांक पटकावला.

अॅथलेटिक्स स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे अनुक्रमे असा:

X १०० रिले - क्रीडा अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि जीवशास्त्र अधिविभाग

लांब उडी (महिला)- देवयानी सबनीस (तंत्रज्ञान अधिविभाग), अंजली लोहार (अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान), नंदिनी कुंभार (गणित)

४०० मी. (महिला)- मनीषा पाटील (क्रीडा), अनुष्का भोसले (गणित), अनुष्का पाटील (क्रीडा)

१०० मी. (पुरूष)- आर्यन शेजाळ (क्रीडा), क्रिश पोतदार (क्रीडा), नड्लान्झी बोनगिनकोसी मायकल (वाणिज्य व व्यवस्थापन)

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या व शिस्तबद्धरित्या आयोजित करण्यामध्ये सहाय्य करणाऱ्या सर्व अधिविभाग प्रमुखांसह शिक्षक, संचालक व विद्यार्थ्यांचे क्रीडा व शारीरिक संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. राजाराम गुरव, डॉ. केशव राजपुरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. कैलास सोनावणे, डॉ. प्रवीणकुमार पाटील, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. वाय. एन. कांचे, डॉ. तृप्ती करीकट्टी, डॉ. राहुल माने, डॉ. ज्योती जाधव, डॉ. आण्णा गोफणे, डॉ. नवनाथ वलेकर, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. राजेंद्र रायकर, प्रा. किरण पाटील, डॉ. राम पवार, डॉ. धनंजय पाटील, डॉ. निलेश पाटील, प्रा. एन. आर. कांबळे, डॉ. विक्रम नांगरे- पाटील, सुभाष पवार, सुचय खोपडे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. मनीषा शिंदे, प्रदीप हंकारे, विजय कांबळे, आनंदा तळेकर, सुनील देसाई, शरद चव्हाण, तौहीद मुल्ला, शुभम काशीद, संग्राम गुरव, आकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.