Friday, 2 December 2016

लर्न, अन-लर्न व रि-लर्न ही त्रिसूत्री शिक्षकांसाठी महत्त्वाची: डॉ. बी. एम. हिर्डेकर



Dr. B.M. Hirdekar at DoT orientation programme. In photo also seen Dr. A.K. Sahoo, Dr. J.S. Bagi and Dr. P.D. Patil.
शिवाजी विद्यापीठात शिक्षकांसाठी ओरिएंटेशन प्रोग्रॅमला प्रारंभ
  कोल्हापूर, दि. २ डिसेंबर: बदलत्या शिक्षणप्रवाहात टिकण्यासाठी शिक्षकांनी संशोधनावर लक्ष केंद्रित करून समाजाचे प्रश्न सोडवताना लर्न, अन-लर्न व रि-लर्न या त्रिसूत्रीचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.(डॉ.) बी. एम. हिर्डेकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात शिक्षकांसाठी आयोजित चार आठवड्यांच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी अध्यक्षस्थानी होते.
डॉ. हिर्डेकर म्हणाले, नवीन पिढीचे विद्यार्थी स्मार्ट असून प्राध्यापकांनी देखील आता स्मार्ट झाले पाहिजे. जगात टिकण्याकरिता शिक्षण हाच एकमेव मार्ग असून त्याकरिता सातत्याने ज्ञानलालसा जागृत ठेवली पाहिजे. सातत्यपूर्ण निरंतर शिक्षणाचा अवलंब करून नाविन्यपूर्ण संशोधनाचा वापर समाजातले प्रश्न सोडविण्याकरिता करावा. लर्निंग सर्कल्स स्थापन करून विद्यार्थी व शिक्षकांनी नवीन ज्ञान निर्माण केले पाहिजे. शिक्षण क्षेत्र डेडिकेशन, कमिटमेंट व डिव्होशन या तीन मूल्यांवर आधारित असल्याने जगाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य शिक्षण क्षेत्रात पर्यायाने शिक्षकांच्यात आहे. मात्र त्यासाठी शिक्षकांनी आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवावा, असा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला.
तंत्रज्ञान आधिविभागाने हा ओरिएन्टेशन प्रोग्रॅम विद्यापीठात आयोजित करून प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी संधी निर्माण करून दिली, या पुढाकाराचेही डॉ. हिर्डेकर यांनी कौतुक केले.
डॉ. बागी यांनी शिक्षकी पेशा पवित्र आहेच, पण तो तितकाच कठीण व जवाबदारीचा असल्याने शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे असल्याचे अध्यक्षीय मनोगतात सांगितले. या ओरिएन्टेशन प्रोग्रॅममध्ये मार्गदर्सन करणाऱ्या सुमारे चाळीस दिग्गजांच्या अनुभवाचा शिक्षकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समन्वयक डॉ. पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. इराण्णा उडचाण यांनी परिचय करून दिला. प्रशासकीय समन्वयक प्रा. (डॉ.) ए. के. साहू यांनी आभार मानले. यावेळी पर्यावरण अभ्यासक मिलिंद पगारे, समन्वयक यांच्यासह विविध महाविद्यालयांचे ५० हून अधिक शिक्षक उपस्थित होते. २९ डिसेंबरला या उपक्रमाचा समारोप होईल.

चार आठवड्यांचा भरगच्च उपक्रम
या ओरिएंटेशन प्रोग्रॅमला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असून तो चार आठवडे चालणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्राद्वारे शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील अधिविभागांतील तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी स्वतंत्रपणे कोर्स तयार केला असून हे सत्र २९ डिसेंबरपर्यंत चालेल. उच्च शिक्षणातील संशोधन व त्या अनुषंगाने येणारे महत्वाचे विषय, नैतिकता, पर्यावरण, प्राध्यापकांच्या सेवेच्या अनुषंगाने येणारे विविध मुद्दे, आंतरशाखीय संशोधन, कायदाविषयक जागरूकता, संशोधन पद्धती, संवाद कौशल्ये, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सूक्ष्म अध्यापन या व अशा अनेक विषयांवर त्या त्या विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment