Wednesday, 7 December 2016

सशक्त समाजासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवात आवश्यक: प्रा.श्याम मानव





कोल्हापूर, दि. ७ डिसेंबर: सशक्त व बलशाली समाजनिर्मितीसाठी त्या समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवात होणे आवश्यक आहे. तर्कनिष्ठ बुद्धीप्रामाण्यवाद हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनल्यास समाजातील अंधश्रद्धांचे निराकरण शक्य आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.श्याम मानव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायदा २०१३' या विषयी एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली. त्यावेळी बीजभाषक म्हणून प्रा. मानव बोलत होते. इतिहास अधिविभागात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर होते. 
प्रा.श्याम मानव म्हणाले, धर्माला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, तथापि, धर्माच्या नावाने आणि त्याच्या आधारावर होणाऱ्या शोषणाला आमचा विरोध आहे. समाजात पसरलेल्या विविध अंधश्रद्धा या या शोषण परंपरेचाच एक भाग आहे. त्यामुळे २००५ सालापासून सुरु झालेल्या या कायद्याचा प्रवास डिसेंबर २०१३मध्ये मंजूर हो पूर्ण झाला. असा कायदा आजपर्यंत जगातील कोणत्याही देशा तसेच महाराष्ट्राव्यतिरिक्त कोणत्याही राज्यात अंमलात आलेला नाही. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी सहकार्य केले. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दक्षता अधिकारी यांची असणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. या कायद्याची उत्तम अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते. ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा जीव धोक्यात येतो, त्याची लुबाडणूक हो शकते, त्या ठिकाणी हा कायदा त्याच्या मदतीला धावून येतो.
सुरुवातीला आपण अतिशय अंधश्रध्दाळू होतो आणि जगातील सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा माझ्या जीवनाचा भाग होत्या असे सांगून प्रा. मानव म्हणाले, आचार्य धर्माधिकारी यांच्या संपर्कामुळे माझ्या मना तर्कशुद्ध विचारसरणीची बीजे रोवली गेली. त्यानंतर १९८२ साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीची स्थापना झाली आणि या माध्यमातून लोकजागृतीचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. वैज्ञानिक दृष्टीकोन रुजल्यामुळेच युरोप किंवा पाश्चात्य समाज अधिक प्रगतशील होऊ शकला, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कायद्यातील बारकाव्यांसह त्यातील बारा कलमांची तांत्रिक बाबींसह विस्तृत माहिती दिली.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मुलन करावयाचे झाल्यास विद्यार्थ्यांत अगदी लहानपणापासून निखळ वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे समाजहिताचे आहे. विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती एकदा झाली की, प्रगतीचे दरवाजे त्या समाजासाठी खुले होतात. अंधश्रद्धांच्या शृंखलांमधून मुक्त झालेला समाज हा अधिक प्रगल्भ नवनिर्मितीसाठी सक्षम होतो.
      यावेळी प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. नंदा पारेकर यांनी प्रास्ताविक केले. सहायक संचालक डॉ. एन.पी.देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर केले ए.जी.भाले यांनी आभार मानले.
यावेळी डॉ.आर.जी. दांडगे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, डॉ.एम.ए. अनुसे, डॉ.एन.पी. सोनजे, उदय गायकवाड, प्रा.पद्मजा पाटील, डॉ.अवनीश पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment