कोल्हापूर दि. ८ डिसेंबर: इंग्रजी
राजवटीविरुद्ध जनमत संघटित करण्याच्या कामी उषा मेहता यांनी मोलाचे योगदान दिले.
त्याचप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात विद्यार्थी आणि महिलांचे योगदान अत्यंत
महत्त्वाचे आहे, अशा भूमिकेतून या घटकांना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्यास प्रेरित
करण्यास त्यांनी प्राधान्य दिले, असे प्रतिपादन मुंबईच्या मणी भवन येथील प्रा.उषा ठक्कर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या वतीने आयोजित उषा मेहता स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत पहिल्या व्याख्यानात '१९४२ची चळवळ आणि उषा मेहता' या विषयावर प्रा. ठक्कर बोलत होत्या. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील नीलांबरी सभागृहात झालेल्या या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा.अशोक चौसाळकर होते.
Prof. Usha Thakkar |
प्रा. ठक्कर म्हणाल्या, स्थानिक भाषेबरोबरच इंग्रजी भाषा आत्मसात केल्यास जगाचे ज्ञान आपल्या कवेत घेणे शक्य होईल, असे उषा मेहता यांचे म्हणणे होते. १९४२मध्ये मुंबईमधील विविध ठिकाणाहून काँग्रेस रेडिओच्या न्यूज बुलेटीनद्वारे देशबांधवांमध्ये इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुध्द जनजागृती करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत असत. न्यूज बुलेटीन सादर करण्यासाठी अनेक अडथळे पार करताना इंग्रजींच्या वक्रदृष्टीपासून लांब राहण्यासाठी न्यूज बुलेटीन केंद्र अनेक वेळेस त्यांना बदलावे लागले. यासाठी अनेक क्लृप्त्या त्यांनी शोधून काढल्या. स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुरुषांच्या बरोबरीने अत्यंत प्रखरपणे लढा दिला.
स्त्रियांमध्ये असलेल्या चाणाक्ष बुद्धीचातुर्याचा उपयोग त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये चलाखीने करुन घेतला. महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून खादी परिधान करण्यास सुरुवात केली आणि हे व्रत आजीवन पाळले. शेतकऱ्यांच्या अधिकारांचा सन्मान केला पाहिजे, असे त्या नेहमी म्हणत.
न्यूज बुलेटीन सादर करताना १२ नोव्हेंबर १९४२ रोजी त्यांना अटक झाली. त्यांना आर्थर आणि येरवाडा तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. चार वर्षांचा कारावास झाला. उषा मेहता यांना त्यांच्या आईचा मोठा पाठिंबा होता. त्यामुळे त्या स्वातंत्र्य संग्रामापासून कधीच अलिप्त राहिल्या नाहीत.
प्रा.अशोक चौसाळकर अध्यक्षीय
भाषणात म्हणाले, शिवाजी विद्यापीठात गांधी अभ्यास केंद्र सुरु करण्यामध्ये युजीसी समिती सदस्य म्हणून उषा मेहता यांचा महत्त्वाचा वाटा आहे. उषा मेहता यांनी लिहून ठेवलेले प्रबंध अद्यापही प्रकाशित झालेले नाहीत. तो प्रबंध प्रकाशित होऊन त्यामधील बाबींचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. तुरुंगवासाच्या काळात त्यांची पचनशक्ती नष्ट झाली. आयुष्याची ८० वर्षे त्या सातत्याने कार्य करीत होत्या. समाजातील सर्व प्रकारच्या प्रश्नांवर त्या तळमळीने चर्चा करीत असत. मुंबई विद्यापीठात पीएच.डी.च्या मार्गदर्शक असताना एक-एक शब्दासाठी त्या दहा-दहा मिनिटे विचार करीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी.पूर्ण केली. अत्यंत विद्यार्थीप्रिय असणाऱ्या उषा मेहता नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या.
गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक
केले. सूत्रसंचालन सूर्यकांत गायकवाड यांनी केले, तर डॉ.रविंद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ. अरुणा पेंडसे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment