कोल्हापूर, दि. २७
डिसेंबर: शेती जीवनाच्या दुरवस्थेचे चित्रण हा माझ्या कथेचा केंद्रबिंदू आहे, असे
प्रतिपादन ज्येष्ठ कथालेखक भास्कर चंदनशीव यांनी आज येथे काढले. शिवाजी
विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात साहित्य अकादमीच्या सहकार्याने आयोजित करण्यात
आलेल्या ‘कथासंधी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या
वि.स. खांडेकर सभागृहात झालेल्या कथासंधी उपक्रमांतर्गत श्री. चंदनशीव यांनी
श्रोत्यांशी मुक्त संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी आपल्या ‘लाल चिखल’ या कथेची निर्मिती
प्रक्रिया उलगडून दाखविली. ते म्हणाले, वास्तव आणि कल्पित यांच्या सरमिसळीतून माझी
कथा साकार झाली आहे. ग्रामीण शेती जीवनाच्या दुरवस्थेने मला, माझ्यातील कथालेखकाला
अस्वस्थ केले. त्या अस्वस्थतेचा हुंकार माझ्या लेखनात स्वाभाविकपणे प्रकटला.
महात्मा फुले, महर्षी वि.रा. शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव आहेच, पण त्याच बरोबर
शेतीसंस्कृतीची परखड चिकित्साही माझ्या कथालेखनात आहे.
यावेळी श्री.
चंदनशीव यांनी त्यांचा एकूण लेखन प्रवास, तीमधील टप्पे व लेखन प्रेरणा याविषयी
श्रोत्यांशी संवाद साधला. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने यांनी
प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. ‘लाल चिखल’ कथेचे वाचन डॉ. राजन गवस
यांनी केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी
सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, डॉ. सी.ए. लंगरे, आप्पासाहेब खोत, किरण
गुरव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment