Showing posts with label Sahitya Akademy. Show all posts
Showing posts with label Sahitya Akademy. Show all posts

Wednesday, 28 December 2016

सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती: डॉ. अरुणा ढेरे





कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाच्या सदस्य डॉ. अरुणा ढेरे यांनी आज येथे व्यक्त केले.
Dr. Aruna Dhere
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग व साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन चळवळी आणि स्त्रियांचे प्रश्न या विषयावरील चर्चासत्रात बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हे एकदिवसीय चर्चासत्र पार पडले.
डॉ. ढेरे म्हणाल्या, निषेधाच्या आणि परिवर्तनवादी, मानवतावादी चळवळींतून मराठी साहित्यपरंपरा आविष्कृत होत आली आहे. भक्तीचळवळीपासून ते स्त्री असमिता चळवळीपर्यंत लेखिकांनी नवे समाजभान प्रकट केले आहे. धर्म सुधारणा, महिलांचे प्रश्न ते स्त्री शोषणाच्या अस्मितेचे कंगोरे मराठीतील लेखिकांनी वेळोवेळी प्रकट केले आहेत.
डॉ. पी.ए. अत्तार यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव डॉ. कृष्णा किंबहुने यांनी स्वागत केले, तर मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. दुपारच्या विविध सत्रांत डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. शरयू असोलकर, सोनाली नवांगुळ, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. मेघा पानसरे व डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्त्री साहित्यासंबंधीच्या विविध विषयांवर निबंधवाचन केले. डॉ. रोहिणी तुकदेव व डॉ. शोभा नाईक यांनी या सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नीला जोशी व सुश्मिता खुटाळे यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले.

Tuesday, 27 December 2016

शेतीजीवनाची दुरवस्था माझ्या लेखनाच्या केंद्रस्थानी: भास्कर चंदनशीव




कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शेती जीवनाच्या दुरवस्थेचे चित्रण हा माझ्या कथेचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथालेखक भास्कर चंदनशीव यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात साहित्य अकादमीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कथासंधी या कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात झालेल्या कथासंधी उपक्रमांतर्गत श्री. चंदनशीव यांनी श्रोत्यांशी मुक्त संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी आपल्या लाल चिखल या कथेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखविली. ते म्हणाले, वास्तव आणि कल्पित यांच्या सरमिसळीतून माझी कथा साकार झाली आहे. ग्रामीण शेती जीवनाच्या दुरवस्थेने मला, माझ्यातील कथालेखकाला अस्वस्थ केले. त्या अस्वस्थतेचा हुंकार माझ्या लेखनात स्वाभाविकपणे प्रकटला. महात्मा फुले, महर्षी वि.रा. शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव आहेच, पण त्याच बरोबर शेतीसंस्कृतीची परखड चिकित्साही माझ्या कथालेखनात आहे.
यावेळी श्री. चंदनशीव यांनी त्यांचा एकूण लेखन प्रवास, तीमधील टप्पे व लेखन प्रेरणा याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. लाल चिखल कथेचे वाचन डॉ. राजन गवस यांनी केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, डॉ. सी.ए. लंगरे, आप्पासाहेब खोत, किरण गुरव आदी उपस्थित होते.