Monday, 26 December 2016

‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेची ‘युनिव्हर्सिटी न्यूज’कडून दखल





कोल्हापूर, दि. २६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या पावसाळ्यात कॅम्पसवर राबविलेल्याजलयुक्त विद्यापीठ या जलसंधारण मोहिमेची असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजकडून (ए.आय.यू.) दखल घेण्यात आली आहे. ए.आय.यू.च्या युनिव्हर्सिटी न्यूज या साप्ताहिकाच्या ताज्या अंकात या विषयी लेख प्रकाशित झाला आहे.
युनिव्हर्सिटी न्यूजचा नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१६ (खंड ५४, क्र. ४८) या कालावधीतील अंकात वॉटर कॉन्झर्व्हेशन इन कॅम्पस: ॲन इनिशिएटिव्ह ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी विद्यापीठात जलव्यवस्थापनाची केलेली कामे सर्वच विद्यापीठांसाठी आदर्शवत आहेत, असे यात म्हटले आहे.
शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी कॅम्पसमध्ये जलसंधारणाची अनेक कामे केली. यामध्ये दोन विहीरींच्या पुनरुज्जीवनासह तीन शेततळ्यांच्या कामाचा मुख्यत्वे समावेश होता. या कामी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध महाविद्यालयांचे शारिरीक शिक्षण संचालक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे पहिल्या पावसातच विद्यापीठ कॅम्पसवर ३० कोटी लीटर पाणी साठविण्यात यश आले. शिवाजी विद्यापीठाची ही जलयुक्त कॅम्पस मोहिमेची यशोगाथा जिल्हा प्रशासनासह सर्वच पातळ्यांवर वाखाणली गेली. माध्यमांनीही या कामाची प्रशंसा केली.
विद्यापीठाच्या या कामाची आता थेट ए.आय.यू.ने दखल घेतल्यामुळे अधिक उत्तम काम करण्यास बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment