डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ओंकार
गुरवचे यश
Omkar Gurav |
कोल्हापूर, दि. ३१: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक लष्करी सेवा (कम्बाईड डिफेन्स सर्व्हिस) परीक्षेमध्ये शिवाजी
विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या ओंकार अनंत गुरव याने यश मिळविले असून त्याची लष्करी
सेवेत निवड झाली आहे. ओंकारचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील हसुरसासगिरी असून सध्या विद्यापीठाच्या डिपार्टमेंट
ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) सन २०१७ मध्ये देशपातळीवर परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण
झालेल्या पहिल्या शंभर उमेदवारांची डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अॅकॅडमी
(आयएमए) येथे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत
ओंकार याने ९७वे स्थान मिळवून ‘आयएमए’मध्ये आपले स्थान पक्के केले.
डेहराडून येथील दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ओंकार गुरव भारतीय लष्करात
लेफ्टनंट पदावर रुजू होईल.
ओंकारचे प्राथमिक शिक्षण पिंपरी येथील जयहिंद विद्यालय आणि एसएनबीपी स्कूलमध्ये झाले आहे. ओंकारची आई माधवी गुरव स्टेट
बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील शाखेमध्ये व्यवस्थापक पदावर, तर वडील डॉ. अनंत गुरव दैनिक ‘सामना’मध्ये उपसंपादकपदी कार्यरत
आहेत.
ओंकारची कामगिरी अभिमानास्पद: कुलगुरू डॉ. शिंदे
ओंकार गुरव याने
अभियांत्रिकीचा अभ्यास करत असतानाच सीडीएस परीक्षेत यश मिळविले आहे. ही त्याची
कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असून विद्यापीठासह सर्वच महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. राज्य सेवा आणि केंद्रीय सेवा
परीक्षांच्या पलिकडेही विविध क्षेत्रांत तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध असून त्यांचा
शोध आणि वेध घेण्याची गरज आहे. तसे केल्यास यश निश्चितपणे मिळते, हेच ओंकार याच्या
यशातून अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी
व्यक्त केली.