Saturday, 26 May 2018

बृहत आराखडा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा आरसा - कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.देवानंद शिंदेव्यासपीठावर (डावीकडून) डॉ.मिलींद सोहानी, प्राचार्य अनिल राव, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, विद्यापीठाचे   माजी कुलगुरू डॉ.एन.जे.पवारडॉ.बी.एन.जगताप, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील.
कोल्हापूर, दि.26 मे - बृहत आराखडा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा आरसा असतो. निश्चितपणे हे लक्ष आराखडयामध्ये प्रतिबिंबीत झाले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ यांचेकरिता  शैक्षणिक वर्ष सन 2019-20 ते 2023-24 या कालावधीचा पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन करताना कुलगुरु डॉ.शिंदे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, विद्यापीठाचे माजी कुलगुरू महाराष्ट्र शासन नियुक्त बृहत आराखडा समिती सदस्य डॉ.एन.जे.पवार यांचेसह डॉ.बी.एन.जगताप, प्राचार्य अनिल राव, डॉ.मिलींद सोहानी, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील उपस्थित होते.
कुलगुरु डॉ.शिंदे पुढे म्हणाले, आजची कार्यशाळा बृहत आराखडाच्याबाबतीत जागृकता आणि कृती यांचे समन्वय करणारी ठरणार आहे.  कृतीशील आराखडा तयार करण्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शन लाभणार आहे  महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाने पाच वर्षांकरिता बृहत आराखडा तयार करावयाचा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे मान्यता मिळविण्याचा आहे, असे त्याचे स्वरूा आहे.  या ब्रहत आराखडयामध्ये मान्यताप्राप्त संस्था, विविध विद्याशाखा यांचा आंतर्भाव आहे.  जागतिक दर्जाची विद्यापीठे आपल्याकडे येत आहेत ओघाने स्पर्धात्मक स्वरूपात वाढ होणार आहे.  त्याअनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर येत आहे. बृहत आराखडा सर्व समावेशक होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने जिल्हानिहाय समिती निर्माण केलेल्या आहेत.  यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, लोकप्रतिनिधी, जिल्हा उद्योग प्रतिनिधी, अधिकार मंडळांचे सदस्य या सर्वांची समावेशक भूमिका घेवून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
 विद्यापीठ क्षेत्रातील भौगोलीक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, शिक्षणामध्ये होणारे बदल या सर्वांचा विचार होवून विद्यापीठाचा विद्यार्थी स्पर्धेमध्ये कोठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली आहे.कला शाखेमध्येे गुन्हेगारांचा अभ्यास, प्रशासन, अनुवाद, संरक्षण या क्षेत्रांना भविष्यामध्ये फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे.  अभियांत्रिकी शाखेपेक्षा वाणिज्य शाखेकडे मुलांचा कल वाढत आहे.  त्यासाठी काही नवीन विषय पुढे येत आहेत.  मोठया उद्योगांसाठी आवश्यक असलेले महत्वाचे विषय घेण्याचा विचार होत आहे.  शास्त्रशाखेमध्ये बीएससी इकॉनॉमिक्स हा विषय घेवून येत आहोत.  म्युझियालॉजी, बीएससी रिसर्च मॅनेजमेंट हे विषय पुढे येत आहेत.  शासन नियुक्त समितीमुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये बृहत आराखडा तयार करण्यासंदर्भात सुसूत्रता निर्माण होत आहे.
 यावेळी, पुढील पाच वर्षांकरिता विद्यापीठाच्या विकासाचा दृृष्टीकोन कसा असावा याचे विस्तृत मार्गदशर्न माजी कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी केले.
 प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी स्वागत प्रास्ताविक केले.अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव, अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील यांचेसह शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, संस्था चालक, विविध अधिकार मंडळांचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                              
                                                       

No comments:

Post a Comment