Saturday 19 May 2018

शिवाजी विद्यापीठाच्या रोजगार महामेळाव्यात साडेपाच हजारांहून अधिक उमेदवारांना रोजगार


कोल्हापूर, दि. १९ मे: शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार व कौशल्य महामेळाव्यात आज दिवसभरात एकूण १७ हजार २६९ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून ३९३६ उमेदवारांना विविध कंपन्यांनी पुढील फेरीसाठी निवडले (शॉर्टलिस्ट) आहे, तर १६९८ उमेदवारांना ऑफर लेटर अगर नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. ही माहिती समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी दिली.
विद्यापीठात सुमारे १२२ कंपन्यांनी विविध ९,५३९ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूण २३ हजार ७३९ उमेदवारांनी या मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. त्यांच्यापैकी १७ हजार २६९ उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यातून या निवडी करण्यात आल्या आहेत. लोककला केंद्रात ६५०० उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षणही प्रदान करण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे डॉ. गजानन राशिनकर, महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक विजय माळी, अशोक खेडेकर, सांगलीच्या कौशल्य विकास केंद्राचे सहायक संचालक एस.के. माळी, सातारा केंद्राचे सचिन जाधव, ऑपॉर्च्युनिटी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे अमर संकपाळ, सोलमॅन आयटी सर्व्हिसेसचे विजय कुमार व राजेंद्र मुधाळे यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिविभागांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि सेवक यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment