११०हून अधिक कंपन्यांचा विक्रमी सहभाग;
५०हून अधिक कौशल्यांचे प्रदान
होणार
कोल्हापूर, दि. १७ मे: शिवाजी विद्यापीठात येत्या शनिवारी (दि.
१९ मे) आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य व रोजगार महामेळाव्यासाठी गुरूवारअखेर सुमारे
११०हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून त्याअंतर्गत सुमारे ८५०० रोजगार संधी
उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे या मेळाव्याअंतर्गत तीसहून अधिक क्षेत्रांशी
निगडित ५०हून अधिक कौशल्यांचे प्रदानही युवकांना करण्यात येणार आहे. या
महामेळाव्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात सुमारे दहा हजार उमेदवारांनी नोंदणी
केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक
डॉ. ए.एम. गुरव यांनी दिली आहे.
डॉ. गुरव यांनी
दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र व मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्या संयुक्त विदयमाने येत्या शनिवारी (दि. १९) कौशल्य व रोजगार महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी व विविध कौशल्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विद्यापीठातील नऊ अधिविभागांच्या इमारतींमध्ये या कंपन्यांच्या मुलाखतींचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, कौशल्य प्रदान स्टॉल व स्पॉट नोंदणी लोककला केंद्रात केली जाणार आहे.
विविध कंपन्यांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात
येत असलेल्या अधिविभागांची नावे, कंसात कंपन्यांचे क्षेत्र व त्यांच्याकडून उपलब्ध
असलेल्या रोजगार संधी या क्रमाने पुढीलप्रमाणे-
१. रसायनशास्त्र अधिविभाग (आय.टी. व बी.पी.ओ.
क्षेत्रांतील १४ कंपन्या, रोजगार १२८३),
२. वनस्पतीशास्त्र अधिविभाग (सेवा क्षेत्र, एच.आर.,
डी.टी.पी. ६ कंपन्या, रोजगार १६०),
३. इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग (बँकिंग, विमा व
वित्तीय संस्था- ४, रोजगार ४८),
४. वि.स. खांडेकर भाषा भवन (इतर क्षेत्रे- ६
कंपन्या, ७० रोजगार),
५. भौतिकशास्त्र अधिविभाग (विविध ४ कंपन्या,
रोजगार १६२),
६. गणित अधिविभाग (विक्री, वस्त्रोद्योग,
टेलिकॉम- २१ कंपन्या, रोजगार १२१०)
७. मानव्यशास्त्र इमारत (विपणन, बँकिंग,
फायनान्स- १४ कंपन्या, रोजगार ३५३९)
८. तंत्रज्ञान अधिविभाग (अभियांत्रिकी, कारागीर,
तंत्रज्ञ, सीएनसी, व्हीएनसी- ४० कंपन्या, १७६४ रोजगार)
९. भूगोल अधिविभाग (इतर क्षेत्रे- ५ कंपन्या, रोजगार
१००)
महामेळाव्याच्या आयोजनाची तयारी अंतिम
टप्प्यात आली असून मेळावा सुरळीतपणे पार पडण्यासाठी अधिविभागनिहाय समित्यांकडे
जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अशी सुमारे २०० स्वयंसेवकांची टीम या
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कार्यरत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे उमेदवारांना विद्यापीठात येणे सोयीचे व्हावे, यासाठी केएमटी
प्रशासनास ज्यादा बस सोडण्याबाबत कळविले आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तही
तैनात ठेवण्याबाबत पोलीस प्रशासनासही विनंती करण्यात आली आहे.
महामेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी
आपल्या सोबत बायोडाटाच्या किमान तीन प्रती, स्वतःची पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
तसेच पाण्याच्या बाटल्याही आणाव्यात. आयोजकांसह ठिकठिकाणी उपस्थित असणाऱ्या
स्वयंसेवकांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे; विद्यापीठाच्या
परिसरात काटेकोरपणे स्वच्छता बाळगावी. तसेच, या महामेळाव्यास उमेदवार विक्रमी
संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता सर्वच उमेदवारांनी शांतता, शिस्त व
संयम बाळगून विद्यापीठ प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. गुरव यांनी केले
आहे.
या संदर्भातील अधिक माहितीसाठी डॉ. ए. एम. गुरव (9850012545, 0231-2609173) आणि डॉ. जी. एस. राशीनकर (09823113269) यांच्याशी संपर्क साधावा.
उमेदवारांनी शिस्त व स्वच्छता बाळगावी: कुलगुरू डॉ. शिंदे
आयटीआयपासून ते
पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये तसेच रोजगार
संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता केंद्र
तसेच मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात
उपलब्ध रोजगार संधी व कौशल्यांचा लाभ विद्यापीठ परिक्षेत्रातील हजारो
विद्यार्थ्यांना होणार आहे. या मेळाव्यास किमान १५ हजार उमेदवार उपस्थित
राहतील, अशी शक्यता गृहित धरून विद्यापीठ प्रशासनाने आवश्यक ते नियोजन करण्याची दक्षता
घेतली आहे. तरीही या मेळाव्यास योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून उमेदवारांनी
विद्यापीठ परिसरात संयम, शिस्त व स्वच्छता बाळगून विद्यापीठ प्रशासनास सहकार्य
करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.
---
No comments:
Post a Comment