'कोविड-१९'विषयक ऑनलाइन मार्गदर्शन सत्रातील एक स्लाईड |
'कोविड-१९'विषयक ऑनलाइन मार्गदर्शन सत्रातील एक स्लाईड |
कोल्हापूर, दि. २३ एप्रिल: ‘कोविड-१९’ साथीच्या काळात थेट रस्त्यावर न उतरता सुद्धा
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा खूप
मोठ्या प्रमाणावर सामाजिक योगदान देता येऊ शकते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि युनिसेफ यांच्या
संयुक्त विद्यमाने आज दुपारी ३
ते ५ या कालावधीत कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत युट्यूबच्या माध्यमातून
ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बीजभाषण करताना कुलगुरू डॉ. करमळकर बोलत
होते.
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, कोविड-१९च्या साथीने
जगभरातच अक्राळविक्राळ स्वरुप धारण केले आहे. त्यामुळे सर्वच पाथळ्यांवर त्याबाबत
चिंतेचे वातावरण आहे. या साथीचे स्वरुप आणि त्या कामी राष्ट्रीय सेवा योजनेचे
योगदान या संदर्भात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंथन व कार्यही सुरू आहे. विशेषतः
राज्यपाल महोदयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपत्ती व्यवस्थापन युनिटच्या
माध्यमातून या प्रसंगी सहभाग द्यावा, असे आवाहन कुलगुरूंच्या बैठकीमध्ये केले.
त्यानुसार, एव्हाना सर्वच विद्यापीठांमधील एनएसएस कक्ष गतिमानतेने या परिस्थितीत
योगदान देत आहे. तथापि, एनएसएसच्या स्वयंसेवकांना तसेच अन्य विद्यार्थ्यांना
सुद्धा प्रत्यक्ष रस्त्यावर न उतरता देखील या साथीविरोधातील लढाईत आपले योगदान
देता येणे शक्य आहे. पुणे विद्यापीठाच्या एनएसएसचे कोणीही स्वयंसेवक रस्त्यावर
नाहीत, मात्र अप्रत्यक्ष योगदान देण्यात ते आघाडीवर आहेत. यामध्ये हे विद्यार्थी
चार प्रकारे आपले योगदान देत आहेत. त्यामध्ये गुगल अॅप तयार करून त्या माध्यमातून
रक्तदाते व रक्तगट यांची यादी तयार करण्याचे मोठे काम करण्यात आले आहे. त्याखेरीज विद्यार्थी
आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना
भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे इत्यादी स्वरुपाची कामे
आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात. सॅनिटायझर ही आजच्या काळातली फार मोठी
गरज बनली आहे. त्यामुळे संलग्नित महाविद्यालयांतील विज्ञान अधिविभागांतून
सॅनिटायझर निर्मिती करण्यास सुरवात झाली आहे. पोलीस कर्मचारी, आरोग्य क्षेत्रातील
डॉक्टर, सेवक, परिचारक आदी कोविड वॉरियर्सना या सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात येणार
आहे. मास्क निर्मिती ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थी घरबसल्या मास्क
तयार करून परिसरातल्या नागरिकांसह कोविड वॉरियर्सना त्याचा पुरवठा करू शकतात. अशा
अनेक पद्धतींनी एनएसएस स्वयंसेवकांना या साथीच्या काळात आपले योगदान देता येणे
शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण सत्राचा समारोप शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाने झाला. डॉ. शिंदे म्हणाले, मानवनिर्मित
अगर नैसर्गिक संकटाच्या काळात शिवाजी विद्यापीठ पूर्ण क्षमतेने पुढाकार घेऊन त्या
संकटावर मात करण्यासाठी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून
काम करीत असते. गतवर्षी येऊन गेलेला महापूर असो की सध्याची कोरोनाची साथ. या सर्व
परिस्थितीत विद्यापीठाच्या एनएसएसने प्रचंड स्वरुपाचे योगदान दिलेले आहे. सध्याच्या
संकट काळात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा
योजना (NSS) यांचे स्वयंसेवक व स्वयंसेविकांवर
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी निभावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या
युद्धात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी उतरले
असून प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत
आहेत. एन.एस.एस.चे सुमारे २८,०००
स्वयंसेवक फेसबुक, व्हॉट्सअप यांसह इतर सोशल मीडियाचा वापर करत ५० लाखांहून अधिक
लोकांपर्यँत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पोहोचत आहेत. अगदी
नागरिकांच्या कौटुंबिक अडीअडचणींची माहिती घेऊन अनेक वेळा स्वतः तर काही वेळा
प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना तत्परतेने मदत करत आहेत. गरजू, फिरस्ते, गावोगावचे
असहाय ज्येष्ठ नागरिक, अनाथ, दिव्यांग
इत्यादी लोकांच्या मदतीला जात आहेत. लोकांना सॅनिटायझर्स,
मास्क यांचे वितरण, किराणा, भाजीपाला, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा
पुरवठा आदी महत्वाची कामे एनएसएसचे स्वयंसेवक करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवाजी
विद्यापीठाच्या वसतिगृहांत १००० बेडचे आयसोलेशन केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू
केले गेले आहे. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्याही याचे नागरिकांवर विपरित परिणाम
सामोरे येत आहेत. त्या दृष्टीने समुपदेशन सेवाही विद्यापीठाद्वारे पुरविली जात
आहे. दिवसाला पाच ते दहा फोन या कक्षाकडे प्राप्त होत असून संवादातून त्यांना
योग्य प्रकारे समुपदेशन देण्याचे कामही विद्यापीठ करीत आहे, अशी
माहितीही त्यांनी दिली.
या प्रशिक्षण सत्रात एनएसएसच्या महाराष्ट्र
व गोवा विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. डी. कार्थिजेन, राज्य समन्वयक डॉ. अतुल
साळुंखे, युनिसेफच्या अधिकारी डॉ.अपर्णा देशपांडे, डॉ. ज्योती पोटारे, डॉ.
जी.के. पांडगे, डॉ. राजलक्ष्मी नायर आणि डॉ. स्वाती मोहपात्रा यांनी कोरोनाशी निगडित विविध
विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले. या ऑनलाइन प्रशिक्षणात एनएसएसचे राज्यभरातील समन्वयक, स्वयंसेवक, संलग्नित महाविद्यालयांतील आजी-माजी स्वयंसेवक- स्वयंसेविका आजी- माजी
विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही मोठ्या
संख्येने सहभागी झाले.
(हे सत्र युट्यूबच्या https://www.youtube.com/watch?v=zFrQ73nHHYI&feature=youtu.be या लिंकवर उपलब्ध आहे. इच्छुक त्याचा लाभ घेऊ शकतात.)