कोल्हापूर, दि. ७ एप्रिल: सध्या कोरोना
विषाणू साथीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे डिजीटल साधनांच्या
द्वारे आर्थिक तसेच संवाद व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे सायबर व फिशिंग अॅटॅक
होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने येत्या शुक्रवारी
(१० एप्रिल) सायबर सिक्युरिटीविषयक एकदिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
केले आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेची ऑनलाइन नोंदणी सुरू होताच पहिल्या तासाभरातच
देशभरातून सुमारे ८७ इतकी विक्रमी नावनोंदणी झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या
सायबर सिक्युरिटी व डाटा सायन्सेस फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राचे संचालक डॉ.
आर.के. कामत यांनी दिली आहे.
डॉ. आर.के. कामत यांनी दिलेल्या
माहितीनुसार, जगभरात कोरोना तथा कोविड-१९ या विषाणूचा उद्रेक झाल्याने अन्य
देशांप्रमाणेच भारतामध्येही गंभीर स्थिती लक्षात घेता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसून या विषाणूचा प्रतिकार करावा
लागत आहे. जवळपास सर्वच आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा
सल्ला दिला आहे. त्यामुळे बहुतेक जणांना डिजीटल साधनांचा आधार घेऊनच काम करावे
लागत आहे. त्याचप्रमाणे मोबाईल रिचार्जपासून ते विविध बिल पेमेंटपर्यंत जवळपास
सर्वच आर्थिक व्यवहार ऑनलाईन करावे लागत आहेत. या व्यवहारांत जशी वाढ झाली, त्याच प्रमाणात
सायबर व फिशिंग हल्ल्यांमध्येही वाढ झाल्याची प्रकरणे सामोरी येत आहेत. त्यामुळे
या संदर्भात जनजागृती व योग्य सुरक्षाविषयक दक्षता कशी घ्यावी, याची विस्तृत
माहिती देण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पंडित मदनमोहन मालवीय
शिक्षक व शिक्षणविषयक राष्ट्रीय अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठात कार्यरत
असलेल्या सायबर सिक्युरिटी व डाटा सायन्सेस फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राच्या वतीने
येत्या १० एप्रिल २०२० रोजी सायबर सिक्युरिटीविषयक एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा
आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी सुरू होताच सुमारे ८७ जणांनी नोंदणी केली. ‘नॅसकॉम’
मान्यताप्राप्त स्कील्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लि. आणि टाटा कम्युनिकेशन्स यांच्या
सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत इन्ट्रोडक्शन टू
सायबर सिक्युरिटी, सायबर अॅटॅक्स क्लासिफिकेशन आणि स्मार्टफोन अँड पेमेंट
सिक्युरिटी या विषयांवर ख्यातनाम तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेबाबत
अधिक माहितीसाठी http://sangnaksuraksha.com/ या वेबसाईटला भेट
द्यावी, असे आवाहन डॉ. कामत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment