Friday, 10 April 2020

कोरोनाच्या साथीला मात देण्यासाठी ‘एनएसएस’ची फौज प्रशासनाच्या साथीला! : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे




कोल्हापूर, दि. १० एप्रिल: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या साथीला रोखण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे २८ हजार स्वयंसेवक नागरिकांच्या सेवेसाठी आणि प्रशासनाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीसाठी तत्पर आहेत. ही कामे करीत असताना त्यांनी नागरिकांबरोबरच स्वतःच्या आरोग्याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे की, मानवनिर्मिती अगर नैसर्गिक संकटाच्या काळात शिवाजी विद्यापीठ पूर्ण क्षमतेने पुढाकार घेऊन त्या संकटावर मात करण्यासाठी  सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करीत असते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहांत १००० बेडचे आयसोलेशन केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले जात आहे.
सध्याच्या संकट काळात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या स्वयंसेवक व स्वयंसेविकांवर कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी आली आहे. या युद्धात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी उतरले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी नमूद केले आहे.
एन.एस.एस.चे सुमारे २८,००० स्वयंसेवक फेसबुक, व्हॉट्सअप यांसह इतर सोशल मीडियाचा वापर करत ५० लाखांहून अधिक लोकांपर्यँत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पद्धतीने पोहोचत आहेत. अगदी नागरिकांच्या कौटुंबिक अडीअडचणींची माहिती घेऊन अनेक वेळा स्वतः तर काही वेळा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना तत्परतेने मदत करत आहेत. गरजू, फिरस्ते, गावोगावचे असहाय ज्येष्ठ नागरिक, अनाथ, दिव्यांग इत्यादी लोकांच्या मदतीला जात आहेत. लोकांना सॅनिटायझर्स, मास्क यांचे वितरण, किराणा, भाजीपाला, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी महत्वाची कामे NSS चे स्वयंसेवक करत आहेत. 
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाच्या मदतीसाठी हेल्पलाईनमध्ये काम करण्यासाठी  इच्छुक स्वयंसेवकांची पालकांच्या परवानगीने नोंदणी सुरू आहे. यासाठी स्वतंत्र गुगल रजिस्ट्रेशन फॉर्म तयार केला आहे. त्याद्वारे स्वयंसेवकांनी नोंदणी करावी आणि या राष्ट्रीय आपत्तीच्या क्षणी आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.
मात्र, त्याचवेळी कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे आपण सारेच त्रस्त आहोत. सद्यस्थिती पाहता लॉकडाऊनच्या कालावधीत सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची व बळींची संख्या वाढतीच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरणे, साबणाने हात धुणे आदी दक्षता आपण व्यक्तीगत व कौटुंबिक स्तरावर घेणे अत्यावश्यक आहे. त्या आपण आवर्जून घ्याव्यात. स्वतःच्या आरोग्यविषयक दक्षता जबाबदारपूर्वक घेण्याचे भानही बाळगावे, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment