Saturday, 31 October 2020

सरदार पटेल, महर्षी वाल्मिकी, इंदिरा गांधी यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 



कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि आद्य महाकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती  आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी या निमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सरदार पटेल, महर्षी वाल्मिकी आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. रविंद्र भणगे, हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. चव्हाण यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सद्भावनेची शपथ दिली.


Wednesday, 21 October 2020

शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी

एक कोटी निधी वितरणाची कार्यवाही तातडीने

विद्यापीठ आढावा बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

 कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर नजीकच्या काळात तातडीने करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर केलेल्या विविध प्रकल्पांसाठीचा निधी प्रदान करण्याविषयी शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विद्यापीठाच्या विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला आणि ते मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे सर्वच संबंधित घटकांना निर्देश दिले.

या बैठकीस शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कोल्हापूर विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे छोटे मोठे सर्व प्रलंबित प्रश्न पूर्णतः सोडविले जावेत, अशी माझी भूमिका आहे. त्यासाठी शासकीय स्तरावर जे काही प्रलंबित प्रश्न असतील, त्याबाबत संचालक, सहसंचालक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याची भूमिका घ्यायला हवी. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सुद्धा आपल्या प्रश्नांबाबत काही त्रुटी असल्यास त्यांची तातडीने पूर्तता करून ते सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करायला हवा. जेणे करून शासन स्तरावर प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

यावेळी मंत्री महोदयांनी शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध तातडीने सादर करण्याची सूचना केली. शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांच्या आकृतीबंधानुसार प्राप्त शासन निर्णयातील वेतन श्रेणीतील त्रुटींबाबत शासन स्तरावर आढावा घेऊन त्या दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. त्याचप्रमाणे प्रलंबित डीसीपीएस सानुग्रह अनुदानाबाबत सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी संचालकांना दिले आणि तो प्राप्त होताच या संदर्भातील स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असे सांगितले. ई-सेवार्थच्या अनुषंगानेही विद्यापीठांनी संचालकांमार्फत प्रकरणनिहाय माहिती सादर करावी. तो प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले.

Thursday, 15 October 2020

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात

माणूस म्हणून जाणीवा प्रगल्भतेसाठी वाचन संस्कृतीचा विकास महत्त्वाचा: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस

 

शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे 'मराठी वाचन दिना'निमित्त आयोजित ई-चर्चेत बीजभाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. 

शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे 'मराठी वाचन दिना'निमित्त आयोजित ई-चर्चेत उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: माणूस म्हणून स्वतःच्या जाणीवा सजग व प्रगल्भ होण्यासाठी वाचन संस्कृतीचे विकसन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मराठी वाचन संस्कृती या विषयावर ई-चर्चेमध्ये बीजभाषक म्हणून ते बोलत होते. उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के चर्चेत सहभागी झाले.

डॉ. गवस म्हणाले, आपल्या विविध शैक्षणिक धोरणांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा अपवाद वगळता वाचनाला केंद्रस्थानी फारसे कोणी आणण्याचा प्रयत्न केला नाही. वाचक घडविला नाही. प्रकट वाचन आणि मनन या पलिकडे आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करीत नाही. वाचन याचा अर्थ केवळ ग्रंथवाचन असा मर्यादित घेऊन आपण काम करीत राहतो. तथापि, ग्रंथवाचनाच्या पलिकडे भोवतालाचे वाचन करायला शिकणे, शिकविणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाचे वाचन, माणसाचे वाचन आपण कधी करायला शिकणार, हा कळीचा प्रश्न आहे. समाजात सभोवताली वावरणाऱ्या विविध घटकांतील चेहऱ्यांमागच्या भावभावना, त्यांच्या वेदना, दुःखे आपण जेव्हा वाचायला शिकू, शिकवू, तेव्हा खऱ्या अर्थाने वाचनाचे सकारात्मक लाभ समाजात दिसू लागतील. केवळ ग्रंथप्रामाण्यामुळे सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास अशक्य आहे. वाचनाकडे अशा बहुआयामी पद्धतीने पाह्यला हवे. त्यासाठी विविध पद्धती विकसित करून, वाचन संस्कृतीच्या रुजवातीसाठी सुपीक भुसभुशीत मनोभूमी तयार करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी उद्घाटनपर भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सजग, सकारात्मक वाचनाभिरुची विकसित होण्यासाठी समाजाशी नाळ जोडणारे वाचन आणि लेखन यांच्याशी नवी पिढी जोडली जाणे, समाजाच्या तळागाळातील घटकांच्या समस्यांशी, त्यांच्या वेदनांशी तिचे नाते जोडले जाणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या वेदनांशी जोडणारे साहित्य आणि वाचन यांची आजच्या पिढीमध्ये रुजवात व जोपासना होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. ए.पी.जे. कलाम यांनी हयातभर प्रयत्न केले. माणूस वाचण्याचे, माणूस घडविण्याचे शास्त्र त्यांनी खऱ्या अर्थाने जाणलेले होते. माणूस घडविण्यासाठी सकारात्मक व सकस वाचन आणि अभिव्यक्तीचे मोल त्यांना स्वानुभवाने ठाऊक झालेले होते. वाचनामुळेच तमिळनाडूतल्या एका छोट्याशा खेड्यातला गरीब कुटुंबातील मुलगा या देशाचा एक आघाडीचा शास्त्रज्ञ आणि पुढे राष्ट्रपतीही होऊ शकला, अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. म्हणूनच सर्व वयोगटातल्या युवकांना ते सातत्याने चांगले वाचण्याची, लिहीण्याची प्रेरणा देत राहिले. स्वतः त्यासाठी लिहीत राहिले. युवकांनी डॉ. कलाम यांच्याकडून हा गुण घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी विषयबाह्य वाचनाला प्राधान्य देऊन त्या प्रकारे आपली वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. वाचनाबरोबरच चांगले श्रवण करणेही महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा. नितीन रिंढे म्हणाले, वाचन विविध विषयांना स्पर्श करणारे हवे. साजरीकरणाच्या पलिकडे आपण वाचनाकडे कसे पाहतो, वाचन कसे करतो, याकडे लक्ष देणे ही आजची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे वाचनातून काय मिळवावे, हे सुद्धा शिकविण्याची आवश्यकता आहे. अमूर्त कल्पना करता येणे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येणे ही बाब वाचनातून साध्य करता आली पाहिजे. त्यासाठी माणसाच्या बौद्धिक व भावनिक जीवनाचा विकास होणे आवश्यक असते. हा विकास भाषा आणि वाचनाच्या माध्यमातून साध्य होतो. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे.

यावेळी साहित्यिक गणेश विसपुते म्हणाले, मराठी वाचनाची सुरवात ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून झाली. बाळशास्त्रींनीच १८४०मध्ये दिग्दर्शन नावाचे नियकालित सुरू केले. त्यानंतर काही वर्षांनी विविध ज्ञानविस्तार हे महत्त्वाचे नियतकालिक सुरू झाले. ते सुमारे ७० वर्षे चालले. १९३७मध्ये ते बंद पडले. या शंभर वर्षांच्या कालखंडाचा वेध घेत असताना मराठी वाचन आणि वाचक टप्प्याटप्प्याने प्रगल्भ होत गेल्याचे दिसते. जिज्ञासापूर्ती हा त्याचा मूलभूत गाभा राहिला. इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान समजावून घेण्याला आणि देण्याला त्यात प्राधान्य होते. या कालखंडात निर्माण झालेल्या वृत्तपत्रांनी समाजशिक्षणाचे काम हाती घेतले. मराठी साहित्याने परदेशी वाङ्मयव्यवहाराचे अनुवाद करून ते वाचकांपर्यंत पोहोचविले. या अनुवादित साहित्याने मराठी भाषा विविधांगांनी समृद्ध होण्यास मोठा हातभार लावला. महात्मा फुले, आगरकर यांनी सामाजिक प्रबोधनाचे एक क्रांतीकारी पर्व आरंभले. मराठी साहित्य निर्मिती आणि वाचन यांच्या या सुरवातीच्या कालखंडातील विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत. त्यांचा मोठा प्रभाव मराठी साहित्याच्या पुढील वाटचालीवरही दिसून येतो.

कार्यक्रमात मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले व आभार मानले. गुगल मीट तसेच फेसबुक लाइव्हद्वारे झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ११०० प्रेक्षक सहभागी झाले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 



कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: भारताचे माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जय बागी,  डॉ. अजित कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 9 October 2020

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन परीक्षा होतील: मंत्री उदय सामंत

"एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही"







कोल्हापूर, दि.९ :   अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन परीक्षा होतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील आढावा बैठकीत सांगितले.

यावेळी, खासदार संजय मंडलिक, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, सध्या जगावर कोरोनाचे संकट आल्यामुळे सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम झालेला आहे. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. या संकटावर मात करीत राज्यातील सर्वच विद्यापीठे आपल्या परीक्षा घेत आहेत. पोलीस, प्रशासन, आरोग्य आणि अशा सर्व यंत्रणा या परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षांच्या अनुषंगाने आज सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन सर्व नियोजन केले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंचही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यापीठाच्या या परीक्षा दिनांक १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणार आहेत. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. 

श्री. सामंत म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना २० मिनिटे अधिक मिळणार आहेत. तसेच या विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि उत्तम अशी परीक्षापद्धती तयार केली आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाईन सुरु केली आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील. 

सीमावर्ती भागात जानेवारी २०२१ मध्ये शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार असून यासाठी लागणाऱ्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे. या महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी शासनाकडून आवश्यक ते  सर्व सहकार्य केले जाईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


Thursday, 8 October 2020

‘शिवसंदेश’चा एक लाख हिट्सचा टप्पा सर

शिवाजी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाचा ऑनलाईन उपक्रम

 

शिवाजी विद्यापीठाच्या 'शिवसंदेश' ब्लॉगचे होम पेज.


'शिवसंदेश'वर सर्वाधिक हिट्स लाभलेल्या टॉप-१० वार्ता/वृत्तलेख व त्यांच्या हिट्सची आकडेवारी


कोल्हापूर, दि. ८ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या शिवसंदेश या वृत्तविषयक ब्लॉगने एक लाख हिट्सचा महत्त्वाचा टप्पा नुकताच पार केला आहे. विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाचा ऑनलाईन उपक्रम असलेल्या शिवसंदेश ब्लॉगने एक लाख ६४० हून अधिक हिट्स मिळविल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी जनसंपर्क कक्षामार्फत प्रसृत करावयाच्या महत्त्वाच्या वृत्तांसाठी/वृत्तलेखांसाठी दि. १ मार्च २०१६ रोजी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेने शिवसंदेश (www.unishivsandesh.blogspot.com) हा ब्लॉग सुरू केला. विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षामार्फत त्या पूर्वीही वृत्तपत्रांना व पत्रकारांना द्यावयाचा मजकूर हा पूर्णतः कागदविरहित पद्धतीने ई-मेलद्वारे पाठविण्यात येत असे. पण त्याचे स्वरुप वर्ड, पीडीएफ व जेपीजी फाईल स्वरुपात असावयाचे. तथापि, विद्यापीठाच्या महत्त्वाच्या वार्ता, छायाचित्रे कायमस्वरुपी जतन करण्याच्या कामी व कोणत्याही वेळी पाहण्यासाठी ब्लॉग अधिक उपयुक्त ठरला आहे.

आजपर्यंत शिवसंदेश ब्लॉगवर विद्यापीठाशी संबंधित सुमारे ५३० पोस्ट (वार्ता) प्रकाशित करण्यात आल्या आहेत. माध्यम प्रतिनिधींना कोणत्याही वेळी त्यांच्या सोयीनुसार व सवडीनुसार या ब्लॉगवर जाऊन विद्यापीठविषयक वार्ता व छायाचित्रे डाऊनलोड करून घेणे अधिक सोयीचे झाले आहे. या उपक्रमाला माध्यम प्रतिनिधींकडून सकारात्मक प्रतिसाद लाभल्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संबंधित शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी आदी घटकांना देखील विद्यापीठातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती व छायाचित्रे पाहता येऊ लागली. या सर्व घटकांच्या प्रतिसादामुळेच साडेचार वर्षांत एक लाख हिट्सचा टप्पा शिवसंदेशने पार केला.

जनसंपर्क अधिकारी डॉ. जत्राटकर यांनी पूर्वी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात असताना प्रथमच तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वार्तांसाठी www.bhujbalnews.blogspot.com हा ब्लॉग निर्माण केला होता. त्या उपक्रमाला प्रतिसाद लाभून अवघ्या वर्षभरात सुमारे २५ हजार हिट्स प्राप्त झाल्या होत्या. डॉ. जत्राटकर व्यक्तीगत पातळीवरही ब्लॉगलेखन करीत असतात. त्यांच्या प्रियदर्शन (www.priydarshan.blogspot.com) या ब्लॉगला आजवर सुमारे ८१,०११ आणि महा-मूव्ही (www.maha-movie.blogspot.com) या ब्लॉगला ५८,५०६ हिट्स अशा सुमारे एक लाख ६४ हजारांहून अधिक हिट्स लाभल्या आहेत.

शिवसंदेशच्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी समाधान व्यक्त केले असून विद्यापीठाच्या या कागदविरहित उपक्रमास दिलेला प्रतिसाद व प्रोत्साहन याबद्दल माध्यम प्रतिनिधींना धन्यवाद दिले आहेत.

महापुरूषांच्या दर्शनाने कुलगुरूंच्या कार्यकाळास प्रारंभ

परीक्षाविषयक नियोजनाचा घेतला आढावा

 

छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालताना कुलगुरू डॉ. शिर्के.

बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. शिर्के.


दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना डॉ. शिर्के.

विवेकानंद महाविद्यालय परिसरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीस्थळास पुष्प वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. शिर्के. शेजारी डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्यासह पदाधिकारी.

करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या कावळा नाका येथील पुतळ्यास अभिवादन करताना डॉ. शिर्के.



कोल्हापूर, दि. ८ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी महापुरूषांच्या दर्शनाने आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या दिवसाची सुरवात केली. त्यानंतर कार्यालयात सर्वप्रथम विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहून परीक्षाविषयक नियोजनाचा आढावा घेतला. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या.

आज सकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शहरातील बिंदू चौकापासून महापुरूषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतील पहिल्या दिवसाची सुरवात केली. बिंदू चौकातील महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे स्मृतीस्तंभास पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज, दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज, व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज, बसस्थानक परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कावळा नाका येथील करवीर संस्थान संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यांना पुष्प वाहून अभिवादन केले.

विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरातील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिस्थानास भेट देऊन पुष्प वाहून आदरांजली व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. शिर्के यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

परीक्षा नियोजनाचा आढावा

त्यानंतर विद्यापीठ कार्यालयात सर्वप्रथम परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीचे आयोजन करून कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यार्थ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा परीक्षाविषयक नियोजनाचा आढावा घेतला. परीक्षा मंडळाने केलेल्या तयारीची माहिती घेऊन परीक्षाविषयक कामकाज सुनियोजित व्हावे व परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात, या दृष्टीने दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी परीक्षा विभागास दिल्या.

नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

कुलगुरू डॉ. शिर्के पदभार स्वीकारल्यानंतर आज सकाळी प्रथमच शहरात आले. त्यावेळी बिंदू चौक येथील केएमटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी त्यांची भेट घेऊन उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले. शिवाजी चौक येथे शिवशाहू मर्दानी आखाड्याचे युवा कार्यकर्ते, रिक्षाचालक व नागरिकांनी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्या निवडीमुळे अत्यंत आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.

 

Wednesday, 7 October 2020

डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वीकारली कुलगुरू पदाची सूत्रे

 

शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून ज्ञानदंड स्वीकारून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारताना नूतन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज सायंकाळी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.

डॉ. डी.टी. शिर्के यांनी सायंकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास कुटुंबियांसमवेत अभिवादन केले. विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांना नूतन कुलगुरूंनी काल सायंकाळीच अभिवादन केले. त्यांच्यासमवेत पत्नी सौ. सुनिता आणि मुलगी श्रद्धा उपस्थित होत्या. डॉ. करमळकर यांनी डॉ. शिर्के यांचे स्वागत केले. त्यानंतर कुलगुरूंच्या दालनामध्ये नूतन कुलगुरूंकडे सूत्रे प्रदान करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. कार्यभाराच्या पत्रांचे हस्तांतरण व ज्ञानदंड स्वीकारून डॉ. शिर्के यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाचे तेरावे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.

कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांकडून नूतन कुलगुरूंनी सुहास्य वदनाने शुभेच्छांचा स्वीकार केला. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद व अधिसभा सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांना निरोप

प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अल्प कार्यकाळात शांत, समंजस व संयमी कारभाराचे प्रत्यंतर दिले. त्यामुळे त्यांची अल्प कारकीर्दही संस्मरणीय ठरली, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी डॉ. करमळकर यांचा गौरव केला. प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांना आज निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. डी.जी. कणसे, डॉ. भारती पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, अमित कुलकर्णी, डॉ. हेमांगी कुलकर्णी, पंकज मेहता, जी.बी. कोळेकर, बाबा सावंत आणि व्ही.टी. पाटील आदींनी डॉ. करमळकर यांच्याविषयी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली.

डॉ. करमळकर यांनी शिवाजी विद्यापीठातील आपली ही कारकीर्द स्मरणीय ठरली. सर्वच घटकांचे अत्यंत सौहार्दपूर्ण सहकार्य लाभले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, शिवप्रतिमा, शाल व ग्रंथभेट देऊन त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सौ. सुनिता शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य, विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी प्रास्ताविक  केले, तर परीक्षा संचालक जी.आर. पळसे यांनी आभार मानले.