Thursday, 15 October 2020

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात

माणूस म्हणून जाणीवा प्रगल्भतेसाठी वाचन संस्कृतीचा विकास महत्त्वाचा: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस

 

शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे 'मराठी वाचन दिना'निमित्त आयोजित ई-चर्चेत बीजभाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. 

शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे 'मराठी वाचन दिना'निमित्त आयोजित ई-चर्चेत उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: माणूस म्हणून स्वतःच्या जाणीवा सजग व प्रगल्भ होण्यासाठी वाचन संस्कृतीचे विकसन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मराठी वाचन संस्कृती या विषयावर ई-चर्चेमध्ये बीजभाषक म्हणून ते बोलत होते. उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के चर्चेत सहभागी झाले.

डॉ. गवस म्हणाले, आपल्या विविध शैक्षणिक धोरणांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा अपवाद वगळता वाचनाला केंद्रस्थानी फारसे कोणी आणण्याचा प्रयत्न केला नाही. वाचक घडविला नाही. प्रकट वाचन आणि मनन या पलिकडे आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करीत नाही. वाचन याचा अर्थ केवळ ग्रंथवाचन असा मर्यादित घेऊन आपण काम करीत राहतो. तथापि, ग्रंथवाचनाच्या पलिकडे भोवतालाचे वाचन करायला शिकणे, शिकविणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाचे वाचन, माणसाचे वाचन आपण कधी करायला शिकणार, हा कळीचा प्रश्न आहे. समाजात सभोवताली वावरणाऱ्या विविध घटकांतील चेहऱ्यांमागच्या भावभावना, त्यांच्या वेदना, दुःखे आपण जेव्हा वाचायला शिकू, शिकवू, तेव्हा खऱ्या अर्थाने वाचनाचे सकारात्मक लाभ समाजात दिसू लागतील. केवळ ग्रंथप्रामाण्यामुळे सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास अशक्य आहे. वाचनाकडे अशा बहुआयामी पद्धतीने पाह्यला हवे. त्यासाठी विविध पद्धती विकसित करून, वाचन संस्कृतीच्या रुजवातीसाठी सुपीक भुसभुशीत मनोभूमी तयार करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी उद्घाटनपर भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सजग, सकारात्मक वाचनाभिरुची विकसित होण्यासाठी समाजाशी नाळ जोडणारे वाचन आणि लेखन यांच्याशी नवी पिढी जोडली जाणे, समाजाच्या तळागाळातील घटकांच्या समस्यांशी, त्यांच्या वेदनांशी तिचे नाते जोडले जाणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या वेदनांशी जोडणारे साहित्य आणि वाचन यांची आजच्या पिढीमध्ये रुजवात व जोपासना होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. ए.पी.जे. कलाम यांनी हयातभर प्रयत्न केले. माणूस वाचण्याचे, माणूस घडविण्याचे शास्त्र त्यांनी खऱ्या अर्थाने जाणलेले होते. माणूस घडविण्यासाठी सकारात्मक व सकस वाचन आणि अभिव्यक्तीचे मोल त्यांना स्वानुभवाने ठाऊक झालेले होते. वाचनामुळेच तमिळनाडूतल्या एका छोट्याशा खेड्यातला गरीब कुटुंबातील मुलगा या देशाचा एक आघाडीचा शास्त्रज्ञ आणि पुढे राष्ट्रपतीही होऊ शकला, अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. म्हणूनच सर्व वयोगटातल्या युवकांना ते सातत्याने चांगले वाचण्याची, लिहीण्याची प्रेरणा देत राहिले. स्वतः त्यासाठी लिहीत राहिले. युवकांनी डॉ. कलाम यांच्याकडून हा गुण घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी विषयबाह्य वाचनाला प्राधान्य देऊन त्या प्रकारे आपली वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. वाचनाबरोबरच चांगले श्रवण करणेही महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा. नितीन रिंढे म्हणाले, वाचन विविध विषयांना स्पर्श करणारे हवे. साजरीकरणाच्या पलिकडे आपण वाचनाकडे कसे पाहतो, वाचन कसे करतो, याकडे लक्ष देणे ही आजची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे वाचनातून काय मिळवावे, हे सुद्धा शिकविण्याची आवश्यकता आहे. अमूर्त कल्पना करता येणे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येणे ही बाब वाचनातून साध्य करता आली पाहिजे. त्यासाठी माणसाच्या बौद्धिक व भावनिक जीवनाचा विकास होणे आवश्यक असते. हा विकास भाषा आणि वाचनाच्या माध्यमातून साध्य होतो. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे.

यावेळी साहित्यिक गणेश विसपुते म्हणाले, मराठी वाचनाची सुरवात ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून झाली. बाळशास्त्रींनीच १८४०मध्ये दिग्दर्शन नावाचे नियकालित सुरू केले. त्यानंतर काही वर्षांनी विविध ज्ञानविस्तार हे महत्त्वाचे नियतकालिक सुरू झाले. ते सुमारे ७० वर्षे चालले. १९३७मध्ये ते बंद पडले. या शंभर वर्षांच्या कालखंडाचा वेध घेत असताना मराठी वाचन आणि वाचक टप्प्याटप्प्याने प्रगल्भ होत गेल्याचे दिसते. जिज्ञासापूर्ती हा त्याचा मूलभूत गाभा राहिला. इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान समजावून घेण्याला आणि देण्याला त्यात प्राधान्य होते. या कालखंडात निर्माण झालेल्या वृत्तपत्रांनी समाजशिक्षणाचे काम हाती घेतले. मराठी साहित्याने परदेशी वाङ्मयव्यवहाराचे अनुवाद करून ते वाचकांपर्यंत पोहोचविले. या अनुवादित साहित्याने मराठी भाषा विविधांगांनी समृद्ध होण्यास मोठा हातभार लावला. महात्मा फुले, आगरकर यांनी सामाजिक प्रबोधनाचे एक क्रांतीकारी पर्व आरंभले. मराठी साहित्य निर्मिती आणि वाचन यांच्या या सुरवातीच्या कालखंडातील विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत. त्यांचा मोठा प्रभाव मराठी साहित्याच्या पुढील वाटचालीवरही दिसून येतो.

कार्यक्रमात मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले व आभार मानले. गुगल मीट तसेच फेसबुक लाइव्हद्वारे झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ११०० प्रेक्षक सहभागी झाले.

1 comment:

  1. धन्यवाद सर!
    खूप चांगला आणि नेमका वृत्तांत.

    ReplyDelete