शिवाजी विद्यापीठाच्या 'शिवसंदेश' ब्लॉगचे होम पेज. |
'शिवसंदेश'वर सर्वाधिक हिट्स लाभलेल्या टॉप-१० वार्ता/वृत्तलेख व त्यांच्या हिट्सची आकडेवारी |
कोल्हापूर, दि. ८ ऑक्टोबर: शिवाजी
विद्यापीठाच्या ‘शिवसंदेश’ या वृत्तविषयक ब्लॉगने
एक लाख हिट्सचा महत्त्वाचा टप्पा नुकताच पार केला आहे. विद्यापीठाच्या जनसंपर्क
कक्षाचा ऑनलाईन उपक्रम असलेल्या ‘शिवसंदेश’ ब्लॉगने एक लाख ६४०
हून अधिक हिट्स मिळविल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक
जत्राटकर यांनी जनसंपर्क कक्षामार्फत प्रसृत करावयाच्या महत्त्वाच्या वृत्तांसाठी/वृत्तलेखांसाठी दि.
१ मार्च २०१६ रोजी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेने ‘शिवसंदेश’ (www.unishivsandesh.blogspot.com) हा ब्लॉग सुरू केला.
विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षामार्फत त्या पूर्वीही वृत्तपत्रांना व पत्रकारांना
द्यावयाचा मजकूर हा पूर्णतः कागदविरहित पद्धतीने ई-मेलद्वारे पाठविण्यात येत असे.
पण त्याचे स्वरुप वर्ड, पीडीएफ व जेपीजी फाईल स्वरुपात असावयाचे. तथापि,
विद्यापीठाच्या महत्त्वाच्या वार्ता, छायाचित्रे कायमस्वरुपी जतन करण्याच्या कामी व
कोणत्याही वेळी पाहण्यासाठी ब्लॉग अधिक उपयुक्त ठरला आहे.
आजपर्यंत ‘शिवसंदेश’ ब्लॉगवर विद्यापीठाशी
संबंधित सुमारे ५३० पोस्ट (वार्ता) प्रकाशित करण्यात आल्या आहेत. माध्यम
प्रतिनिधींना कोणत्याही वेळी त्यांच्या सोयीनुसार व सवडीनुसार या ब्लॉगवर जाऊन
विद्यापीठविषयक वार्ता व छायाचित्रे डाऊनलोड करून घेणे अधिक सोयीचे झाले आहे. या
उपक्रमाला माध्यम प्रतिनिधींकडून सकारात्मक प्रतिसाद लाभल्यामुळेच हे यश प्राप्त
झाले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संबंधित शिक्षक, विद्यार्थी,
अधिकारी-कर्मचारी आदी घटकांना देखील विद्यापीठातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती
व छायाचित्रे पाहता येऊ लागली. या सर्व घटकांच्या प्रतिसादामुळेच साडेचार वर्षांत
एक लाख हिट्सचा टप्पा ‘शिवसंदेश’ने पार केला.
जनसंपर्क अधिकारी डॉ. जत्राटकर यांनी पूर्वी महाराष्ट्राच्या
उपमुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात असताना प्रथमच तत्कालीन
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वार्तांसाठी www.bhujbalnews.blogspot.com हा ब्लॉग निर्माण
केला होता. त्या उपक्रमाला प्रतिसाद लाभून अवघ्या वर्षभरात सुमारे २५ हजार हिट्स
प्राप्त झाल्या होत्या. डॉ. जत्राटकर व्यक्तीगत पातळीवरही ब्लॉगलेखन करीत असतात.
त्यांच्या ‘प्रियदर्शन’ (www.priydarshan.blogspot.com) या ब्लॉगला आजवर
सुमारे ८१,०११ आणि ‘महा-मूव्ही’ (www.maha-movie.blogspot.com) या ब्लॉगला ५८,५०६
हिट्स अशा सुमारे एक लाख ६४ हजारांहून अधिक हिट्स लाभल्या आहेत.
‘शिवसंदेश’च्या या
महत्त्वाच्या टप्प्याबद्दल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांनी समाधान व्यक्त केले असून विद्यापीठाच्या या कागदविरहित उपक्रमास
दिलेला प्रतिसाद व प्रोत्साहन याबद्दल माध्यम प्रतिनिधींना धन्यवाद दिले आहेत.
No comments:
Post a Comment