Wednesday, 1 November 2023

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. तुकाराम डोंगळे यांना

मराठी विज्ञान परिषदेचा प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कार जाहीर

 

मराठी विज्ञान परिषदेचा प्रतिष्ठेचा प्रा. मनमोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार-२०२३ जाहीर झाल्याबद्दल डॉ. तुकाराम डोंगळे यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) गजानन पळसे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. जगदीश सपकाळे व डॉ. आलोक जत्राटकर

डॉ. तुकाराम डोंगळे


कोल्हापूर, दि. १ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागातील डॉ. तुकाराम डोंगळे यांना मराठी विज्ञान परिषदेचा प्रा. मनमोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार-२०२३पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत कमी वयात हा पुरस्कार मिळविणारे डॉ. डोंगळे हे पहिलेच अध्यापक-संशोधक आहेत. हा पुरस्कार मिळविणारे शिवाजी विद्यापीठातीलही ते पहिलेच शिक्षक आहेत.

भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात, त्यातही विशेषतः संशोधन क्षेत्रात ऋषितुल्य गणल्या जाणाऱ्या प्रा. मनमोहन शर्मा,  निवृत्त संचालक, यु.डी.सी.टी, मुंबई (आताची आय.सी.टी., मुंबई) यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रूपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारांचे वितरण मराठी विज्ञान परिषदेच्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात केले जाते.

डॉ. डोंगळे हे स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागात नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे तज्ज्ञ असून ते विद्यार्थीप्रिय अध्यापक आहेत. त्यांचे संशोधन प्रामुख्याने मेमरी डिव्हायसेस, न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग व कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात असून ते राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये डॉ. डोंगळे यांचा समावेश आहे. सुमारे १६० पेक्षा अधिक शोधनिबंध, ३ पुस्तके व ११ पेटंट त्यांच्या नावे नोंद आहेत. त्यांच्या दहापेक्षा जास्त शोधनिबंधांना विविध ख्यातनाम अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध होण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे. डॉ. डोंगळे यांच्या मार्गदर्शनातून घडलेले ५० पेक्षा अधिक ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, तैवान, इटली, फिनलंड, इंग्लंड, इस्राईल या देशांतील विद्यापीठांमध्ये संशोधनकार्य करीत आहेत. डॉ. डोंगळे यांनी संशोधित केलेल्या ३ नवीन मटेरियल्सचे संपादन केंब्रिज विद्यापीठाने त्यांच्या क्रिस्टलोग्राफी डेटाबेसमध्ये केलेले असून जगभरातील शास्त्रज्ञ त्याचा लाभ घेत आहेत. सुमारे 12 कोटी रुपये इतक्या निधीचे सहा संशोधन प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. अमेरिका, कोरिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ग्रीस इत्यादी देशांतील शास्त्रज्ञांसमवेत त्यांचे आंतरराष्ट्रीय सहयोगी संशोधन चालू आहे.

कुलगुरूंकडून अभिनंदन

दरम्यान, डॉ. डोंगळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजताच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. डोंगळे यांना दालनात आमंत्रित करून ग्रंथभेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. डॉ. डोंगळे यांनी अगदी तरुण वयात मराठी विज्ञान परिषदेचा डॉ. मनमोहन शर्मा पुरस्कार प्राप्त करून एक प्रकारे विक्रमच नोंदविला आहे. त्याचप्रमाणे संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीची ही एक महत्त्वाची पोचपावती आहे. शिवाजी विद्यापीठातील तरुण संशोधक योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे यावरुन दिसते. डॉ. डोंगळे यांचे यश विद्यापीठातील अन्य अध्यापक-संशोधकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी स्वरुपाचे आहे. त्यांच्याकडून भविष्यातही जागतिक दर्जाचे संशोधन साकार होत राहावे, यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. जगदीश सपकाळे, उपकुलसचिव गजानन पळसे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment