दर्जेदार संशोधन धोरणनिश्चितीसाठी
उपयुक्त: डॉ.
निरुपमा डांगे
कोल्हापूर, दि. ३
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या जनगणना
माहिती कार्यकेंद्रामध्ये दर्जेदार संशोधन व्हावे आणि त्या माध्यमातून प्रशासनाला
धोरणे निश्चित करण्यासाठी योग्य दिशादर्शन व्हावे, अशी अपेक्षा जनगणना कार्य
संचालनालयाच्या (महाराष्ट्र) संचालक डॉ. निरुपमा डांगे (आय.ए.एस.) यांनी आज येथे
व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात संचालनालयाच्या जनगणना माहिती
संशोधन कार्यकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवाजी
विद्यापीठासमवेत सामंजस्य करार आणि कार्यकेंद्राचे औपचारिक उद्घाटन अशा संयुक्त
कार्यक्रमात डॉ. डांगे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के होते तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. डांगे म्हणाल्या, जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती ही अत्यंत मूलभूत
असते. तिची गोपनीयता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असली तरी संशोधकांना ही माहिती
उपलब्ध करून देऊन देशाला दिशादर्शक अशी धोरणे आखण्यासाठी तिचा अतिशय उत्तम वापर
करता येऊ शकतो. त्या दृष्टीने संचालनालयाने विद्यापीठांमध्ये कार्यकेंद्रे स्थापन
करण्याचे धोरण स्वीकारले असून विद्यापीठातील संशोधकांनी जनगणना माहितीचे वेगवेगळ्या
शास्त्रीय पद्धतींनी विश्लेषण करून ती उपलब्ध करून द्यावी, जेणे करून केंद्र
सरकारला लोकहिताची धोरणे राबविणे अधिक सोयीचे होईल.
हा सामंजस्य करार दूरगामी उपयुक्त स्वरुपाचा ठरेल, असे सांगून कुलगुरू डॉ.
शिर्के म्हणाले, राज्य शासनासमवेत शिवाजी विद्यापीठ अनेक संयुक्त सहकार्य
प्रकल्पांवर काम करीत आहे. त्यामध्ये काही जिल्ह्यांच्या योजना निर्धारणावरही काम
करण्यात येत आहे. जनगणना कार्य संचालनालयासमवेत झालेल्या या सामंजस्य करारामुळे
जनगणनेसारख्या अत्यंत मूलभूत माहितीच्या विश्लेषणावर संशोधकांना काम करता येणे
शक्य होणार आहे. त्या माहितीवर आधारित अनेकविध संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ
शकतील. या कक्षाची गोपनीयता हा निकष लक्षात घेऊन सुद्धा जनगणनेच्या पलिकडे अन्य
सरकारी माहिती सुद्धा या कार्यकेंद्राद्वारे संशोधकांना एकाच छताखाली उपलब्ध करून
देता येईल. यामुळे त्यांच्या संशोधनाची कार्यकक्षा विस्तारेल. याखेरीज जनगणना
कार्य संचालनालयानेही काही संशोधनात्मक प्रश्न सुचवावेत, म्हणजे त्यांनाही आवश्यक
ते विश्लेषण येथूनच करून देता येईल.
यावेळी संचालनालयाविषयी
वरिष्ठ अधिकारी ए.एन. राजीव यांनी विशेष सादरीकरण केले. सामंजस्य करारावर
संचालनालयाच्या वतीने संचालक डॉ. डांगे यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ.
विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. त्यानंतर डॉ. डांगे यांच्या हस्ते
संख्याशास्त्र अधिविभागातील जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राचे उद्घाटन करण्यात
आले. डॉ. डांगे यांनी केंद्राची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी
अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ.
सोमनाथ पवार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास
जनगणना कार्य संचालनालयाच्या वतीने व्ही.ए. अहिरे, वाय. एस. पाटील, किरण गुरव आणि
प्रवीण भगत हे अधिकारी उपस्थित होते, तर विद्यापीठाच्या वतीने अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, राज्यशास्त्र अधिविभाग
प्रमुख डॉ. प्रकाश पवार, सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर आदी उपस्थित होते.
जनगणना कार्य संचालनालयाविषयी...
भारत सरकारचे महारजिस्ट्रार
कार्यालय हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे संलग्न कार्यालय असून त्याची सध्या देशभरात ३५ कार्यालये
आहेत. राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील
कार्यालयांना जनगणना कार्य संचालनालय म्हणून संबोधले जाते. या कार्यालयांचे मुख्य
कार्य दशवार्षिक जनगणना करण्याचे असून प्रत्येक जनगणनेवेळी देशातल्या प्रत्येक
नागरिकाकडून सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय, आर्थिक, शैक्षणिक आणि इतर
अनुषंगिक माहिती मोठ्या प्रमाणात गोळा केली जाते. याचबरोबर देशातील प्रत्येक
कुटुंबाविषयी आणि त्या घरांतील उपलब्ध भौतिक साधन-सुविधा व मालमत्तेविषयीही माहिती
गोळा केली जाते. या माहितेचे विश्लेषण करून त्यावर आधारित विविध विकासात्मक योजना
आखल्या जातात.
जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राविषयी...
भारतीय
जनगणनेमधून प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असून तिचे सखोल संशोधन व
विश्लेषण होणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन महारजिस्ट्रार कार्यालयाने देशातील
विविध १८ विद्यापीठांमध्ये जनगणना माहिती संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचे
ठरविले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात १२ वे कार्यकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. या
संशोधन केंद्रातील सुविधांचा लाभ विद्यापीठातील तसेच विद्यापीठाबाहेरील संशोधकांना
घेता येणार आहे. संशोधन केंद्रामध्ये माहिती घेण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी
संगणक, प्रिंटर तसेच सांख्यिकीय विश्लेषणासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअरही उपलब्ध
करून देण्यात आली आहेत, अशी माहिती
अधिविभाग प्रमुख डॉ. महाडिक यांनी दिली.
No comments:
Post a Comment