उद्योजक सचिन मेनन यांच्याकडून साडेसहा लाखांचा निधी
कोल्हापूर, दि. २३ नोव्हेंबर:
शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थी वसतिगृहासाठी मदतनिधीचा ओघ
विद्यापीठ कार्यालयाकडे सुरू झालेला आहे. कोल्हापुरातील नामांकित उद्योगसमूह
असलेल्या मेनन पिस्टन्स लि. कंपनीचे
चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सचिन मेनन यांनी साडेसहा लाख रुपयांचा निधी काल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.
शिवाजी
विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या
निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या
सहभागातून उभारावे आणि त्यातून लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात, अशा हेतूने
विद्यापीठाने या वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंब, आप्तस्वकीय
यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या
व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करावयाची, अशी ही संकल्पना आहे.
यानुसार
श्री. मेनन यांनी विद्यापीठास साडेसहा लाख रुपयांचा निधी विद्यापीठास दिला आहे. मेनन
यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी संभाजी पाटील यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट
घेऊन त्यांच्याकडे निधीचा धनाकर्ष सुपूर्द केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांच्यासह डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव उपस्थित होते.
विविध
घटक मदतीसाठी इच्छुक: कुलगुरू डॉ. शिर्के
शिवाजी
विद्यापीठाशी संबंधितांसह समाजातील विविध संस्था-संघटनांशी तसेच
उद्योग-व्यवसायांशी निगडित घटकांकडूनही लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह प्रकल्पास
मदत करणेबाबत विचारणा झाली आहे. त्यातील अनेकांनी आपण लवकरच निधी सुपूर्द करणार
असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये शंभर टक्के लोकसहभागातून
साकारत असलेला हा प्रकल्प कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून निश्चितपणे पूर्णत्वास
जाईल, अशी भावना व्यक्त करून कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी इच्छुक दात्यांनी
सदर लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहास आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही
केले आहे.
No comments:
Post a Comment