Thursday 9 November 2023

डॉ. जी.डी.बापू लाड स्वातंत्र्य लढयातील तेजस्वी नेतृत्व - डॉ.विलास पवार

 कोल्हापूर, दि.09 नोव्हेंबर - डॉ. जी.डी.बापू लाड म्हणजे स्वातंत्र्य लढयातील तेजस्वी नेतृत्व आणि धगधगते अंगार होते. जाती-पातीचे समीकरणे,गंुडगिरी, सावकारी नाहीसे करणे, एक गांव एक पानवठा अशी लोककल्याणकारी धोरणे बापूंनी राबविली, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.विलास पवार यांनी आज येथे केले.

     शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्राच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड व्याख्यानमालेअंतर्गत क्रंातिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड : व्यक्ती आणि कार्य या विषयावर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डी.डी.शिंदे सरकार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॅा.विलास पवार बोलत होते.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॅा.दिगंबर शिर्के तर विधान परिषदेचे सदस्य आमदार अरूणआण्णा लाड यांची विशेष उपस्थिती होती.


            डॅा.पवार बोलताना पुढे म्हणाले,डॉ.जी.डी.बापू लाड यांची पत्नी विजयाताई लाड यांनीही स्वतंत्र्य लढयामध्ये मोठा सहभाग घेतला होता. गोर-गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी बापूंनी मोर्चे आणि आंदोलने केली.देश स्वतंत्र झाल्यानंतर बापू आमदार म्हणून विधान सभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य होते.देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू अखंड भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणारे दीर्घ दृष्टीकोन असणारे नेते होते.त्यावेळेस आमदार आणि मंत्री यांचे पगार जास्त होते.त्यावेळची सामाजिक स्थिती पाहता आण्णांनी आमदारांचे पगार कमी करण्याची मागणी केली होती.त्याचबरोबर, दुसरी मागणी सर्व जमिनी लागवडीखाली आणण्याबाबतची होती.तसेच, शेतकरी बांधवांसाठी आधुनिक खतांचा कारखाना काढला पाहिजे या सर्वबाबी बापूंनी मांडल्या.खाजगी क्षेत्रातील बस कामगारांवर होणारे अत्याचारांवर त्यांनी आवाज उठवून तात्काळ 1958 ला स्टेट ट्रान्सपोर्टची निर्मिती केली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये सर्व सामान्य जनतेसाठी एस.टी.चा प्रवास सुरू झाला. ग्रामीण भागातील मुलांमध्ये बौध्दिक क्षमता आहे हे ओळखून त्याला चालना देण्यासाठी अभियात्रिकी महाविद्यालयांसाठी प्रयत्न केले.कोणत्याही प्रलोभनास ते कधीही बळी पडणारे नव्हते.त्यांच्या कारखान्याची सुरूवात 2002 मध्ये झाली.कोणावरही अन्याय केला नाही.त्यांनी शिक्षण संस्था, पाणी पुरवठा संस्था, माती परीक्षण केंद्र काढले.क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सानिध्यात घडलेले बापू यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावावर विद्यार्थ्यांसाठी बोर्डींग काढले आणि अनेक लोकांचे संसार उभे केले.स्वातंत्र्य सैनिक नागनाथआण्णा नायकवडी यांचे समवेत दरोडेखोरांचे मतपरिवर्तन करून देशाच्या स्वातंत्र्य लढयामध्ये त्यांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले.सर्वसामान्य लोकांनी बापूंसमवेत या लढयामध्ये भाग घेतला.बापंूची ज्या अवस्थेमध्ये जडण-घडण झाली, ज्या भावनेने त्यांनी कामे केली त्यापेक्षा आपण किती तरी पटीने मागे आहोत.त्यांनी जया जिद्दीने लढा दिला ती माणसे आज राजकारणात नाहीत.  या देशातील सर्व समाज आणि प्रत्येक कुटुंब साक्षर व्हावे अशी त्यांची मनोकामना होती. 

            अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, जी.डी.बापू लाड हे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर ही स्वकीयांसाठी आयुष्यभर लढले आणि अत्याचार मुक्त समाज निर्मीतीसाठी बापूंनी प्रयत्न केले.त्यांनी गोर-गरीब जनतेमध्ये एक परिवर्तनीय विचार घालून दिला. बापूंच्या विचारांचे आणि मूल्यांचे चिंतन विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. 

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नितीन माळी यांनी केले.डॉ.उमेश गडेकर यांनी आभार मानले तर डॉ.उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले.

             यावेळी डॉ.अरूण भोसले, डॉ.भारती पाटील, कॉ.धनाजी गुरव, मारूती शिरतोडे, श्रीकांत लाड, प्राचार्य आर.एस.डुबल, डॉ.रणजित शिंदे, कथाकथ्नकार जयवंत आवटे यांचेसह कुंडल सांगलीहून आलेले मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment