Thursday, 11 May 2023

विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव उत्साहात

माहितीपटांतून उलगडले शाहूंचे कार्य; 'कोल्हापूर ते मिरज रेल्वे' ठरला सर्वोत्कृष्ट

शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या राजर्षी शाहू माहितीपट महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिक वितरण प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे व विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांच्यासमवेत (डावीकडून) विक्रम रेपे, डॉ. शिवाजी जाधव, अनुप जत्राटकर, अनमोल कोठाडिया, डॉ. सुमेधा साळुंखे, जगदीश गुरव व परशराम पवार.
(समोर उभे) पारितोषिक विजेते चेतन सूर्यवंशी, समृद्धी पाटील, पल्लवी पाटील व सिमरन ठाणेकर.

शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या राजर्षी शाहू माहितीपट महोत्सवातील प्रथम पारितोषिक विजेता चेतन सूर्यवंशी यास पारितोषिक प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) अनुप जत्राटकर, अनमोल कोठाडिया, डॉ. विलास शिंदे, डॉ. निशा पवार.



कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय माहितीपट महोत्सव २०२३चे आज आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पार पडलेल्या या महोत्सवात शाहू महाराजांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे १९ माहितीपट नोंदवले होते. विजेत्या पाच माहितीपटांचे स्क्रीनिंग यावेळी करण्यात आले. विजेत्यांना प्रथम, द्वितीय तसेच विशेष परीक्षक पुरस्कार, छायाचित्रण, संकलन आणि ध्वनी अशा स्वरुपाची पारितोषिके तसेच शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

महोत्सवात चेतन सूर्यवंशी यांच्या 'कोल्हापूर ते मिरज रेल्वे' या माहितीपटास प्रथम, समृद्धी पाटील यांच्या 'साठमारी'ला द्वितीय, सोनाली हुंबरे यांच्या 'मोतीबाग तालीम'ला विशेष परीक्षक पुरस्कार उत्कृष्ट ध्वनी अशी पारितोषिके  देण्यात आली. सिमरन ठाणेकर यांच्या 'लक्ष्मी-विलास पॅलेस' पल्लवी पाटील यांच्या ''विचार शाश्वत वसतिगृहांचा' या माहितीपटांना अनुक्रमे उत्कृष्ट छायाचित्रण उत्कृष्ट संकलन पारितोषिके मिळाली. पारितोषिक विजेत्यांसह इतर सहभागींनाही शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज हे आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे चरित्र जागतिक पातळीवर पोहोचावे, महाराज सगळ्यांना कळावे, या उद्देशाने शाहू महाराजांचे चरित्र २७ भाषांमध्ये प्रकाशित करण्याचे काम सुरु आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शाहूंचे योगदानाचा जागर निश्चित घडून आला आहे. विद्यार्थांनी शाहू महाराज अंगी करावे त्यामुळे शाहू महाराजांसारखे आदर्श व्यक्तिमत्व नक्की घडतील’, असे मत  कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.

लोकोत्तर व्यक्तींचे कर्तृत्व महान असते. नि:स्वार्थ भावनेतून समाज हिताचे कार्य अशा व्यक्तींकडून होत असते. असे व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज होत. अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्वावर माहितीपट निर्मितीचे काम विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे, असे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले.

या महोत्सवासाठी चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमादरम्यान दोन्ही परीक्षकांनी माहितीपट निर्मितीबाबतच्या तांत्रिक बाबी, संशोधन, संहिता लेखन आदींबाबत माहिती दिली.

महोत्सवाच्या आयोजक डॉ. निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उद्देश स्पष्ट केला, तसेच मान्यवरांचा परिचय करून दिला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, परशराम पवार यांनी परिश्रम घेतले. पल्लवी पाटील जावेद तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले.


Tuesday, 9 May 2023

सच्चे नेतृत्व निरपेक्षभावाने कार्यरत असते: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 पाचगणी येथे १७ व्या नेतृत्व विकास शिबिरास प्रारंभ

पाचगणी येथे आयोजित नेतृत्व विकास शिबिराचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रकाश गायकवाड, श्री. लेसन आझादी व डॉ. आलोक जत्राटकर.

पाचगणी येथे आयोजित नेतृत्व विकास शिबिरामध्ये उद्घाटनपर मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी मंचावर (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रकाश गायकवाड, श्री. लेसन आझादी व डॉ. आलोक जत्राटकर.

पाचगणी येथे आयोजित नेतृत्व विकास शिबिरामध्ये सहभागी शिबिरार्थींसमवेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रकाश गायकवाड, श्री. लेसन आझादी व डॉ. आलोक जत्राटकर.


कोल्हापूर/पाचगणी, दि. ९ मे: सच्चे नेतृत्व अत्यंत निरपेक्ष भावनेने लोकांचे कार्य मार्गी लावण्यासाठी धडपडणारे असले पाहिजे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. ८) केले. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पाचगणी (ता. वाई, जि. सातारा) येथील बहाई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या तीन दिवसीय नेतृत्व विकास शिबीर २०२२-२३च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नेतृत्व या बाबीला आपण केवळ राजकीय इतक्या संकुचित अर्थाने पाहतो, हीच पहिली चूक आहे. नेतृत्व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रांमध्ये असते. नेतृत्वाची सुरवात आपण अगदी लहानपणी सवंगडी जमवून खेळत असल्यापासूनच होत असते. त्यामध्ये जो एक जण साऱ्यांना जमवण्यामध्ये पुढाकार घेत असतो, तो त्या चमूचा नेताच असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रत्येकामध्येच कमीअधिक प्रमाणात असते. त्या क्षमतेचा वापर सर्वात आधी आपण स्वतःच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी करण्याची गरज असते. आपल्या आयुष्यामध्ये आपण जे ध्येय बाळगले आहे, ते साध्य करण्यासाठी आपण स्वतःचे नेतृत्व करण्यास शिकले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इतका नेतृत्वगुण तर प्रत्येकामध्ये विकसित होणे आवश्यक असते. नेतृत्वाचे प्रभावक्षेत्रही त्याच्या आवाक्यानुसार कमीअधिक होत असते. तेवढ्याचा कायापालट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या प्रभावाचा सकारात्मक वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या नेतृत्वाच्या बदल्यात कोणतीही अपेक्षा बाळगणेही चुकीचे असते. आपले काम करून बाजूला व्हायला शिकले पाहिजे. तरच आपल्या हातून अधिकाधिक चांगली कामे साकार होतील. अपेक्षा बाळगून काम करीत राहिलात की अपेक्षाभंग झेलण्याचीही तयारी ठेवा. मात्र, तशी वेळ येऊ न देणे, हे चांगल्या नेतृत्वाचे लक्षण आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नेतृत्वगुण आत्मसात करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ आणि बहाई अकादमी गेली १७ वर्षे हे शिबीर यशस्वीरित्या आयोजित करीत आहे आणि येथून पुढेही ते निरंतर होत राहील, अशी ग्वाही कुलगुरूंनी या प्रसंगी दिली.

बहाई अकादमीचे संचालक डॉ. लेसन आझादी म्हणाले, विद्यार्थीदशेपासूनच आपण सकारात्मक पद्धतीने आपल्यातील विविध कलागुणांचा, नेतृत्वगुणांचा विकास केला पाहिजे. प्रत्येकाने नेताच व्हायला पाहिजे, असे अपेक्षित नसले तरी प्रत्येक जण एक चांगला माणूस मात्र निश्चितच व्हायला हवा. त्यासाठी आपल्या जगण्याचे, शिक्षणाचे प्रयोजन शोधणे क्रमप्राप्त आहे. आपण माणूस आहोत, म्हणजेच अन्य प्राणीमात्रांच्या तुलनेत आपल्यावर या धरातलाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यांना विधायकतेच्या दिशेने न्यायचे की विध्वंसकतेच्या, हा निर्णय आपण विवेकाच्या आधारे घ्यायला हवा. तरुणांनी त्या दृष्टीने आपल्या जगण्याची दिशा निश्चित केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी नेतृत्व विकास शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. पराग तांदळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. या प्रसंगी मंचावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते. शिबिरामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांमधील निवडक ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.

विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 



कोल्हापूर, दि. मे: थोर समाजसुधारक व शिक्षण प्रसारक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन केले.

याप्रसंगी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अजित चगुले, उपकुलसचिव डॉ. एन.जे. बनसोडे, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. विद्या चगुले, पी. टी. पाटील, अभिजीत पाटील, सुमंत दंडपठ, सुनिल जाधव, आनंदा वारके,   यांच्यासह प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Saturday, 6 May 2023

शाहूंचा नितीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार जगभर जावा: सुरेश द्वादशीवार

 शिवाजी विद्यापीठात शाहूचरित्राच्या रशियन व इटालियन अनुवादग्रंथांचे प्रकाशन


शिवाजी विद्यापीठात शाहूचरित्राच्या रशियन व इटालियन अनुवादग्रंथांचे प्रकाशन करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व सुरेश द्वादशीवार. सोबत (डावीकडून) श्रीपतराव शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. विलास शिंदे, डॉ. मेघा पानसरे.

शिवाजी विद्यापीठात शाहूचरित्राच्या रशियन व इटालियन अनुवादग्रंथांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुरेश द्वादशीवार.

शिवाजी विद्यापीठात शाहूचरित्राच्या रशियन व इटालियन अनुवादग्रंथांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुरेश द्वादशीवार. मंचावर (डावीकडून) श्रीपतराव शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. विलास शिंदे, डॉ. मेघा पानसरे.


कोल्हापूर, दि. ६ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा नीतीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार ग्रंथानुवादाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे  केले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू महाराजांच्या चरित्रग्रंथाच्या रशियन व इटालियन अनुवादांचे प्रकाशन आज सकाळी शिवाजी विद्यापीठात झाले. विद्यापीठाचे शाहू संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व प्रबोधिनीचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते.

शाहूचरित्राच्या जागतिक भाषांतील अनुवादांचे स्वागत करताना सुरेश द्वादशीवार म्हणाले, शाहू महाराजांचे व्यक्तीमत्त्व अद्भुत होते. त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा जगाला परिचय करून देणारा हा अनुवाद प्रकल्प आहे. या माध्यमातून आपण केवळ आपला माणूस मोठा करतो, असे नव्हे, तर महाराष्ट्र मोठा करीत असतो. म्हणून हे काम महत्त्वाचे आहे. उण्यापुऱ्या ५० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराजांनी या आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड दिले आणि महत्त्वाचे म्हणजे त्या सर्व ठिकाणी विजय मिळविला व आपला ध्वज उंचावत ठेवला. त्यांनी पुकारलेला संघर्ष हा काही केवळ ब्राह्मणशाहीविरुद्धचा नव्हता किंवा धार्मिक संघर्षही नव्हता, तर त्यांनी तो असत्याशी मांडलेला संघर्ष होता. महाराजांनी माणूस तेवढा एक मानला. माणसा-माणसांत फरक करू नका, कोणालाही माणुसकीचे अधिकार नाकारू नका, असे ते सांगत असत. त्यांचे व्यक्तीगत वर्तनही त्याच धर्तीचे होते. टिळकांशी टोकाचे मतभेद असूनही त्यांच्या अडचणीच्या वेळी उदार मनाने धावून जाणारा असा हा राजा होता. त्यांनी दिलेली मूल्ये रुजविण्यासाठी आणि देश एक करण्यासाठी आपण साऱ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी रशिया आणि इटली येथील ऐतिहासिक संदर्भांचा आपल्या भाषणात दाखला दिला आणि त्या पार्श्वभूमीवर शाहूचरित्राच्या अनुवादाचे महत्त्व विषद केले. शाहूकार्य देशाच्या सीमा ओलांडून विदेशांत जाते आहे, ही बाब महत्त्वाची असून त्यामुळे तेथील नागरिकांतही चांगले परिवर्तन होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे चरित्र वर्षभरापूर्वी आले असते आणि पुतीन यांनी वाचले असते, तर कदाचित युक्रेनवरील हल्लाही टळला असता, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी भारतीय व जागतिक भाषांमध्ये शाहूचरित्राच्या अनुवादाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे, ही फार मोलाची बाब आहे. रशियन आणि इटालियन अनुवादाच्या प्रक्रियेत गुंतलेल्या सर्व अनुवादक या महिला आहेत, ही शाहूकार्याला एक मोठीच आदरांजली आहे. अनुवादाच्या उर्वरित प्रकल्पांमध्येही शिवाजी विद्यापीठ सक्रिय सहभाग घेईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तत्पूर्वी, डॉ. जयसिंगराव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यामध्ये १५ भारतीय आणि १० विदेशी भाषांत शाहूचरित्र घेऊन जाण्याचा संकल्प आपण सोडला असून भारतीय भाषांत हिंदी, मराठी, कन्नड, कोकणी, तेलगू या भाषांमध्ये प्रकाशित झाले असून बंगाली, गुजराती, सिंधी अनुवाद तयार आहेत. असामी, पंजाबी, मल्याळम, तमिळ व राजस्थानी हे अनुवाद बाकी आहेत. विदेशा भाषांमध्ये इंग्रजी, जर्मन, रशियन व इटालियन प्रकाशित झाले असून चीनी, जपानी, स्पॅनिश, डच, पोर्तुगीज हे बाकी आहेत. प्रकाशित झालेले विदेशी अनुवाद हे त्या त्या देशांच्या वकिलातींमार्फत तेथील विद्यापीठे, ग्रंथालये, विचारवंत आणि अभ्यासक आदी महत्त्वाच्या व्यक्ती व संस्थांना मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रशियन अनुवादक डॉ. मेघा पानसरे यांनी सभागृहात तर डॉ. अलेस्सांद्रा कॉन्सोलारो यांनी इटलीमधून ऑनलाईन स्वरुपात अनुवादामागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी डॉ. पवार आणि डॉ. पानसरे यांनी रशियन अनुवादामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनुवादक तात्याना बिकवा यांना आदरांजली वाहिली. यावेळी रशियन व इटालियन अनुवादामधील एकेक परिच्छेदांचे वाचनही डॉ. पानसरे व डॉ. कॉन्सोलारो यांनी केले.

सुरवातीला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व प्रमुख पाहुणे द्वादशीवार यांच्या हस्ते शाहूचरित्राच्या रशियन व इटालियन अनुवाद ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. भारती पाटील, शाहू चरित्रकार डॉ. रमेश जाधव, डॉ. सुनीलकुमार लवटे, सुरेश शिपूरकर, वसंत भोसले, प्राचार्य आनंद मेणसे, डॉ. हरिष भालेराव, डॉ. जे.के. पवार, व्यंकाप्पा भोसले, नामदेवराव कांबळे, विजय शिंदे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांच्यासह अनेक शाहूप्रेमी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला अभिवादन

 



शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केप्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह समस्त शिवाजी विद्यापीठ परिवार लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व सांगतेनिमित्त १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती जमला.





शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व सांगतेनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाची काही विहंगम दृश्ये. (सौ: सुवीज मूव्हीज, कोल्हापूर)

शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व सांगतेनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाचा विहंगम व्हिडिओ. (सौ: सुवीज मूव्हीज, कोल्हापूर)




कोल्हापूर, दि. ६ मे: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०१वा स्मृतिदिन आणि कृतज्ञता पर्व सांगता या निमित्ताने आज सकाळी ठीक १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून शिवाजी विद्यापीठ परिवाराने शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले व आदरांजली व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आज सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, अधिष्ठाता, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या भोवती जमा झाले. तेथेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती. या दोन महापुरूषांना अभिवादन करून ठीक १० वाजता १०० सेकंदांसाठी सर्व उपस्थितांनी स्तब्धता पाळून शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या लोकराजाला मौनातून आदरांजली वाहिली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, दूरशिक्षण केंद्र संचालक डॉ. डी.के. मोरे आदी उपस्थित होते.

या अभिवादन कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.