पाचगणी येथे १७ व्या नेतृत्व विकास शिबिरास प्रारंभ
कोल्हापूर/पाचगणी, दि. ९ मे: सच्चे नेतृत्व अत्यंत निरपेक्ष
भावनेने लोकांचे कार्य मार्गी लावण्यासाठी धडपडणारे असले पाहिजे, अशी अपेक्षा
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. ८) केले. शिवाजी विद्यापीठाचा
विद्यार्थी विकास विभाग आणि पाचगणी (ता. वाई, जि. सातारा) येथील बहाई अकॅडमी यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या तीन दिवसीय ‘नेतृत्व विकास शिबीर २०२२-२३’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नेतृत्व या बाबीला आपण केवळ राजकीय इतक्या
संकुचित अर्थाने पाहतो, हीच पहिली चूक आहे. नेतृत्व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक
आदी सर्वच क्षेत्रांमध्ये असते. नेतृत्वाची सुरवात आपण अगदी लहानपणी सवंगडी जमवून
खेळत असल्यापासूनच होत असते. त्यामध्ये जो एक जण साऱ्यांना जमवण्यामध्ये पुढाकार
घेत असतो, तो त्या चमूचा नेताच असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे नेतृत्व करण्याची
क्षमता प्रत्येकामध्येच कमीअधिक प्रमाणात असते. त्या क्षमतेचा वापर सर्वात आधी आपण
स्वतःच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी करण्याची गरज असते. आपल्या आयुष्यामध्ये आपण
जे ध्येय बाळगले आहे, ते साध्य करण्यासाठी आपण स्वतःचे नेतृत्व करण्यास शिकले
पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इतका नेतृत्वगुण तर प्रत्येकामध्ये विकसित
होणे आवश्यक असते. नेतृत्वाचे प्रभावक्षेत्रही त्याच्या आवाक्यानुसार कमीअधिक होत
असते. तेवढ्याचा कायापालट करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या प्रभावाचा सकारात्मक वापर
केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या नेतृत्वाच्या बदल्यात कोणतीही अपेक्षा बाळगणेही
चुकीचे असते. आपले काम करून बाजूला व्हायला शिकले पाहिजे. तरच आपल्या हातून
अधिकाधिक चांगली कामे साकार होतील. अपेक्षा बाळगून काम करीत राहिलात की अपेक्षाभंग
झेलण्याचीही तयारी ठेवा. मात्र, तशी वेळ येऊ न देणे, हे चांगल्या नेतृत्वाचे लक्षण
आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नेतृत्वगुण आत्मसात करण्याची
गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठ आणि बहाई अकादमी गेली १७ वर्षे हे शिबीर यशस्वीरित्या आयोजित
करीत आहे आणि येथून पुढेही ते निरंतर होत राहील, अशी ग्वाही कुलगुरूंनी या प्रसंगी
दिली.
बहाई अकादमीचे संचालक डॉ. लेसन आझादी म्हणाले, विद्यार्थीदशेपासूनच आपण
सकारात्मक पद्धतीने आपल्यातील विविध कलागुणांचा, नेतृत्वगुणांचा विकास केला
पाहिजे. प्रत्येकाने नेताच व्हायला पाहिजे, असे अपेक्षित नसले तरी प्रत्येक जण एक
चांगला माणूस मात्र निश्चितच व्हायला हवा. त्यासाठी आपल्या जगण्याचे, शिक्षणाचे
प्रयोजन शोधणे क्रमप्राप्त आहे. आपण माणूस आहोत, म्हणजेच अन्य प्राणीमात्रांच्या
तुलनेत आपल्यावर या धरातलाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यांना
विधायकतेच्या दिशेने न्यायचे की विध्वंसकतेच्या, हा निर्णय आपण विवेकाच्या आधारे
घ्यायला हवा. तरुणांनी त्या दृष्टीने आपल्या जगण्याची दिशा निश्चित केली पाहिजे,
असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड यांनी नेतृत्व विकास शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. पराग
तांदळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. या
प्रसंगी मंचावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.
शिबिरामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील विविध
महाविद्यालयांमधील निवडक ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment