सोळावी राष्ट्रीय युवा संसद शिवाजी विद्यापीठात उत्साहात
कोल्हापूर, दि. २३ मे:
तरुण हे राष्ट्रीय शाश्वत विकासाचे ‘ग्रोथ
इंजिन’ आहेत. त्यामुळे
तरुणांनी मूल्याधिष्ठित जाणीवा मनाशी बाळगून राष्ट्रविकासाच्या कार्यात सहभाग
घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज
येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आज सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय
पातळीवरील स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत
व्यक्त करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
सभागृहात झालेल्या या स्पर्धेस निरीक्षक म्हणून केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे
उपसचिव ए.बी. आचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस.बी. देओसकर उपस्थित होते. यावेळी
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड मंचावर होते.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, राष्ट्रीय युवा संसद उपक्रमाच्या माध्यमातून
सांविधानिक लोकशाहीची मूल्ये युवा पिढीमध्ये रुजविण्याच्या दिशेने केंद्रीय
मंत्रालय अतिशय सकारात्मक प्रयत्न करीत आहे. हा उपक्रम देशभरातील विद्यापीठांमध्ये
राबविला जातो. यामुळे युवा पिढीच्या व्यक्तीमत्त्वाला नवे आयाम प्राप्त होतात,
तसेच त्यांचे भवितव्यही मूल्याग्रही बनते. या माध्यमातून भारताची विविधतेमधील एकता
आणि बहुसांस्कृतिकतेमधील एकात्मताही युवकांच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये रुजतात. यातून
भारताचा चांगला नागरिक म्हणून त्यांचे व्यक्तीमत्त्व विकसित होते. असा युवक हा
देशाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करण्यास कटिबद्ध असतो. देशातील सामाजिक समस्या
सोडविण्याचा प्राधान्यक्रम त्याच्याकडून आखला जाणे या ठिकाणी अभिप्रेत असते. त्यातच
आता आपण जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहोत. या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ घेण्यासाठी
आपण सातत्याने कार्यप्रवण राहण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदा
आपण ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना घेऊन हा उपक्रम साजरा
करीत आहोत, तेव्हा केवळ भौतिक स्वच्छता करणे, यातून अभिप्रेत नसून स्वच्छतेचा
संस्कार जनमानसात रुजणे आणि लोकांची परस्परांबद्दलची मनेही स्वच्छ व पारदर्शक होणे
नितांत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर युवा संसदेमध्ये सुमारे एक तासभर विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा
करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ
भारत’ शपथ घेतली. समन्वयक डॉ.
प्रल्हाद माने यांनी स्वागत, प्रास्ताविक केले, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार
मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment