Saturday, 6 May 2023

शिवाजी विद्यापीठात १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला अभिवादन

 



शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केप्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह समस्त शिवाजी विद्यापीठ परिवार लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व सांगतेनिमित्त १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती जमला.





शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व सांगतेनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाची काही विहंगम दृश्ये. (सौ: सुवीज मूव्हीज, कोल्हापूर)

शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व सांगतेनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाचा विहंगम व्हिडिओ. (सौ: सुवीज मूव्हीज, कोल्हापूर)




कोल्हापूर, दि. ६ मे: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०१वा स्मृतिदिन आणि कृतज्ञता पर्व सांगता या निमित्ताने आज सकाळी ठीक १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून शिवाजी विद्यापीठ परिवाराने शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले व आदरांजली व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आज सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, अधिष्ठाता, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या भोवती जमा झाले. तेथेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती. या दोन महापुरूषांना अभिवादन करून ठीक १० वाजता १०० सेकंदांसाठी सर्व उपस्थितांनी स्तब्धता पाळून शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या लोकराजाला मौनातून आदरांजली वाहिली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, दूरशिक्षण केंद्र संचालक डॉ. डी.के. मोरे आदी उपस्थित होते.

या अभिवादन कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.

 


No comments:

Post a Comment