शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरण कामास प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर. |
कोल्हापूर, दि. २०
मे: शिवाजी विद्यापीठाच्या
क्रांतीवन परिसराचे सुशोभीकरण क्रांतिदिनापर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांनी केली.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रमांक आठ प्रवेशद्वारासमोरील भागात क्रांतीवन परिसर
आहे. या ठिकाणी हुतात्मा स्मारक तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सोलापूर (सन २००३
पर्यंत) जिल्ह्यांतील शहीदांचे स्मृतीफलक आहेत. या क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरणाच्या
कामास शुक्रवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
क्रांतीवनामध्ये आता पेव्हिंग ब्लॉक बसविलेला वॉकिंग ट्रॅक बनविण्यात येणार
आहे. मार्गावर ठिकठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात येणार असून ठिकठिकाणी लॉन
निर्मिती, जलसाठे, सौरदिवे, बाजूने बोगणवेलीचे कुंपण अशी आखणी करण्यात आली आहे.
उद्यानामध्ये आधीपासूनच चाफा, आवळा, वड, चिंत, शिरीष अशी झाडे आहेत. त्यामध्ये त्या
प्रजातींसह सोनचाफा, कांचन, जांभूळ आदी झाडांची रोपे लावण्यात येणार आहेत. उद्यान
अधिकाधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची फुलझाडे वगैरे लावण्यात
येतील. सध्या शहीदांचे स्मृतीफलक एकत्रित उभे केले आहेत. ते उद्यानामध्ये
ठिकठिकाणी नव्याने उभारण्यात येतील. त्यांच्या नावांवर २४ तास प्रकाशझोत राहील,
याची सौरदिव्यांच्या सहाय्याने व्यवस्था करण्यात येईल. येथे फिरावयास येणाऱ्या
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास प्रसन्न वाटावे आणि विद्यार्थ्यांच्याही मनात
शहीदांप्रती कृतज्ञभाव निर्माण व्हावा, या दृष्टीने या परिसराचे सुशोभीकरण
करण्याचा मानस असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. कैलास सोनवणे, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजित यादव, महेश
साळुंखे, सहाय्यक कुलसचिव अमित कांबळे, एस.जे. पाटील, जी.बी. मस्ती, उद्यान
अधीक्षक अभिजीत जाधव, एस.एस. साळुंखे यांच्यासह अभियांत्रिकी व उद्यान विभागाचे
सहकारी उपस्थित होते.
क्रांतीवनाची पूर्वपिठिका
कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम नाशिक येथे झाला.
त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे उपस्थित होते. त्या
प्रसंगी कुसुमाग्रजांनी, प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या त्या परिक्षेत्रातील
शहीदांची नावे असणारे एक स्मृतीस्थळ विकसित करण्याची सूचना केली होती. यामुळे
विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्यसैनिकांच्या तसेच युद्धात शहीद झालेल्या आपल्या
भागातील सैनिकांच्या स्मृती जाग्या राहतील आणि त्यांनाही देशकार्यासाठी त्या
प्रेरित करीत राहतील, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या सूचनेनुसार सन २०००मध्ये
शिवाजी विद्यापीठात क्रांतीवनाची निर्मिती करण्यात आली. कुसुमाग्रजांची ‘अनाम वीरा...’ या कवितेचा फलक स्मृतीस्थळी उभारण्यात आला आहे. आता विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व
उद्यान विभागाच्या वतीने या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment