‘कलर’ पुरस्कार वितरण समारंभात न्यू कॉलेज सलग सहाव्यांदा सर्वसाधारण विजेते
शिवाजी विद्यापीठाच्या कलर पुरस्कार विजेत्या खेळाडू मान्यवरांसमवेत |
शिवाजी विद्यापीठाचे कलर पुरस्कार विजेते खेळाडू व संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक मान्यवरांसमवेत |
कोल्हापूर, दि. १९
मे: शिवाजी विद्यापीठात
लवकरच अत्याधुनिक कुस्ती संकुल आणि सुसज्ज व स्वतंत्र क्रीडा वसतीगृह साकार होणार
आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली. शिवाजी
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि द्वितिय
खेलो इंडिया स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खेळाडूंच्या गुणगौरव समारंभात (कलर
एवॉर्ड) ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभास प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आणि क्रीडा संचालक
डॉ. शरद बनसोडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सन २०२१-२२मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा कामगिरी बजावणारे महाविद्यालय
म्हणून दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांना क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषक प्रदान
करून गौरविण्यात आले. न्यू कॉलेजने सलग सहाव्या वर्षी हा बहुमान प्राप्त केला आहे.
या महाविद्यालयात सर्वाधिक ५७८ गुण प्राप्त झाले.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच सर्व पुरस्कारप्राप्त
खेळाडूंचे अभिनंदन केले. शिवाजी विद्यापीठाच्या ‘मिशन ऑलिंपिक’ मोहिमेला बळ देण्याचे काम सर्व खेळाडू करीत असल्याचे
सांगून ते म्हणाले, विद्यापीठाच्या खेळाडूंनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ
स्पर्धांतील विविध क्रीडा प्रकारांत १०२ आणि खेलो इंडिया स्पर्धेत २२ पदके
पटकावली. ही संख्या लक्षणीय आहे. त्यातही महिला खेळाडूंची संख्या आणि यशाची कमान
ही चढती आहे. महिलांनी एकूण १३ प्रकारांत तर पुरूषांनी १० प्रकारांत पदके मिळविली
आहेत. विद्यापीठाशी संलग्नित काही महाविद्यालयांत आता क्रीडा क्षेत्राला पूरक अशी
परिसंस्था निर्माण झाली आहे. तथापि, महाविद्यालयांतून हे खेळाडू जेव्हा पदव्युत्तर
शिक्षणात येतात, तेव्हा त्यांचे क्रीडा विषयाकडे दुर्लक्ष होते. मात्र, करिअर
म्हणून आता क्रीडा क्षेत्राची निवड करण्यास पोषक वातावरण आहे. विद्यापीठानेही
क्रीडापटूंसाठी विविध योजना व सवलती जाहीर केलेल्या आहेत. खेळाडूंच्या मागण्या व
गरजांची पूर्तता करण्यासाठी क्रीडा विभाग तत्पर आहे. पायाभूत क्रीडा सुविधांचा
विकास करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. इनडोअर खेळांसाठी आधुनिक संकुल
उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या
सहकार्यातून अत्याधुनिक कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचा आणि स्वतंत्र
क्रीडा वसतीगृहाचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या कामास प्रारंभ
करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विद्यापीठाचे खेळाडू विविध आणि
रग्बी, कयाकिंगसारख्या नवनव्या क्षेत्रांत घवघवीत यश मिळवताहेत, ही अभिमानाची बाब
आहे. कोल्हापूर ही क्रीडापंढरी आहे. त्यामुळेच या मातीत शिवछत्रपती पुरस्कार
विजेते खेळाडू तयार झाले आहेत. विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपले
प्रभुत्व सिद्ध केले आहेच, आता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी
उंचावण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी करिअर करण्याच्या नादात खेळातून आनंद
मिळविणे मात्र सोडू नका, असा मौलिक सल्ला खेळाडूंना दिला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेस
कुलगुरू डॉ. शिर्के तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते
खेळाडूंना ब्लेझर, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे संघव्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षक यांचाही ब्लेझर व स्मृतिचिन्ह
प्रदान करून सत्कार करण्यात आला. न्यू कॉलेजच्या वतीने नागेशकर चषक प्राचार्य डॉ.
व्ही.एम. पाटील यांनी स्वीकारला.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू मयूर रोकडे,
स्वाती शिंदे आणि स्वप्नाली वायदंडे यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार
जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या
हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तसेच सायटेशन सर्टिफिकेट वाचन डॉ. शरद
बनसोडे यांनी केले. डॉ. दीपक डांगे-पाटील यांनी सूसंचालन केले, तर डॉ. प्रकाश
गायकवाड यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment