Thursday 25 May 2023

शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ‘उत्कृष्ट युवा संसदरत्न’; दिल्लीत होणार गौरव

 पवन पाटील याच्यासह सात विद्यार्थिनींचा समावेश

संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए.बी. आचार्य आणि निरीक्षक प्रा. एस.बी. देओसकर यांच्यासमवेत शिवाजी विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय युवा संसदेमधील 'उत्कृष्ट युवा संसदपटू' बहुमानाचे मानकरी विद्यार्थी (खाली बसलेले) प्रतीक्षा कांबळे, पवन पाटील, ऋतिका धनगर, प्रतीक्षा पाटील, आसिया जमादार, श्रेया म्हापसेकर, सिमरन घाशी आणि अनमोल पाटील. सोबत (उभे) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. तानाजी चौगुले आदी.


कोल्हापूर, दि. २५ मे: शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेअंतर्गत विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांची उत्कृष्ट युवा संसदरत्नम्हणून निवड करण्यात आली. यामध्ये पवन पाटील, असिया जमादार, अनमोल पाटील, श्रेया म्हापसेकर, प्रतीक्षा पाटील, सिमरन घाशी, ऋतिका धनगर, प्रतीक्षा कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सात विद्यार्थिनींचा समावेश आहे.

संसदीय कार्य मंत्रालयामार्फत बक्षीस वितरण समारंभासाठी विद्यापीठातील समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे निमंत्रित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्य यांनी यावेळी जाहीर केले. या राष्ट्रीय संसद स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचा अंतिम निकाल कालांतराने जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये स्वच्छ भारत, कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण,नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, संरक्षण इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या स्पर्धे निरीक्षक म्हणून केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्य, शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस. बी. देओसकर उपस्थित होते. स्पर्धा झाल्यानंतर श्री. आचार्य यांनी निकाल जाहीर केला. "या स्पर्धेचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणे इतकाच नसून युवकांमध्ये नेतृत्व कौशल्याचा विकास व्हावा, असा आहे," असे प्रतिपादन आचार्य यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संसद स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत'ची शपथ घेतली. राष्ट्रगीताने स्पर्धेची सांगता झाली.

No comments:

Post a Comment