Monday 5 June 2023

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठात प्लास्टीक कचरा संकलन

शिवाजी विद्यापीठ परिसरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक कचऱ्याचे संकलन करताना कर्मचारी

शिवाजी विद्यापीठ परिसरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त दूर व ऑनलाईन शिक्षण केंद्र परिसरात संकलित केलेल्या प्लास्टीक कचऱ्यासमवेत संचालक डॉ. डी.के. मोरे, उपकुलसचिव डॉ. संजय कुबल, चंद्रकांत कोतमिरे आणि सहभागी कर्मचारी

शिवाजी विद्यापीठ परिसरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त गणित अधिविभाग परिसरात अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक कचरा संकलन करण्यात आले.

 

कोल्हापूर, दि. ५ जून: आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात प्लास्टीक कचरा संकलन करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रसंघाने या वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त बीट प्लास्टीक पोल्युशन (प्लास्टीक प्रदूषणास हरवू या) ही प्रबोधन थीम घेतली आहे. त्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठामध्येही आज सकाळच्या सत्रात प्रशासकीय इमारतीसह सर्व अधिविभाग, विभाग, रहिवासी संकुले आदी परिसरातील प्लास्टीक कचरा संकलित करण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत प्लास्टीकचे रॅपर, पेन, रिफील, बाटल्या, पिशव्या अशा प्रकारचा कचरा संकलित करण्यात आला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उपक्रमाचे नियोजन केले.

या संदर्भात बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नागरी वावर असलेल्या परिसरात प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण अधिक आढळले. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्लास्टीकचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे विद्यापीठाने ठिकठिकाणी ओला व सुका कचरा संकलनासाठी कुंड्या ठेवलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यासाठी त्यांचा वापर करावा. विद्यापीठाचा आणि आपला सर्वच परिसर परिसर प्लास्टीकमुक्त राहावा, या दृष्टीने हा केवळ एक दिवसीय उपक्रम न राहता कायमची सवय अंगी बाणवावी, असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले.

No comments:

Post a Comment