Tuesday 6 June 2023

स्वराज्याची वाटचाल सुकर करण्यासाठीच

शिवाजी महाराजांकडून राज्याभिषेक: डॉ. रमेश जाधव

 

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. रमेश जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. एस.एन. पवार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. प्रतिमा पवार.

डॉ. रमेश जाधव

कोल्हापूर, दि. ६ जून: छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्याही स्वार्थापायी नव्हे, तर कायदेशीर राजेपणाची मोहोर उमटवून स्वराज्याची वाटचाल अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने राज्याभिषेक करवून घेतला. सन १५६५मध्ये तालीकोटच्या लढाईमुळे विजयनगरचे साम्राज्य लयास गेल्यानंतर शतकभरानंतर पुन्हा एतद्देशीय राज्याची प्रस्थापना जाहीर करणारा ऐतिहासिक क्षण होता, असे प्रतिपादन समाजशास्त्रज्ञ तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवस्वराज्य दिनानिमित्त डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. जाधव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. रमेश जाधव यांनी परप्रांतीयांच्या नजरेतून शिवराज्याभिषेक या विषयावर प्रकाशझोत टाकला. पश्चिम बंगालचे इतिहासतज्ज्ञ जदुनाथ सरकार आणि पंजाबचे डॉ. बाळकृष्ण या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रलेखन केले. त्या चरित्रांच्या अनुषंगाने चर्चा करताना डॉ. जाधव म्हणाले, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेणे ही विजयनगरच्या ऱ्हासानंतर या देशात घडलेली एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तत्कालीन संघर्ष हा दोन धर्मांमधील नव्हता, तर एतद्देशीय आणि परकीय यांच्यामधील तो सत्तासंघर्ष होता. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या बरोबरीने छत्र, सिंहासन, पोशाख हे तर अभिप्रेत होतेच, पण त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने आपल्या कायदेशीर राजेपणाची मोहोर जनमानसावर सर्वदूर उमटविणे महत्त्वाचे वाटत होते. मोहिते-निंबाळकरांसारख्यांनी महाराजांना सातत्याने त्यांच्या राजेपणाविषयी हिणविले. अशा मंडळींना शिवाजी महाराजांना आता मी राजा आहे, असा कडक संदेश राज्याभिषेकाच्या माध्यमातून द्यावयाचा होता. त्याखेरीज स्थानिकांना त्यांची हिंदवी जीवनपद्धती महाराजांनी पुन्हा प्राप्त करून दिली. सर्वधर्मसमभावाची हमी देतानाच आपल्या रयतेला परकीय आक्रमकांपासून पूर्ण संरक्षण देऊन निर्धास्त राहणीमानाची शाश्वती प्रदान केली. स्वतःचे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करीत असताना राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या स्वराज्याला मान्यता प्राप्त करवून घेण्याचा महाराजांचा इरादा या राज्याभिषेकाने साध्य झाला. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल घेतल्यामुळेच इंग्रजीसह हिंदी, फारसी, डच, जर्मन, पोर्तुगीज इत्यादी भाषांमध्ये त्यांच्याविषयीची विपुल साधने निर्माण झाली.

डॉ. जाधव म्हणाले, पश्चिम बंगालचे जदुनाथ सरकार यांनी १२ वर्षे अथक संशोधन करून औरंगजेबाचे पाच खंडी चरित्र साकारले. औरंगजेबावरील संशोधन करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे ते आकृष्ट झाले. औरंगजेबाच्या कट्टरतेला हिंदवी स्वराज्य स्थापन करून कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महाराजांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यातून त्यांनी उपलब्ध समग्र अधिकृत देशी-विदेशी साधनांचा अभ्यास करून शिवचरित्र साकारले. डॉ. बाळकृष्णही शाहू महाराजांच्या बोलावण्यावरुन पंजाबहून कोल्हापूरला आले आणि इथे शिवचरित्राच्या संशोधनात इतके रमले की इथलेच होऊन गेले. अंगात ताप, दम्याचा त्रास सोसत असतानाही त्यांनी महाराजांचे अद्वितिय चार खंडी चरित्र साकारले. या दोन्ही चरित्रकारांनी व्यक्तीगत पातळीवर अनेक अपेष्टा सोसून शिवचरित्रलेखनाचे आपले कार्य पूर्ण केले.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, एकराष्ट्र भावनेची निर्मिती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेमागील सर्वात महत्त्वाचा हेतू होता. नितीमत्ता असणारा त्या काळातील हा एकमेव राजा होता. त्यांचे नियोजन कौशल्य, आकलन क्षमता, पराक्रम, शौर्य या साऱ्याच बाबी स्तिमित करणाऱ्या आहेत. त्यांच्या विविध पैलूंचा आपण सातत्याने मागोवा घेत राहणे आवश्यक आहे. डॉ. जाधव यांच्या संदर्भांसह विवेचन करण्याच्या हातोटीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. विलास संगवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आकाश ब्राह्मणे, सद्दाम मुजावर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस.एन. पवार, डॉ. जगन कराडे, डॉ. आर.बी. पाटील, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, डॉ. अर्चना जगतकर, डॉ. अविनाश भाले यांच्यासह समाजशास्त्राचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment