Friday, 23 June 2023

जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या सहा खेळाडूंची निवड

 विद्यापीठाच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी

राणी मुचंडी

रेश्मा केवटे

सुदेश्ना शिवणकर


ओंकार कुंभार

सिद्धांत पुजारी

संदेश कुरळे



कोल्हापूर, दि. २३ जून: चीनमधील चेंगडू येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या सहा क्रीडापटूंची भारतीय विश्वविद्यालय संघामध्ये निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या सहा खेळाडूंची निवड झाली आहे. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी ही माहिती दिली.

डॉ. बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत चीनमधील चेंगडू येथे जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय विश्वविद्यालय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. भारतीय संघ अॅथलेटिक्स, टेनिस टेबल, लॉन टेनिस, जलतरण, तिरंदाजी, बॅडमिंटन, तलवारबाजी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू ॲथलेटिक्स आणि लॉन टेनिस या दोन क्रीडा प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने अॅथलेटिक्समध्ये पाच जण आणि लॉन टेनिसमध्ये एक असे एकूण सहा खेळाडू सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच सहा खेळाडू एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडले गेल्याची घटना घडली आहे.

जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे (कंसात महाविद्यालयाचे नाव व क्रीडा प्रकार यानुसार) पुढीलप्रमाणे:- १. ओंकार कुंभार (नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी, ८०० मी. धावणे), २. सिद्धांत पुजारी (आजरा महाविद्यालय, आजरा, ३००० मी.  स्टीपलचेस), ३. सुदेश्ना शिवणकर (यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, सातारा, १०० मी. धावणे X १०० मी. रिले), ४. रेश्मा केवटे (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन), ५. राणी मुचंडी (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन) आणि ६. संदेश कुरळे (शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज, लॉन टेनिस)

यातील ओंकार कुंभार याने खेलो इंडियास्पर्धेत रौप्य पदक आणि अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. सिद्धांत पुजारी याने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि खेलो इंडियामध्ये रौप्य पदक मिळविले आहे. सुदेश्ना शिवणकर हिने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्ण आणि कांस्य तर खेलो इंडियामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविले आहे. रेश्मा केवटे हिने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धे सुवर्ण आणि कांस्य पदक आणि खेलो इंडियामध्ये रौप्य पदक मिळविले आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत तिने वैयक्तिक व सांघिकही सुवर्णपदक पटकावले आहे. राणी मुचंडी हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्रीमध्ये वैयक्तिक आणि सांघिक रौप्य पदक जिंकले आहे. टेनिसपटू संदेश कुरळे याने पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये रौप्यपदक तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे.

खेलो इंडिया आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आणून ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी या खेळाडूंनी केली आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला जनरल चॅम्पियनशिप मिळवून देण्यामध्ये या खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे.

या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शिवाजी विद्यापीठ ॲथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक रामा पाटील, डॉ. इब्राहिम मुल्ला, डॉ. सविता भोसले, अभिजित पांडुरंग मस्कर, डॉ. देवेंद्र बिरनाळे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. उदय शिंदे, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. राहुल मगदूम, बळवंत बाबर, मंजुळा पाटील-साखरे यांच्यासह सर्व प्रशिक्षक, निवड झालेल्या खेळाडूंच्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

 

विद्यापीठाच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या सहा खेळाडूंची एकाच वेळी जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड होणे, हा विद्यापीठाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, यंदाच्या मोसमात विद्यापीठाच्या खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये आपली कामगिरी उंचावली आणि त्यामध्ये सातत्य राखले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचेच हे फलित आहे. हे खेळाडू अभिनंदनास पात्र आहेतच; शिवाय, जागतिक स्पर्धेत ते देशाबरोबरच शिवाजी विद्यापीठाचाही नावलौकिक उंचावतील, असा विश्वास मला वाटतो. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आणि सर्वच प्रशिक्षक यांचे या निमित्ताने मी अभिनंदन करतो.

No comments:

Post a Comment