Tuesday, 27 June 2023

नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीसाठी छत्र संस्था महत्त्वाची: अतुल खिरवाडकर

 

अतुल खिरवाडकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापन विकास कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. राजेंद्र पडवळ, धनंजय गोखले, अतुल खिरवाडकर, महेश धर्माधिकारी व निपुण कोरे.


कोल्हापूर, दि. २७ जून: नागरी सहकारी बँकांसमोर वृद्धी साधण्याचे मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने नॅशनल को-ऑपरेटिव्ह फायनान्शियल अँड डेव्हलपमेंट कंपनी (एन.सी.एफ.डी.सी.) ही छत्र संस्था निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व नागरी सहकारी बँकांनी एकत्र येऊन आपली प्रगती साधून घ्यावी, असे आवाहन या छत्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑप इंडिया अध्यासन, गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्र संस्था आणि नागरी सहकारी बँकांसमोरील रिझर्व्ह बँकेशी निगडित समस्या समजून घेताना या विषयावर एकदिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. खिरवाडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे प्रमुख उपस्थित होते.

श्री. खिरवाडकर यांनी नागरी सहकारी बँकांच्या दृष्टीकोनातून छत्र संस्थेचे समकाळातील महत्त्व अगदी सोप्या भाषेत विषद केले. ते म्हणाले, भारतातील २८ राज्यांपैकी अवघ्या ११ राज्यांत सहकारी बँका आहेत. केंद्रशासित प्रदेशात अथवा ईशान्येकडील राज्यांत एकही सहकारी बँक नाही. गेली २७ वर्षे झाली, नागरी सहकारी बँकांची संक्रमणावस्था संपतच नाही. या काळात सदर बँकांची संख्या २२०० वरुन १४०० पर्यंत खाली आली आहे. आणखीही ६०-७० बंद होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्यक्षात देशातील व्यापक लोकसंख्येला नागरी सहकारी बँकांची आवश्यकता असताना, नेमके कोठे चुकते आहे, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून विविध समित्या नेमून परिस्थितीचा वेध घेण्यात आला. दास कमिटीने सर्वप्रथम नागरी सहकारी बँकांसाठी छत्र संस्थेची शिफारस केली. त्यातून ही संस्था या वर्षअखेरपर्यंत कार्यान्वित होते आहे. देशातील नागरी सहकारी बँकांना संघटित करणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करणे, असे प्रमुख हेतू त्यामागे आहेत. सहकारी बँका संघटित झाल्यास चमत्कार घडविण्याची त्यांची क्षमता सिद्ध होईल. सहकारी बँकांना मदत करणे, हे तर महत्त्वाचे उद्दिष्ट आहेच. त्याच बरोबरीने त्यांना आवश्यक तेथे योग्य सल्ला देणे, समस्या सोडविण्यासाठी संवादसेतू निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून एकात्मिक संरचना निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टेही आहेत. त्याचा नागरी सहकारी बँकांना निश्चितपणाने लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात बँकिंगशी निगडित केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यापीठ आणि बँकिंग विश्व यांचे सहसंबंध दृढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. यापुढील काळातही या दोन क्षेत्रांनी एकत्र येऊन सहकारी बँकिंग हे नव्या युगाचे बँकिंग म्हणून नव्या पिढीशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या क्षेत्रात चांगले मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना इंटर्नशीप कशी मिळवून देता येईल, या दृष्टीने धोरण आखता येऊ शकेल. गरजाधारित अभ्यासक्रम निर्माण करता येतील. तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने मनुष्यबळास प्रशिक्षित करता येईल. तसेच क्षमता वर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेता येऊ शकतील.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्यासह मुंबईचे लेखापरीक्षक धनंजय गोखले आणि रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनीही मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासनाचे समन्वयक डॉ. राजेंद्र पडवळ यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर महेश धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोल्हापुरातील विविध नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment