कोल्हापूर, दि. ५ जून: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२३) मध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी ही माहिती दिली.
डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज सन
२०२३साठीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. सन २०१६
पासून ही क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी अर्थात सन २०१६ मध्ये या
क्रमवारी देशभरातील अवघ्या ३५६५ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. गत वर्षी
म्हणजे सन २०२२मध्ये ५५४३ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी शिवाजी
विद्यापीठ १०१-१५० या बँडमध्ये होते. यंदा सन २०२३मध्ये देशभरातील एकूण ८६८६
शैक्षणिक संस्था सहभागी झाल्यानंतर सुद्धा शिवाजी विद्यापीठाने १५१-२०० बँडमध्ये देशातील
आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान पटकावले आहे.
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक
कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित
समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि विद्यापीठाशी
संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे
व महाविद्यालये यांच्याबरोबरच संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर व नियोजन,
वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कायदा, कृषी व कृषीपूरक क्षेत्रे आणि नाविन्यता या
क्षेत्रांतील शैक्षणिक संस्थांचाही या क्रमवारीमध्ये समावेश आहे.
या क्रमवारीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या
क्रमवारीमध्ये सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या गतवर्षीच्या
तुलनेत वाढून सुद्धा शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान फारसे विचलित
झालेले नाही. तथापि, वर्षागणिक वाढणारी स्पर्धा आणि बदलते निकष पाहता विद्यापीठाचे
स्थान उंचावण्यासाठी कोणकोणत्या निकषांवर अधिक काम करावे लागणार आहे, याविषयी सर्व
संबंधित घटकांना अवगत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment