Wednesday, 21 June 2023

योगसाधनेने दिवसाची सुरवात सकारात्मक ऊर्जादायी करा: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसाधना शिबिराचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश गायकवाड, योग शिक्षक सूरज चौगुले, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. महादेव देशमुख आदी.


प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील












शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष योगसाधना शिबिरात सहभागी झालेले योगसाधक.

(शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय योग दिन शिबिराचा व्हिडिओ)

कोल्हापूर, दि. २१ जून: योगसाधनेच्या सहाय्याने प्रत्येकाने आपल्या दिवसाची दैनंदिन सुरवात सकारात्मक ऊर्जेने करावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आज आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष योगसाधना शिबिराने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्र-कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील १७५ देशांमध्ये या निमित्ताने योगसाधना केली जाते. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे दि. २१ जून २०१५ पासून गेली नऊ वर्षे सलग दैनंदिन स्वरुपात विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये मोफत योग शिबीर घेतले जात आहे. या उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात. हा उपक्रम येथून पुढेही नित्य स्वरुपात सुरू राहील. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य जपावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी ७.२० ते ८.४५ या कालावधीत योगसाधना शिबीर पार पडले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. योगसाधना शिबिरात प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले सहभागी झाले. विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनीही या योगसाधना शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झाले. उचगावचे योगशिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले.

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित २८६ महाविद्यालयांतही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment