Monday 26 June 2023

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ

 प्रस्तावित काम वर्षभरात पूर्ण करा: मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सूचना

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकामाच्या भूमीपूजनप्रसंगी कुदळ मारुन प्रारंभ करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रसंगी कोनशिला अनावरण करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रसंगी इमारतीच्या नकाशाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर.


कोल्हापूर, दि. २६ जून: शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीचे प्रस्तावित बांधकाम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात येऊन त्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी पूरक व दिशादर्शक अशा अभ्यासक्रमांना प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी राज्य शासनाने भरीव निधीचीही तरतूद करण्यात आली. या विभागासाठी स्वतंत्र इमारत विद्यापीठाकडून प्रस्तावित करण्यात आली. त्या प्रस्तावित इमारतीच्या बांधकामास आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बोलत असताना मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपरोक्त निर्देश दिले.

सुरवातीला मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन स्कूलच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मंत्री पाटील यांनी यावेळी संबंधित इमारतीच्या नकाशांची पाहणी करून केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर परिसरातील एक आदर्श इमारत म्हणून याची उभारणी करावी, असेही सुचविले. कामाच्या बाबतीत कोणतीही कुचराई न होता वर्षभराच्या कालावधीत इमारतीच्या प्रस्तावित तळमजल्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मंत्री श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे समन्वयक डॉ. नितीन माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.आर. पाटील, अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, उपअभियंता हेमा जोशी, ठेकेदार प्रशांत कदम, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार, कै. शारदाबाई पवार अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. अमोल मिणचेकर यांच्यासह स्कूलमधील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

इमारतीविषयी थोडक्यात माहिती...

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या प्रस्ताविक इमारतीमध्ये तळमजला अधिक दोन मजले असणार आहेत. पहिल्या टप्प्यात आजपासून तळमजल्याच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत एकूण २०५१.१५ चौ.मी. इतके बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये ५ कोटी ३५ लाख २८ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वास्तुविशारदांनी याचे नकाशे तयार केले असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच इमारतीचे काम करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील श्री दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत हे काम करवून घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment