Wednesday, 7 June 2023

शिवाजी महाराजांनी नवसमाज निर्मितीचा पाया घातला: डॉ.नंदकुमार मोरे

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. नंदकुमार मोरे. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. इस्माईल पठाण व डॉ. विलास शिंदे.



कोल्हापूर, दि. जून: शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बीज पेरले, मात्र, हे काम सांघिक आहे, असा विचार त्यांनी पेरला. हे त्यांच्या स्वराज्य निर्मितीचे गमक होय. स्वराज्यनिर्मितीतून त्यांनी नवसमाज निर्मितीचा पाया घातला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित ''शिवरायांची स्वराज्याची संकल्पना'' या विषयावरील जाहीर व्याख्यानामध्ये डॉ.नंदकुमार मोरे प्रमुख वक्ते म्हणून काल बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, भारताच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाच्या वाटचालीत कधी झाली नव्हती, अशी घटना ३५० वर्षांपूर्वी घडली, ती म्हणजे शिवराज्याभिषेक होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी नूतन सृष्टी आणि नवीन स्वराज्य स्थापन केले. यातून नवसमाज रचनेचा पाया रचला गेला. शिवाजी महाराजांच्या कार्याचे निरीक्षण केले, तर त्यांच्याकडे कल्पकता, धाडसी वृत्ती, वैचारि प्रगल्भता, दूरदृष्टी आणि सौजन्य दिसून येते. नवीन समाजरचना, नवीन राज्य व्यवस्था प्रत्यक्षात अंमलात आणली म्हणून त्यांच्या कार्याचे मोल अधिक आहे. संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, तिमानता, विजेची चपळाई हे गुण लहानपणापासूनच त्यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांनी प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. महाराज इतर सर्व राज्यव्यवस्थांमध्ये उठून दिसत होते. त्यांनी स्वत:च्या भूमीचे महत्त्व ओळखले होते. दऱ्या-खोऱ्यांचा, जंगलांचा, झाडी-झुडपांचा, डोंगरकपारींचा आणि किल्ल्यांचा त्यांनी यथायोग्य वापर करून घेतला. ही सर्व त्यांची बलस्थाने ठरली.  अनेक गडकिल्ले त्यांनी बांधून उभे केले. लष्कराची आणि रयतेची साधनसंपत्ती गडावर सुरक्षित राहील, याची दक्षत घेतली. आरमारामध्ये कोळी आणि बहुजन समाजातील लोकांना सामावून घेतले. लष्करामध्ये शेतकरी अधिक चांगल्या द्धतीने काम करतो, हे छत्रपतींनी ओळखले होते आणि म्हणून त्यांना आपल्या आरामारामध्ये संधी दिली. त्यांच्या कार्यामध्ये प्रचंड नैतिकता होती. स्त्रियांच्या आणि रयतेच्या सुरक्षितेला ते प्राधान्य देत. शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त महत्त्व चारित्र्याला दिले, असे इतिहासकार सांगतात. त्यामुळेच त्यांनी सुसंस्कृत आणि चारित्र्यवान लोक उभे केले.  त्यांच्या काळात एकही माणूस फितूर झाला नाही, अशी निष्ठा त्यांनी त्यांच्या वर्तनातून शिकविली.  हे लोक त्यांच्या कार्याची आणि विचारांची मोजमाप करण्याची पट्टी आहे. 

शिवराय हे उत्कृष्ट स्वराज्य संकल्पक: डॉ. इस्माईल पठाण

प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी यावेळी ''शिवराज्यभिषेक: स्वरूप आणि महत्त्व'' या विषयावर विवेचन केले. ते म्हणाले, शहाजी महाराजांचे बंडखोर पुत्र, अशी शिवाजी महाराज यांची प्रतिमा निर्माण झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य संकल्पना राबविण्याचे आणि समाजबांधणीचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे केले. महाराजांचे मावळे हे प्रामाणिक, चपळ, काटक आणि अत्यंत निष्ठावान होते. छत्रपतींनी वयाच्या बाराव्या वर्षी मावळ्यांचे संघटन करण्यास सुरूवात केली. महाराजांनी खूप चांगले गडकोट, मुलकी प्रशासन, खजिना, न्याय व्यवस्था निर्माण केली.  ३५० किल्ल्यांपैकी १४० किल्ल्यांची त्यांनी डागडुजी केली.  गडकोट म्हणजे राज्याची सुरक्षितता. महाराजांचे राज्याभिषेक झालेला नसल्यामुळे धार्मिक आणि प्रशासकीय अडचणी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत. तीस वर्षांमध्ये महाराजांनी स्वराज्याची यंत्रणा, नितिमत्तेचा आधार उभा केला. त्यासाठी अखंड मेहनत घेतली. अडचणींचे निराकरण करण्यासाठी आणि प्रशासन अधिक सोयीस्कर होण्यासाठी राजांनी वयाच्या ४४ व्या वर्षी राज्याभिषेक केला. स्तुतीपाठकांना महाराजांनी कधीही जवळ घेतले नाही. महाराजांचे क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी काशीमधून महापंडीत गागाभट्ट आले. त्यांनी आपल्या विद्वत्तेने धार्मिकतेचा प्रश्न सोडविला.

डॉ. पठाण पुढे म्हणाले, शिवाजी महाराज दुर्गप्रेमी, दुर्गतज्ज्ञ होते. दारूगोळा कारखाना निवासी इमारतींपासून दूर ठेवला होता. त्याचे लाकडी बांधकाम केले नव्हते. रयतेच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली होती. सबंध जगाशी लढू शकेल असा मजबूत आणि सुरक्षित रायगड होता. राजसदरेमध्ये सहा हजार लोक बसू शकत.  सिंहासनावरून उच्चारलेला शब्द दोनशे फुटांपर्यंत कू जात असे. शिवाजी महाराज फक्त मातृभक्तच नव्हते तर ते पितृभक्तही होते. रायगडाच्या आजूबाजूच्या लोकांना बोलावून रायगडाची सुरक्षितता निश्चित केल्यानंतर राज्याभिषेकास शिवाजी महाराज तयार झाले. राज्याभिषेकाचे निमंत्रण महाराजांनी देशभरातील सर्व विद्वानांना दिले होते. राज्याभिषेकासाठी रायगडावर वीस हजार लोक आले होते. त्यांच्याकरिता चार महिने पंचपक्वानांचे जेवण सुरू होते. विविध समित्या तयार करून त्यांच्यावर कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. राज्याभिषेक समारंभामध्ये उत्कृष्ट सुशोभीकरण करण्यात आले होते. पौरोहित्याचे नेतृत्व पंडीत गागाभट्ट यांनी केले. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघाली. महाराजांनी प्रचंड दानधर्म केला. रायगडावर आलेल्या प्रत्येकाला महाराजांनी सन्मानपूर्वक दक्षिणा दिल्या. राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी महाराजांनी स्वत:च्या नावाचा कधीही उपयोग केला नाही. उलट, आपल्या शूर सैन्याचा आणि सरदारांचा वेळोवेळी सन्मान आणि सत्कार केला. 

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिवचरित्र वाचलेच पाहिजे, असा चंग बांधला पाहिजे. अनेक गडकोट, किल्ल्यांची उभारणी करणारे स्वराज्याचे वास्तूविशारद म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले पाहिजे. सैन्यामध्ये राष्ट्रभावना निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचे र्तृत्व देशाच्या अन्य भागात पोहचले. देशभरात अतिशय आदरपूर्वक महाराजांचा उल्लेख केला जातो.  

इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ.अवनीश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विविध अधिविभागांचे प्रमुख, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.


No comments:

Post a Comment