Showing posts with label NIRF. Show all posts
Showing posts with label NIRF. Show all posts

Monday, 5 June 2023

देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठ

 


कोल्हापूर, दि. ५ जून: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२३) मध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी ही माहिती दिली.

डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज सन २०२३साठीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. सन २०१६ पासून ही क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी अर्थात सन २०१६ मध्ये या क्रमवारी देशभरातील अवघ्या ३५६५ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. गत वर्षी म्हणजे सन २०२२मध्ये ५५४३ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी शिवाजी विद्यापीठ १०१-१५० या बँडमध्ये होते. यंदा सन २०२३मध्ये देशभरातील एकूण ८६८६ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्यानंतर सुद्धा शिवाजी विद्यापीठाने १५१-२०० बँडमध्ये देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान पटकावले आहे.

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे व महाविद्यालये यांच्याबरोबरच संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर व नियोजन, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कायदा, कृषी व कृषीपूरक क्षेत्रे आणि नाविन्यता या क्षेत्रांतील शैक्षणिक संस्थांचाही या क्रमवारीमध्ये समावेश आहे.

या क्रमवारीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या क्रमवारीमध्ये सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढून सुद्धा शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान फारसे विचलित झालेले नाही. तथापि, वर्षागणिक वाढणारी स्पर्धा आणि बदलते निकष पाहता विद्यापीठाचे स्थान उंचावण्यासाठी कोणकोणत्या निकषांवर अधिक काम करावे लागणार आहे, याविषयी सर्व संबंधित घटकांना अवगत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


Sunday, 26 June 2016

शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास व्हर्च्युअल क्लासरुम तंत्रज्ञान उपयुक्त: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



'एनआयआरएफ' रँकिंगबद्दल शिवाजी विद्यापीठाचा केला गौरव; वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारत, म्युझियम कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन उत्साहात
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे डिजीटल कोनशीला अनावरण करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातमार्गदर्शन करतानामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

शिवाजी विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन केल्यानंतर दिव्यचक्षू विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध सुविधेचीमाहिती घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री विनोद तावडे व मंत्री चंद्रकांतदादा पाटील.


कोल्हापूर, दि. २६ जून: व्हर्च्युअल क्लासरुम हे ज्ञानाचे आधुनिक भांडार आहे. शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास निश्चितपणे हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेली ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारत व राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारत यांचे भूमीपूजन, राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियान (रुसा)अंतर्गत विकसित केलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात २८व्या तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केल्याबद्दल गौरव अशा संयुक्त समारंभात संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, 'रुसा'च्या महाराष्ट्र प्रकल्प संचालक श्रीमती मनिषा वर्मा, खासदार संभाजीराजे छत्रपती व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पूर्वी शैक्षणिक अथवा आरोग्यविषयक सुविधा शहरापासून गावांपर्यंत नेण्यासाठी रस्ते महत्त्वाची भूमिका बजावत. पण, आजच्या युगात 'कम्युनिकेशन हायवे'च्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ व्हर्च्युअल मार्गांनी गावांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे. डिजीटल अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण-शहरी दरी कमी होण्यास मदत होते आहे. ज्ञानाची व्याप्तीही यामुळे वाढली. जगातील सर्व ज्ञान तंत्रज्ञानामुळे आपल्याला उपलब्ध झाले आहे. ते खुले करून त्याचे लाभ सर्वदूर पोहोचविणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या विविध आघाड्यांवरील कामगिरीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे, ते विद्यापीठ शैक्षणिक बाबत आघाडीवर असायलाच हवे. त्याप्रमाणे आपण एनआयआरएफ क्रमवारीत राज्यात आघाडीवर आहात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्यात देशातल्या विद्यापीठांत आघाडीवर येण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करील.
वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागासाठी नवी इमारत उभी करत असताना या ठिकाणी आजच्या काळाची नवी आव्हाने पेलण्यास सुसज् असे पत्रकार घडवावेत. त्यासाठी नवीन, कालसुसंगत अभ्यासक्रम निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, 'रुसा'मुळे राज्यात खऱ्या अर्थाने विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याला गती मिळाली आहे. या अभियानातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठांनी करून घेणे आवश्यक आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे कोनशीला अनावरण करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर व म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे डिजीटल कोनशीला अनावरण करण्यात आले.
तत्पूर्वी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामध्ये 'रुसा'अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गत वर्षभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर केला. 
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, प्राचार्य, अधिविभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये देशात २८वे, तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना विशेष पत्र प्रदान करून विद्यापीठाचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

'एनआयआरएफ' रँकिंगबद्दल मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
शिवाजी विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठात प्राप्त केलेले अग्रस्थान ही प्रशंसनीय बाब आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना या बाबतीत गौरव करणारे प्रशस्तीपत्र आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रदान केले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. राज्यात होऊ घातलेल्या आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ यांसारख्या संस्थांमुळे स्पर्धाक्षम शिक्षणाची कवाडे मोठ्या प्रमाणावर खुली होतील. विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरुप अधिकाधिक उपयोजित आणि संशोधनात्मक करण्याबरोबरच कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ निश्चितच अग्रक्रमाने प्रयत्नशील राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Saturday, 9 April 2016

उच्चशिक्षणातील गुणवत्तेकडे...

(मा. कुलगुरू यांचे विशेष अतिथी संपादकीय)




(केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या 'एन.आय.आर.एफ.' रँकिंगमध्ये देशात २८ वे तर राज्यात अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान मिळविण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाने नुकतीच नोंदविली. या निमित्ताने आज, शनिवार, दि. ९ एप्रिल २०१६ रोजीच्या 'दैनिक सकाळ'च्या सर्व आवृत्त्यांमध्ये कुलगुरू प्रा.(डॉ.) देवानंद शिंदे यांचे विशेष अतिथी संपादकीय प्रकाशित झाले आहे. या ब्लॉगच्या वाचकांसाठी दै. सकाळच्या सौजन्याने सदर संपादकीय पुनर्प्रकाशित करीत आहे.)

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशातील उच्च शिक्षण संस्थांची 'एन.आय.आर.एफ.' (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क) क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये आयआयटी, आयआयएससी यांच्यासह राष्ट्रीय आणि पारंपरिक विद्यापीठांचा, स्वायत्त संस्थांचाही समावेश आहे. या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठ देशात २८व्या, तर राज्यातील अकृषी विद्यापीठांत अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले. सुवर्णमहोत्सवी शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरावा. या गोष्टीचा आनंद व अभिमान आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही आहे.
एन.आय.आर.एफ.च्या क्रमवारीचे महत्त्व अनेक अर्थांनी वेगळे आहे. जगातल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकही नाही, असे केवळ अरण्यरुदन करण्यात आपण मग्न व्हायचो. तथापि, त्यांचे निकष अथवा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्य पात्रता यांचा आपण कधी विचार करीत नाही. जागतिक क्रमवारीचा विचार करीत असताना राष्ट्रीयच नव्हे, तर अगदी राज्य पातळीवरील क्रमवारी लावण्याची यंत्रणाही आपल्याकडे अगदी सप्टेंबर २०१५पर्यंत अस्तित्वात नव्हती. 'नॅक'च्या सीजीपीए गुणांकनामधून आपल्या स्थानाविषयी थोडीफार जाणीव विकसित व्हायला लागली, एवढीच काय ती त्यातल्या त्यात जमेची बाजू. पण एन.आय.आर.एफ. क्रमवारीमुळे मात्र देशातील सर्व शैक्षणिक संस्थांची क्रमवारी आता अधिकृत झाली आहे. कोणत्याही खाजगी संस्थेची नव्हे, तर थेट केंद्र सरकारची त्यावर मोहोर असल्याने या क्रमवारीचे महत्त्व मोठे आहे. आता जगाच्या पाठीवरील कोणत्याही व्यक्तीला, विद्यार्थ्याला अथवा शैक्षणिक संस्थेलाही भारतीय विद्यापीठांचे नेमके स्थान काय, याची माहिती यातून मिळणार आहे. शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणाबरोबरच आंतरराष्ट्रीयीकरणाच्या व्यासपीठावरही या द्वारे आपला अधिकृतपणे प्रवेश झाला आहे, असे म्हणता येईल.
उच्चशिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या संदर्भात बोलत असताना दोन गोष्टींची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविले. भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा आणि म्हणूनच सर्वाधिक कृतीशीलतेचा, सृजनशीलतेचा देश बनला पाहिजे. त्या बळावर महासत्ता होण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकणार नाही. याच्या सिद्धीसाठी केंद्र सरकारने 'मेक इन इंडिया', 'स्कील इंडिया' ही दोन अत्यंत महत्त्वपूर्ण अभियाने हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय उच्चशिक्षण संस्थांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. एकीकडे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अंतर्गत उच्चशिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १५ ते १७ टक्क्यांवरुन किमान २५ टक्क्यांच्या घरात नेण्याचे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे दुहेरी आव्हान उच्चशिक्षण संस्थांसमोर आहे. तथापि, गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मिती हे आपल्या उच्चशिक्षण संस्थांसमोरचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संशोधन व विकास, कौशल्य शिक्षण, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या चतुःसूत्रीचाच आधार आपल्याला घ्यावा लागणार आहे. संशोधन व विकासाला चालना देणे हे विद्यापीठाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. नवोपक्रम आणि समाजोपयोगी नवसंशोधनाला चालना देणे आणि त्यासाठी आवश्यक साधनसुविधांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
केवळ पारंपरिक शिक्षणाच्या आधारावर उभ्या राहिलेल्या कच्च्या मनुष्यबळाचा भक्कम राष्ट्रबांधणीला किंवा त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातही फारसा लाभ होऊ शकत नाही. त्यामुळे कौशल्य विकास हा आजच्या काळातील शिक्षणातील कळीचा मुद्दा बनला आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण घेऊन बाहेर पडणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ राष्ट्रासाठी निश्चितपणे व सक्षमपणे योगदान देऊ शकते.
तंत्रज्ञान हा सुद्धा आजच्या शिक्षण व्यवस्थेचा पासवर्ड आहे. अत्याधुनिक माहिती संवाद तंत्रज्ञानाच्या अंगिकाराने या व्यवस्थेत एक व्यापक पॅराडाइम शिफ्ट आणला आहे. विद्यार्थ्यांना आज चहूबाजूंनी माहितीची कवाडे खुली आहेत. तथापि, या माहितीचे प्रोसेसिंग करून त्याचे ज्ञानात रुपांतर करून देणाऱ्या शिक्षकांची येथे खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणेही आवश्यक आहे. उपलब्ध मनुष्यबळाचे तसेच अतिरिक्त मनुष्यबळाचेही योग्य व्यवस्थापन करण्याचे ज्ञानही आजघडीला या व्यवस्थेमध्ये अतिशय आवश्यक बनले आहे. या चारही बाबींचे जितके संतुलन व समन्वयन आपण साध्य करू, तितकी आपली उच्चशिक्षण व्यवस्था अधिक विद्यार्थीभिमुख व समाजाभिमुख होईल.
याठिकाणी विद्यापीठांच्या संदर्भातील आणखी एक बाब प्रकर्षाने बदलण्याची आवश्यकता मला भासते. ती म्हणजे संशोधनाची व्याप्ती ही आता केवळ विद्यापीठांपुरती मर्यादित राखता कामा नये. तर तिचा विस्तार पदवीपूर्व स्तरापर्यंतही केला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनापासून संशोधनाची गोडी विद्यार्थ्यांत निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे; जेणे करून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या भागविण्याच्या दृष्टीने आवश्यक संशोधनाची व्याप्ती खऱ्या अर्थाने वाढेल. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकांनाही संशोधनासाठी विद्यापीठांनी प्रेरित करायला हवे. महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांना संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी एखादी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती किंवा पारितोषिक योजना विद्यापीठे स्वनिधीतून राबवू शकतात. इतरही अभिनव योजना, प्रकल्पांचा विचार करता येऊ शकतो. राष्ट्रउभारणी करणाऱ्या युवकांचे हात संशोधन, तंत्रज्ञान व कौशल्यांनी परिपूर्ण असतील आणि त्याला विवेकाची जोड असेल, तर त्या राष्ट्राचे महासत्तेत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही.
(सौजन्य: 'दै. सकाळ')

Monday, 4 April 2016

केंद्राच्या राष्ट्रीय क्रमवारीत शिवाजी विद्यापीठ २८वे; राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले





कोल्हापूर, दि. ४ एप्रिल: 'नॅक' (बंगळूर)च्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.१६ सीजीपीए मूल्यांकनासह राज्यातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ ठरलेल्या शिवाजी विद्यापीठाने आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या राष्ट्रीय क्रमवारीत २८वे तर महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) ही देशातल्या 'टॉप-१००' विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांची क्रमवारी आज जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन अकृषी विद्यापीठे आहेत. यात शिवाजी विद्यापीठ २८व्या स्थानी आहे, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हे अनुक्रमे ५९ व ८७व्या स्थानी आहेत.
याखेरीज शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित दोन महाविद्यालयांनीही टॉप-१०० महाविद्यालयांच्या यादीत स्थान मिळविले आहे. अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर या महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत ७५वे तर राज्यस्तरीय यादीत सातवे स्थान मिळविले आहे. फार्मसी संस्थांच्या यादीत कोल्हापूर येथील भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत २५वे तर राज्यस्तरीय यादीत पाचवे स्थान मिळविले आहे.
विविध खाजगी संस्था विविध प्रकारच्या निकषांवर शैक्षणिक संस्थांच्या निरनिराळ्या क्रमवारी प्रसिद्ध करीत असतात. तथापि, या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर २०१५ रोजी 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क'ची निर्मिती केली. अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर ही क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे व महाविद्यालये यांच्यासाठीच्या क्रमवारीखेरीज अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर या क्षेत्रांतील विशेष शैक्षणिक संस्थांचीही स्वतंत्र क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
अभिमानास्पद व जबाबदारीची जाणीव करून देणारी कामगिरी: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठाने केंद्रीय मंत्रालयाच्या टॉप-१०० शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत २८वे आणि राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान प्राप्त केले, ही विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाच्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी यांच्यासह सर्वच संबंधित घटकांचे मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने 'नॅक'च्या पुनर्मूल्यांकनात राज्यातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ होण्याचा बहुमान पटकावला होताच. विद्यापीठाच्या या कामगिरीवर केंद्रीय मंत्रालयाच्या क्रमवारीत मिळालेल्या स्थानामुळे शिक्कामोर्तबच झाले आहे. यातून विद्यापीठावरील जबाबदारी वाढली आहे. ज्या संशोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर विद्यापीठाला हे स्थान प्राप्त झाले आहे, ती आगेकूच कायम राखण्यासाठी सर्वच घटकांची मोलाची साथ लाभेल, असा मला विश्वास आहे.