Wednesday, 5 February 2025

शिवाजी विद्यापीठात ‘कार्निव्हल-२०२५’ला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. मेघा पानसरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अनिल घुले आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत मांडलेल्या प्रदर्शनाची सहभागी विद्यार्थ्यांकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. 

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत मांडलेल्या प्रदर्शनाची सहभागी विद्यार्थ्यांकडून माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. मेघा पानसरे, डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली पुस्तके आणि वस्तू. 

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली घरे व मंदिरांची मॉडेल्स. 

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाअंतर्गत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या आकर्षक विदेशी वस्तू. 

(कार्निव्हल-२०२५ महोत्सवाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्निव्हल-२०२५या कला-सांस्कृतिक महोत्सवाला आज विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. रशिया, जपान, पोर्तुगाल आणि जर्मनी या देशांच्या कला-संस्कृतीचा परिचय करून घेण्याची संधी या निमित्ताने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लाभली.

महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आज सकाळी वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये झाले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, विदेशी भाषा, कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारा हा उत्सव म्हणजे विविध जागतिक संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा उपक्रम असून विद्यार्थ्यांनी आपल्या कारकीर्दीसाठी या विदेशी भाषा शिक्षणाचा उत्तम उपयोग करून घ्यावा. पुढील वर्षापासून विद्यापीठाच्या ग्रंथालयासमोरील उद्यानात हा कार्निव्हल भरविण्यात यावा, जेणे करून सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा आनंद घेता येईल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. उद्घाटनानंतर कुलगुरूंनी सर्व प्रदर्शनाची फिरून पाहणी केली आणि विद्यार्थ्यांकडून संबंधित माहितीही घेतली.

कार्निव्हलमध्ये रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज भाषेच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या त्या-त्या देशांतील पारंपरिक कला वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. रशियन विद्यार्थ्यांनी समवार, मत्र्योश्का बाहुली, स्त्रियांचे पारंपरिक रंगीबेरंगी स्कार्फ, इकोना चित्रे, त्सार टोपी, पारंपरिक लाकडी व काचेच्या वस्तू आणि रशियन रंगचित्रे यांची मांडणी केली. जपानी विषयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक जपानी चित्रे, ‘ओरीगामीचे विविध प्रकार, 'साकुरा' फुले आणि माउंट फुजीच्या कलाकृती, जपानी घरे आणि मंदिरे यांच्या प्रतिकृती, जपानी राहणीमानाची माहिती देणारे फलक तसेच शिबोरी प्रकारातील पर्यावरणस्नेही वस्तूंचे सुंदर प्रदर्शन मांडले. जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांनी बी.एम.डब्ल्यू, फोक्सवॅगन कंपन्यांच्या मोटारींचे मॉडेल्स, फुटबॉल स्टेडियम, हॅम्बुर्ग आणि बर्लिन शहरे यांची माहिती, तेथील खानपानाच्या सवयी आणि त्यांची वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली. पोर्तुगीज विद्यार्थ्यांनी पोर्तुगालमधील सिरॅमिक प्लेट्स, पोर्सिलीन वस्तू, की चेन, फ्रिज मॅग्नेट, स्कार्फ, पारंपरिक अॅप्रन, आदिवासींनी जंगलातील बियांपासून बनवलेली टोपी, शिकारीची शस्त्रे, पिंग, गालीन्या, काफे, परफ्युम यांसह अन्य वस्तूंचे प्रदर्शन मांडले. रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज या सर्व भाषांतील प्रसिद्ध लेखक, त्या संस्कृतींचा परिचय करून देणारी पुस्तके, शब्दकोश आणि बालसाहित्य देखील प्रदर्शित करण्यात आले.

कोल्हापुरातील डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी यांच्या सहकार्याने कार्निव्हलमध्ये विदेशी उपाहाराचे स्टॉल लावण्यात आले. येथील वेगवेगळ्या देशांतील लोकप्रिय खाद्यपदार्थांचा आस्वादही उपस्थितांना घेता आला.

सुरवातीला रशियन भाषेच्या विद्यार्थिनींनी रशियनमधून स्वागतगीत सादर केले. यावेळी विदेशी भाषा अधिविभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अनिल घुले यांच्यासह कार्निव्हलच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्नेहल शेट्ये, प्रियांका माळकर, ज्योती पाटील, गीतांजली शहा, स्नेहा वझे आणि ऐश्वर्या चव्हाण यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवात उद्या सांस्कृतिक कार्यक्रम

विदेशी भाषा कार्निव्हलअंतर्गत उद्या (दि. ६) सायंकाळी ४ वाजता वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात विविध देशांच्या कलांचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा रसिकांनी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पानसरे यांनी केले आहे.

Tuesday, 4 February 2025

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी

डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयक

 

डॉ. प्रल्हाद माने


कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड झाली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव शरद द्विवेदी यांनी त्यांना निवडीचे पत्र पाठविले आहे.

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजावीत, संसदीप कामकाजाची माहिती तरुणांना व्हावी आणि त्यांच्यात नेतृत्व विकास व्हावा, या हेतूने संसदीय कार्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा स्पर्धेचे १७ वे वर्ष आहे.

स्पर्धेच्या मूल्यमापनासाठी सहभागी विद्यापीठांचे एकूण आठ प्रादेशिक गटांत विभाजन करण्यात येते. तेथे आठ समूह समन्वयकांची नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार डॉ. प्रल्हाद माने यांच्याकडे चार राज्यांतील एकूण सात विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या मूल्यमापनाची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी केंद्रीय विद्यापीठ, पाटणा (बिहार) येथील चाणक्य राष्ट्रीय विधी विद्यापीठ, गुजरातमधील बी. जे. वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) (वल्लभ विद्यानगर, आणंद), गोपीचंदजी महिला कला महाविद्यालय (सिओर) आणि गोपीचंदजी महिला वाणिज्य महाविद्यालय (सिओर) तसेच महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (वर्धा) या ठिकाणी डॉ. माने परीक्षक आणि समूह समन्वयक म्हणून भेट देऊन युवा संसद स्पर्धेचे मूल्यमापन करतील.

डॉ. माने यांनी १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या युवा संसद स्पर्धेचे परीक्षक आणि समूह समन्वयक म्हणून संसदीय कार्य मंत्रालयामार्फत काम केले आहे. डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ संघाने या स्पर्धेत दोन वेळा राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून पारितोषिके पटकावली आहेत. डॉ. माने विद्यापीठाच्या नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक आणि विद्यार्थी वसतिगृहाचे मुख्य अधीक्षक म्हणूनही काम पाहतात. विद्यापीठाच्या विविध समित्यांसह महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये समाजशास्त्र अभ्यास समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.

सामाजिक शास्त्र संशोधनाबाबत कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

 

शिवाजी विद्यापीठात संशोधन पद्धतीबाबत आयोजित कार्यशाळेत बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. मंचावर (डावीकडून) डॉ. संतोष सुतार, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. कविता वड्राळे

शिवाजी विद्यापीठात संशोधन पद्धतीबाबत आयोजित कार्यशाळेत बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख.

शिवाजी विद्यापीठात संशोधन पद्धतीबाबत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. सोबत डॉ. प्रल्हाद माने,डॉ. संतोष सुतार, डॉ. प्रतिमा पवार,डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. कविता वड्राळे.


कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: सामाजिक शास्त्रांतील संशोधकांनी आपले संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी काल (दि. ३) केले.

शिवाजी विद्यापीठातील सामाजिक शास्त्रांतर्गत “संशोधन पद्धतीशास्त्राचे सामाजिक शास्त्रांतील महत्व” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा काल झाली. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. कार्यशाळेला विद्यापीठातील संशोधकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

डॉ. देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधनासाठीच्या पद्धतींविषयी सविस्तर विश्लेषण केले. त्यानंतर पहिल्या सत्रात डॉ. कविता वड्राळे यांनी संशोधनामधील नितीमत्ता, वाङ्मयचौर्य आणि संदर्भ पद्धती यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. संतोष सुतार यांनी  सामाजिक शास्त्रांसाठी सांख्यिकीय तंत्राविषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात डॉ. टी. व्ही. शर्मा यांनी सामाजिक संशोधनातील टप्पे विषद केले. समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यशाळेस डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुखदेव उंदरे यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नेहा वाडेकर, डॉ. मयूरेश पाटील, आकाश ब्राम्हणे, डॉ. दादा ननवरे, डॉ. दिग्विजय पाटील आदींनी संयोजन केले.

Monday, 3 February 2025

बी.आर. खेडकर शिल्पकला कार्यशाळेला

शिवाजी विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

 आबालवृद्धांकडून ४८ शिल्पाकृतींची निर्मिती; यश कुंभार याला प्रथम पारितोषिक

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के, संजीव संकपाळ आणि डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्यासमवेत शिल्पकला कार्यशाळेतील पारितोषिक विजेते


शिवाजी विद्यापीठात आयोजित शिल्पकला कार्यशाळेत सहभागींना प्रात्यक्षिक दाखविताना शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शिल्पकला कार्यशाळेत सहभागींनी तयार केलेल्या शिल्पाकृतींची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के, डॉ. विनोद ठाकूरदेसाई आदी.   


शिवाजी विद्यापीठात आयोजित शिल्पकला कार्यशाळेत सहभागी कलाकार आपल्या शिल्पाकृती घडविताना

शिवाजी विद्यापीठात आयोजित शिल्पकला कार्यशाळेत सहभागी कलाकार आपल्या शिल्पाकृती घडविताना


शिवाजी विद्यापीठात आयोजित शिल्पकला कार्यशाळेत सहभागी कलाकार शिल्पाकृती घडविताना


(शिल्पकला कार्यशाळेची लघुचित्रफीत)





कोल्हापूर, दि. ३ फेब्रुवारी: शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४८ शिल्पकारांनी आजच्या कार्यशाळेत आपल्या शिल्पाकृती तयार करून सादर केल्या. यामध्ये यश कुंभार याच्या शिल्पाकृतीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट कला स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये काही हौशी, काही शिकाऊ आणि काही तयार अशा ४८ शिल्पकारांनी सहभाग घेतला. सहावीच्या विद्यार्थ्यापासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत व्यक्तींचा सहभाग हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले. काहींनी तर प्रथमच हातात माती घेऊन तिला आकार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बी.आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि शिल्पकार संजीव संकपाळ यांनी सुरवातीला सहभागींना शिल्प कसे तयार करावयाचे याची प्रात्यक्षिके दाखविली. त्यानंतर सहभागींनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार विविध शिल्पे साकारली. त्यामध्ये बी.आर. खेडकर यांना आदरांजलीपर अशीही काही शिल्पे तयार करण्यात आली. भित्तीशिल्पे, मूर्ती, लाईव्ह मूर्ती, संकल्पशिल्पे अशा अनेक प्रकारच्या शिल्पाकृती कलाकारांनी तयार केल्या.

सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये यश कुंभार याने प्रथम, दर्शन मिस्त्री याने द्वितीय आणि रोहन कुंभार याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना अनुक्रमे रु. २०००, रु. १००० आणि रु. ५०० रोख आणि प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याखेरीज, रोहित बावडेकर, अभिनंदन कुंभार आणि मन्वित कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. शिल्पकार संजीव संकपाळ, कलाकार बबन माने आणि स्वतः सीमा खेडकर-शिर्के यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सकाळच्या सत्रात बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शिल्पकार खेडकर यांचा आदर्श घेऊन नवोदित शिल्पकारांमध्ये जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत करण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा यावेळी डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. कार्यशाळेत कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, कणकवली, छत्रपती संभाजीनगर, निपाणी येथील ४८ कलाकारांनी सहभाग घेतला.

संध्याकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कार्यशाळेत सहभागी कलाकारांनी तयार केलेल्या प्रत्येक शिल्पाकृतीची पाहणी करून त्याविषयी आणि कलाकारांविषयीही जाणून घेतले. येथून पुढे दरवर्षी अशा प्रकारची कार्यशाळा विद्यापीठात आयोजित करण्यात यावी आणि तिचे राष्ट्रीय कार्यशाळेत रुपांतर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन तृप्ती पुरेकर यांनी केले, तर संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी बबन माने, दीपक बीडकर यांच्यासह बी.आर. खेडकर यांच्या कन्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी परिश्रम घेतले.






अहिल्यादेवी होळकर सत्त्वशील राजकारणी: विनया खडपेकर

 

शिवाजी विद्यापीठात 'शोध होळकरशाहीचा' या कार्यशाळेत बीजभाषण करताना ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. देवीदास पोटे आदी.

शिवाजी विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी आयोजित प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कार्यशाळेस उपस्थित शिक्षक व मान्यवर

('शोध होळकरशाहीचा' कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ३ फेब्रुवारी: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षानिमित्त शोध होळकरशाहीचा या विषयावर आज एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. इतिहास अधिविभाग सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

विनया खडपेकर म्हणाल्या, अहिल्यादेवी यांनी होळकरशाहीचा कारभार राणी म्हणून नव्हे, तर विश्वस्त म्हणून सांभाळला. धार्मिक आणि सत्त्वशील राजकारणी म्हणून त्यांनी सर्वदूर लौकिक प्राप्त केला. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही त्या अत्यंत काटेकोर आणि चोख होत्या. त्या काळी पतीमाघारी वारसाअभावी राजकारभार चालविण्यासाठी दत्तकविधान करून त्याच्या नावे कारभार चालविण्याची प्रथा होती. तथापि, मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी माधवराव पेशव्यांकडे थेट कारभाराच्या अधिकाराची मागणी केली. त्यामुळे माधवरावांनी अहिल्यादेवींकडे मुलकी तर तुकोजी होळकरांकडे फौजी अधिकार सुपूर्द केले. हे अहिल्यादेवींच्या राजकारणाचे फलित होते. त्याचप्रमाणे युद्धासाठी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी पैशांची मागणी केली असता ती स्पष्टपणे नाकारून युद्धासाठीचा पैसा हा तुमचा तुम्हीच मिळवावा, असे बाणेदारपणे सांगण्यातून आर्थिक व्यवहार सजगता दिसून येते. अहिल्यादेवींचा कालखंड हा होळकरशाहीचा लौकिक वृद्धिंगत करणारा ठरला, असेही त्या म्हणाल्या.

पूर्वी इतिहासलेखन हे केवळ युद्धांविषयीचेच होते आणि अहिल्यादेवी या युद्धात नव्हत्या. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या कर्तृत्वाबद्दलही लिहीण्याचा इतिहास नव्हता. त्यामुळे अहिल्यादेवींविषयी इतिहासात खूपच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यांच्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी अस्सल साधनांचा खूप शोध घ्यावा लागल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, नेतृत्वविकास गुण आणि त्यांच्या जीवनकार्यातील विविध अलक्षित पैलू यांच्या अनुषंगाने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा संशोधकांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अहिल्यादेवी यांच्याविषयी जर काही संदर्भसाहित्य स्वामित्वहक्काबाहेर असतील, तर असे साहित्य संशोधकांच्या व्यापक उपयोगासाठी अध्यासनाने या त्रिशताब्दी जयंती वर्षात हाती घ्यावा. विनया खडपेकर यांच्या भाषणाची पुस्तिका तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कार्यक्रमात मंचावर डॉ. विनिता तेलंग, डॉ. देवीदास पोटे होते. अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दत्तात्रय घोटुगडे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अवनीश पाटील, डॉ. गोविंद कोळेकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. दत्तात्रय मचाले यांच्यासह मराठी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचे शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

विशेष प्रदर्शनाचे आयोजन

या कार्यशाळेच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अहिल्यादेवींच्या जीवनकार्याविषयीची चित्रे, माहितीफलक, नाणी, शस्त्रे, वस्तू, दुर्मिळ पुस्तके, स्मरणिका आदींचा समावेश होता. या प्रदर्शनाची कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पाहणी केली आणि आयोजकांकडून त्याविषयी माहिती घेतली.

Saturday, 1 February 2025

शरण साहित्य हा मानवतेचा खजिना: डॉ. अरविंद जत्ती

 शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाचे उद्घाटन; शरण इतिहासाचे नवे सुवर्णपान

शिवाजी विद्यापीठात डॉ. अरविंद जत्ती आणि डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते शरण साहित्य पुस्तकांची टोपली कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना प्रदान करून  शरण साहित्य अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. तृप्ती करेकट्टी



शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन कार्यारंभ कार्यक्रमात बोलताना डॉ. अरविंद जत्ती 

शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन कार्यारंभ कार्यक्रमात बोलताना डॉ. अरविंद जत्ती. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू आणि डॉ. तृप्ती करेकट्टी.

शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन कार्यारंभ कार्यक्रमात बोलताना डॉ. बसवलिंग पट्टदेवरू. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. अरविंद जत्ती आणि डॉ. तृप्ती करेकट्टी.

शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन कार्यारंभ कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अरविंद जत्ती, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू आणि डॉ. तृप्ती करेकट्टी.


(शरण साहित्य अध्यासन कार्यारंभ: लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १ फेब्रुवारी: महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना आहे. त्यामुळे शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठात शरण इतिहासाचे एक नवे सुवर्णपान लिहीले जात आहे, असे गौरवोद्गार बेंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठात आज शरण साहित्य अध्यासनाचा कार्यारंभ करण्यात आला. या निमित्ताने शरण साहित्य: संकल्पना आणि प्रासंगिकता या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. बसवकल्याणच्या अनुभवमंटपाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

शरण साहित्य अध्यासनाच्या उद्घाटन समारंभाला मानव्यविद्या सभागृहात कोल्हापूरसह गडहिंग्लज, शिरोळ, जत, हेरवाड, बेळगाव, भालकी, इस्लामपूर, सोलापूर, पुणे इत्यादी ठिकाणांहून बसवप्रेमी नागरिक, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अरविंद जत्ती म्हणाले, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव लाभलेले शिवाजी विद्यापीठ आणि विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार यांचा महासंगम आज करवीरनगरीत होत आहे, अशी भावना आहे. बाराव्या शतकापासून ते एकविसावे शतक आणि येथून पुढेही जगाचे दिग्दर्शन करण्याची क्षमता शरण साहित्यामध्ये आहे. शरण साहित्याला धार्मिक समजणे गैर असून ते मूलतः आध्यात्मिक आहे, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. इतिहासापासून सार्वजनिक प्रशासन व्यवस्थेपर्यंत आणि सामाजिक न्यायापासून ते पर्यावरणापर्यंत अशा अनेकविध विषयांचा परामर्श शरण साहित्याने घेतलेला असून तो आजही पथदर्शी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवाधिकारांचा जाहीरनामा असो की, भारताचे संविधान या दोहोंमध्ये ज्या मानवी मूल्यांचा उच्चार आहे, ते सर्व शरण साहित्यात आहे. प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, गुलामगिरी आणि छळाविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार या सर्वच मानवी अधिकारांचे उच्चारण बसव तत्त्वज्ञानात आहे. विश्वात जे आहे, तेच तुमच्या माझ्या आत आहे, असे आत्यंतिक दर्शन घडविणारे शरण साहित्य अमूल्य आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात राजकीय मतभेद असले तरी ही दोन राज्ये आता बसवण्णांच्या अध्यात्मिक साहित्याने जोडले जात आहेत. भविष्यात हे बंध अधिकच दृढ होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आजघडीला बसव वचने भारतीय ४३ भाषांमध्ये डिजीटल स्वरुपात उपलब्ध केली आहेत. जागतिक भाषांमध्येही त्यांच्या अनुवादाचे प्रकल्प विचाराधीन आहेत. शिवाजी विद्यापीठाने वचनांचे रशियन भाषेत अनुवाद करण्यास सहाय्य करावे, अशी अपेक्षा जत्ती यांनी व्यक्त केली. आपले वडील भारताचे माजी उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांचे पदवीचे शिक्षण कोल्हापुरात झाले, अशी आठवणही यावेळी जत्ती यांनी सांगितली. बसव तत्त्वज्ञानाची वैश्विकता विषद करणारे पॉवरपॉईंट सादरीकरण त्यांनी केले.

बसवकल्याण अनुभवमंटपाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनीही आपण शिवाजी विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, गणितातील तथ्ये ज्याप्रमाणे वैश्विक असतात, त्याचप्रमाणे बसवतत्त्वही वैश्विक आहे. सत्याची ताकद त्यामध्ये आहे. बाराव्या शतकात हजारो शरणांनी प्राणार्पण करून पुरोहितशाही आणि जातीयवादी प्रवृत्तींपासून शरण साहित्याचे संरक्षण व जतन केले. त्या शरणांच्या बलिदानाचे फलितस्वरुप आज शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने साकार होत आहे. युवा वर्गात आत्मविश्वास, नैतिकता, जीवनमूल्यांप्रती निष्ठा निर्माण होऊन त्यांच्यात सर्वांगीण विकासाचे आत्मबल निर्माण होण्यासाठी शरणसाहित्याच्या अमृताचे थेंब उपयुक्त ठरतील. बसवण्णांचा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक समतेचा विचार हाच फुले, शाहू, आंबेडकरांचाही होता. या खऱ्या बसवतत्त्वांचा प्रसार, प्रचार करण्यासाठी अध्यासन मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा संगम समजून घेऊन अहंभाव संपविण्यासाठी बसवतत्त्वांचा अभ्यास आणि आचरण आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा या विषयांतर्गत आपल्याला बसवण्णांसारख्या महामानवांचा अभ्यास करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी यांनी अधिसभेत ठरावाच्या माध्यमातून अध्यासनाचे बीजारोपण केले. त्याला अधिसभेसह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या सर्वच अधिकार मंडळांचे समर्थन लाभले. शासन, लोकप्रतिनिधी आणि दातृत्ववान समाज यांच्या पाठबळावर अध्यासन कार्यान्वित होत आहे. समग्र मानवतेच्या प्रस्थापनेसाठी अध्यासनाचे काम योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी यापुढील काळातही हा पाठिंबा कायम राहावा. येत्या जून २०२५पासून अध्यासनामार्फत महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर दोन क्रेडिटचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे कर्नाटकातील विविध विद्यापीठांतील शरण साहित्य अध्यासनांसमवेत सामंजस्य करार करण्यात येतील. तसेच, रशियन भाषेत सुरवातीला काही वचनांचे प्रायोगिक अनुवाद करून पुढे टप्प्याटप्प्याने प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सुरवातीला डॉ. अरविंद जत्ती, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते शरण साहित्याची मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड भाषांतील १५ पुस्तके असलेली टोपली कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करून अध्यासनाचे अभिनव पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी काही संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यासनासाठी देणगीचे धनादेशही कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमास प्राचार्य जी.पी. माळी, डी.यू. पवार, सतीश घाळी, सरलाताई पाटील, डॉ. आप्पासाहेब पुजारी, प्राचार्य टी.एस. पाटील, वसंतराव मुळीक, रावसाहेब पुजारी, यश आंबोळे, डॉ. अनमोल कोठडिया यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 31 January 2025

पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत

शिवाजी विद्यापीठाला तीन पारितोषिके

कृषी रोबोट, धरण आपत्ती सूचना प्रणाली प्रथम; आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेसाठी निवड

 

नवी मुंबई येथे झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत सहभागी झालेला शिवाजी विद्यापीठाचा संघ डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि डॉ. नेहा जोशी यांच्यासमवेत.

नवी मुंबई येथे झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेतील शिवाजी विद्यापीठाचे विजेते संशोधक विद्यार्थी एआययूचे संचालक डॉ. अमरेंद्र पाणी, डॉ. एम.डी. पाटील, डॉ. नेहा जोशी, डॉ. मानसिंगराज निंबाळकर आदींसमवेत.



कोल्हापूर, दि. ३१ जानेवारी: नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये स्थान प्राप्त केले आहे.

नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ३० व ३१ जानेवारी अशी दोनदिवसीय पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५ पार पडली. आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या दोन गटांत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक आणि मूलभूत विज्ञान गटात तृतीय क्रमांक मिळविला.

कृषी व संलग्न क्षेत्रे या गटात विघ्नेश उत्तम पाटील, ताहीर निसार मुल्ला आणि दीक्षा निवास घोसरवाडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांनी शेती व्यवस्थापनासह जनावरांची देखभाल करणारा कृषी रोबोटसादर केला. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटात शुभम गिरीगोसावी, बालाजी प्रकाश पाटील आणि रोहित गणपती गवळी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. धरणाच्या भिंतीला धोका झाल्यास संभाव्य जीव व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणालीचे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केले. मूलभूत विज्ञान गटात सुषमा राजीव देशमुख व अनुष्का रॉय यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांनी दुर्मिळ वनस्पती घटकांपासून औषध निर्मितीचा प्रकल्प सादर केला. विजेत्यांना भारतीय विद्यापीठ महासंघाच्या (ए.आय.यू.) संशोधन विभागाचे संचालक डॉ. अमरेंद्र पाणी यांच्या हस्ते आणि रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम.डी. पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संशोधकांना त्यांचे प्रकल्प आता मार्चमध्ये अंबाला येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 

स्पर्धेच्या सामाजिक विज्ञान व मानव्यशास्त्रे, आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे, मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व संलग्न क्षेत्रे आणि आंतरविद्याशाखीय संशोधन या सहा संशोधन गटांमध्ये विद्यापीठाचा १४ जणांचा संघ सहभागी झाला. संघ व्यवस्थापक म्हणून विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या डॉ. नेहा जोशी यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेत्यांसह सहभागी संशोधक विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह आविष्कार समन्वयक डॉ. डी. एच. दगडे, जीवरसायनशास्त्र अधिविभागाचे डॉ. पी. के. पवार आणि विलिंग्डन महाविद्यालयाचे डॉ. एस. डी. जाधव यांनी अभिनंदन केले आहे.