डॉ. प्रल्हाद माने |
कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील
डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत १७ व्या
राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड
झाली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव शरद द्विवेदी यांनी त्यांना निवडीचे
पत्र पाठविले आहे.
देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची
मूल्ये रुजावीत, संसदीप कामकाजाची माहिती तरुणांना व्हावी आणि त्यांच्यात नेतृत्व
विकास व्हावा, या हेतूने संसदीय कार्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा
आयोजित करण्यात येते. यंदा स्पर्धेचे १७ वे वर्ष आहे.
स्पर्धेच्या मूल्यमापनासाठी सहभागी विद्यापीठांचे एकूण आठ प्रादेशिक
गटांत विभाजन करण्यात येते. तेथे आठ समूह समन्वयकांची नियुक्ती करण्यात येते.
त्यानुसार डॉ. प्रल्हाद माने यांच्याकडे चार राज्यांतील एकूण सात विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या
मूल्यमापनाची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील इंदिरा गांधी
राष्ट्रीय आदिवासी केंद्रीय विद्यापीठ, पाटणा (बिहार) येथील चाणक्य राष्ट्रीय विधी
विद्यापीठ, गुजरातमधील बी. जे. वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) (वल्लभ विद्यानगर,
आणंद), गोपीचंदजी महिला कला महाविद्यालय (सिओर) आणि गोपीचंदजी महिला वाणिज्य महाविद्यालय
(सिओर) तसेच महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
हिंदी विश्वविद्यालय (वर्धा) या ठिकाणी डॉ. माने परीक्षक आणि समूह समन्वयक म्हणून
भेट देऊन युवा संसद स्पर्धेचे मूल्यमापन करतील.
डॉ. माने यांनी १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या युवा संसद स्पर्धेचे
परीक्षक आणि समूह समन्वयक म्हणून संसदीय कार्य मंत्रालयामार्फत काम केले आहे. डॉ.
माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ संघाने या स्पर्धेत दोन वेळा
राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून पारितोषिके पटकावली आहेत. डॉ.
माने विद्यापीठाच्या नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक आणि विद्यार्थी वसतिगृहाचे
मुख्य अधीक्षक म्हणूनही काम पाहतात. विद्यापीठाच्या विविध समित्यांसह महाराष्ट्र
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये समाजशास्त्र अभ्यास समितीचे अध्यक्ष म्हणूनही
ते जबाबदारी सांभाळत आहेत.
No comments:
Post a Comment