![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीराम पवार. |
![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीराम पवार. मंचावर डॉ. प्रल्हाद माने आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे |
कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: पंडित जवाहरलाल नेहरू
यांचे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामधील योगदान फार मोलाचे आहे. त्यांच्या
विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे भारत स्वयंपूर्ण बनला, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार,
संपादक डॉ. श्रीराम पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानाप्रसंगी ते बोलत
होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास
शिंदे होते.
डॉ.पवार म्हणाले, नेहरूंना समजून घेणे म्हणजे
आधुनिक भारत समजून घेणे आहे. नेहरूंनी भाक्रा-नानगल धरण प्रकल्प, आय.आय.टी सारख्या शिक्षण संस्था, परमाणू ऊर्जा आयोग
आणि इस्रोसारख्या संस्थांची पायाभरणी करून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान
क्षेत्राचा विकास केला. कृषी, उद्योग आणि अंतराळ क्षेत्रातील
त्यांचे द्रष्टेपण हे भारताच्या आधुनिकतेला नवे परिमाण प्राप्त करून देणारे ठरले. नेहरूंनी
शस्त्रास्त्र स्पर्धेपेक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाच्या
स्वयंपूर्णतेवर भर दिला. त्यांच्या धोरणांमुळे भारत विज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर
बनला.
डॅा.पवार यांनी नेहरूंच्या तुरुंगवासातील चिंतन, लेखन
आणि विज्ञानवादी विचारसरणीवर देखील प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, भारताच्या
जैवविविधतेचे, वनस्पतींच्या जातींच्या सर्वेक्षणाचे धोरण नेहरूंनी
आखले होते. भारताच्या कृषी जगताला वेगळी ओळख देवून हे राष्ट्र सुजलाम - सुफलाम
बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. अणुऊर्जा, अंतराळ
अभ्यास क्षेत्रामध्ये भारत सरस ठरण्यापाठीमागे नेहरुंचे कार्य कारणीभूत आहे.
कार्यक्रमाला डॅा.जगन कराडे यांच्यासह शिक्षक, संशोधक
विद्यार्थी उपस्थित होते. नेहरु अभ्यास केंद्राचे समन्वयक डॅा.प्रल्हाद माने यांनी
प्रास्ताविक केले. मतीन शेख यांनी सूत्रसंचालन केले. सुहास रोमणे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment