शिवाजी विद्यापीठात ‘डॉ. अॅड. कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिके’चे उद्घाटन
![]() |
शिवाजी विद्यापीठात साकारलेली ‘डॉ. अॅड. कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिके’ची इमारत. |
![]() |
शिवाजी विद्यापीठात ‘डॉ. अॅड. कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिके’च्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. रामचंद्र पणदूरकर, सौ. हेमकिरण पणदूरकर यांच्यासह मान्यवर |
कोल्हापूर, दि. १७ फेब्रुवारी: वेदनेच्या हुंकारावर
दातृत्वाच्या फुंकरीने सृजनाचा अंकुर फुलल्याचे दृष्य आज शिवाजी विद्यापीठात ‘डॉ. अॅड. कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिके’च्या उद्घाटन
समारंभाच्या निमित्ताने उपस्थितांना अनुभवता आले आणि नकळत डोळ्यांच्या कडा
ओलावल्या.
शिवाजी विद्यापीठाचे
निवृत्त भूगोल अधिविभाग प्रमुख व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. (अॅड.) रामचंद्र पणदूरकर व
त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी त्यांची एकमेव दिवंगत कन्या डॉ. (अॅड.) रूपाली
पणदूरकर यांच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठास
दोन टप्प्यांमध्ये ६० लाख रुपयांचा निधी दिला. त्या निधीमधून ‘कमवा व शिका’ योजनेतील
विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात दुमजली अभ्यासिका इमारत उभारण्यात आली आहे. या
इमारतीचे उद्घाटन आज हेमकिरण पणदूरकर यांच्या हस्ते कोनशिला अनावरण आणि इमारतीच्या
प्रवेशद्वारावरील फीत कापून करण्यात आले. लाडक्या लेकीच्या आठवणींचे दुःखाश्रू एका
डोळ्यात आणि तिच्या स्मृती चिरंजीव करणारी अभ्यासिका इमारत साकारल्याचे आनंदाश्रू
दुसऱ्या डोळ्यात, अशी या आईबापाची अवस्था पाहून सारेच उपस्थित हेलावून गेले.
यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित
होते.
डॉ. पणदूरकर यांनी डॉ. रुपाली यांच्या
आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला. ते म्हणाले, रुपालीचे बालपण विद्यापीठातच गेले.
आम्ही दोघेही बापलेक या विद्यापीठाचेच विद्यार्थी आहोत. ज्या कन्झुमर स्टोअरमध्ये
ती लहानपणी चॉकलेट घेण्यासाठी येत असे, त्याच्या शेजारी अभ्यासिकेच्या रुपाने तिचे
स्मारक उभे राहात आहे. या प्रसंगी ‘इदं न मम्’ अशी धन्य झाल्याची भावना मनी दाटली आहे. येथे उपस्थित असणाऱ्या मुलींच्या डोळ्यांत
मला ती दिसते आहे. या मुली अभ्यासिकेत अभ्यास करून मोठ्या होतील, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, शिवाजी विद्यापीठात
विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका नव्हती. तसेच वसतिगृहामध्ये त्यांना विहीत
वेळेत परत येणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन कमवा व शिका वसतिगृहाच्या
सुरक्षित परिसरातील या अभ्यासिकेमुळे विद्यार्थिनींची मोठी सोय झाली आहे. मुख्य
विद्यार्थिनी वसतिगृह आणि ‘कमवा व शिका’ विद्यार्थिनी वसतिगृह
जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यामुळे दोन्हीकडील विद्यार्थिनींना या
अभ्यासिकेचा लाभ घेणे सोयीचे होईल.
यावेळी ‘कमवा व शिका’ योजनेतून अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत यश मिळविणाऱ्या
राधिका जवळे या विद्यार्थिनीचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. तिच्यासह काही विद्यार्थिनींनी या अभ्यासिकेच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त
करून पणदूरकर दांपत्य आणि विद्यापीठ प्रशासनाला धन्यवाद दिले. यावेळी इमारतीच्या
कामाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे महेश साळुंखे, रवी पाटील, संतोष शेखर आणि
सुरेश जगताप यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी
फिरुन इमारतीची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. वसतिगृह अधीक्षक डॉ. माधुरी
वाळवेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीपक भादले यांनी सूत्रसंचालन केले, तर
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे
संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, आजीवन अध्ययन
केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, व्यवस्थापन
परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, क्रीडा संचालक डॉ. शरद
बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ.
सचिनकुमार पाटील, भूगोल अधिविभागाचे डॉ. संभाजी शिंदे, डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. गिरीश कुलकर्णी, उपकुलसचिव
रणजीत यादव, विजय पोवार, विद्युत उपअभियंता अमित कांबळे, शिवकुमार
ध्याडे, वैभव आरडेकर यांच्यासह डॉ. पणदूरकर यांचे विद्यार्थी,
सहकारी, स्नेही आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका वर्षात
दुमजली अभ्यासिका साकार
डॉ. (अॅड.) कै. रुपाली
पणदूरकर अभ्यासिका इमारतीमध्ये तळमजला आणि पहिला मजला असे एकूण ३८५० चौरस फुटांचे दुमजली
बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण ३०० विद्यार्थिनींची अभ्यासाला बसण्याची
सोय झाली आहे. अरिहंत कन्स्ट्रक्शन या कंपनीने काम केले आहे. पुढे आवश्यकतेनुसार
आणखी दोन मजले वाढविता येतील, अशा पद्धतीचे बांधकाम आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारी
रोजी इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले होते. अवघ्या वर्षभरात दर्जेदार इमारत साकार
केल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह पणदूरकर दांपत्याने समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment