शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद
![]() |
शिवाजी विद्यापीठात लावणी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनीसमवेत नृत्यात सहभागी झालेले पोलंडचे युवक-युवती |
![]() |
शिवाजी विद्यापीठात भारतीय नृत्याविष्कार पाहण्यात आणि त्यांच्या स्मृती छायाचित्रांकित करण्यात रमलेले पोलंडचे विद्यार्थी |
![]() |
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाचे यूथ ऑफिसर समंतकुमार यादव, डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह पोलंडचे युवा शिष्टमंडळ |
कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी: महाराष्ट्राचा लावणी हा नृत्यप्रकार पाहण्यास जितका सोपा, सादरीकरणास मात्र तितकाच अवघड. त्यातली नजाकत, अदाकारी, ठेका हे सारेच वेगळे. मात्र, पोलंडच्या युवक, युवतींनी मात्र शिवाजी विद्यापीठाच्या युवा कलाकारांसमवेत लावणी नृत्यात घेतलेला सहभाग पाहून सारेच चकित झाले आणि आनंदलेही. या सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
पोलंड या देशाचे युवा
शिष्टमंडळ सध्या भारताच्या शैक्षणिक-सांस्कृतिक दौऱ्यावर आहे. वळिवडेसह कोल्हापूर
परिसरातील आपल्या पूर्वजांच्या स्मृती जागविण्यासाठी, त्यांच्याप्रती आदरांजली
वाहण्यासाठी पोलंडच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांसह नागरिक अतिशय भावनापूर्ण आत्मियतेने
येथे येत असतात. यंदाही २१ युवक-युवतींचे शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये आले असून
त्यांनी या भेटीअंतर्गत काल (दि. २४) शिवाजी विद्यापीठास भेट देऊन राष्ट्रीय सेवा योजनेसह विविध
अधिविभागांतील विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला.
राजर्षी शाहू सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने काही सांस्कृतिक
कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी एक विद्यार्थिनी लावणी नृत्य सादर करीत
असताना शिष्टमंडळातील काही कलाकार तिच्या नृत्यात सामील झाले. तिच्याप्रमाणे लावणी
करण्याचा त्यांनी अत्यंत यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या या सहनृत्याविष्काराने
सर्वच उपस्थितांची मने त्यांनी जिंकून घेतली.
‘भारत-पोलंडमध्ये
सांस्कृतिक साम्य’
यावेळी उपस्थित भारतीय
विद्यार्थ्यांशी शिष्टमंडळातील तरुणाईने आत्मियतेने संवाद साधला. पोलंडचे भारताशी भावनिक
नाते असून या दोन्ही देशांत बरेचसे सांस्कृतिक साम्य आहे. या दोन्ही देशांमधील राजकीय,
सामाजिक संबंध अत्यंत दृढ स्वरुपाचे आहेत. पाहुण्यांप्रतीची आतिथ्यशीलता हेही फार
महत्त्वाचे साम्यस्थळ असल्याचे शिष्टमंडळातील युवकांनी सांगितले. पोलंडमध्ये हिंदी
चित्रपट आवडीने पाहिले जातात आणि अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि सलमान खान हे तेथील
तरुणाईतही लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळातील काही विद्यार्थी
हिंदी आणि संस्कृतही शिकत असून त्यांनी काही संस्कृत श्लोकही यावेळी सादर केले.
या संवादानंतर
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही
शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे यूथ ऑफिसर सुमंतकुमार
यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सहाय्यक कक्ष अधिकारी कपिल कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोहित
आनंद, भरत चव्हाण उपस्थित होते. पोलंडच्या शिष्टमंडळात हेलेना
कॅटरझिना, सँड्रा सॅनियर, पिटर डॅनिकी, मिया स्प्लिट, ओलीविया कोलासा, जाकूब सेरेडेनस्की, अन्टोनी
सेरेडेनस्की, वॅरोनिका वॅलूपिक, वॅरोनिका ड्रोड, कॉन्स्टॅन्टी
क्सूबिकी, डॉमिनिकी गिझीकी, पॅटरिझा चोडोरोवॉस्का आदींचा
समावेश होता. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार
मानले.
No comments:
Post a Comment