कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: जीवनातील, मानवी
वर्तनातील विसंगतीमधून विनोदाची निर्मिती होते. ही विसंगती नेमकेपणाने टिपणे हे
चांगल्या विनोदी लेखकाचे लक्षण असते, असे लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर
यांनी आज सांगितले.
शिवाजी विद्यापीठामध्ये
सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी आलेल्या
स्वयंसेवकांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. लेखक, अभिनेते प्रथमेश शिवलकर, रोहित माने
यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक सुनील नारकर यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूरला अनेकदा आलो,
पण यावेळी प्रथमच शिवाजी विद्यापीठात येत असल्याचा मोठा आनंद असल्याचे सांगून अभिनेते
खांडेकर म्हणाले, चांगल्या विनोदनिर्मितीसाठी लेखक आणि अभिनेत्याकडे उत्तम
निरीक्षणकला असावी लागते. त्यामधून माणसांचे वागणे, बोलणे, त्यांच्या लकबी
इत्यादींचे त्याला ज्ञान होते. महत्त्वाचे म्हणजे या वागण्या-बोलण्यातली विसंगती
टिपता आली पाहिजे. त्यातूनच चांगल्या विनोदाची निर्मिती होण्याची शक्यता वाढते. ते
लेखनामध्ये उतरले की अभिनेत्यांनाही त्यावर काम करणे शक्य होते.
अभिनेते प्रथमेश शिवलकर
म्हणाले, मी स्वतः विद्यार्थी जीवनात पाच वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक
होतो. अनेक राष्ट्रीय एकात्मता शिबिरांतही सहभागी झालो आहे. या शिबिरांनी
माझ्यामध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण केला. त्या बळावरच माझी अभिनय क्षेत्रातली
वाटचाल सुरू आहे.
निर्माते-दिग्दर्शक
सुनील नारकर म्हणाले, सुमारे ३८ वर्षे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहिल्यानंतर
आपण आपल्या मायभूमीचे, अभिजात मराठी भाषेचे काही देणे लागतो, या भावनेतून देशात
परतलो असून त्या भावनेतून येथे चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
अध्यक्षीय मनोगतात
कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, आपल्या हास्यमालिकेतील अनेक प्रहसनांमधून
जीवनातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचे काम ही सर्व अभिनेते मंडळी करीत
आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर काम करून श्रमलेल्यांना दोन घटका विरंगुळा देण्याचे फार
महत्त्वाचे कामही त्यांच्या हातून होत आहे. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा ऋणी
आहे.
यावेळी संचालक डॉ.
तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय
शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जी.के. कीर्दत यांनी आभार मानले. यावेळी केंद्रीय
युवा मंत्रालयाचे यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव यांच्यासह एन.एस.एस.चे विविध
राज्यांतील कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment