Saturday, 8 February 2025

विद्यापीठांच्या सशक्तीकरणाबाबत राज्य शासन गंभीर: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 शिवाजी विद्यापीठाचे पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन



शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी कोनशिला अनावरण करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.


शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे फीत कापून उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.



शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर पाहणी करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर पाहणी करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.



(शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाची काही छायाचित्रे)

(शिवाजी विद्यापीठ भुयारी मार्ग उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ८ फेब्रुवारी: विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सशक्तीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने काम करीत आहे, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना कायमस्वरुपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्या अनुषंगाने त्यांचे सक्षमीकरण जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यापीठांनी देशविदेशांतील विविध विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांना प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस म्हणून आमंत्रित करून त्यांच्याकडील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिवाजी विद्यापीठाने विविध परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार केले आहेत, ही चांगली बाब आहे. पुढील काळात याचे प्रमाण वृद्धिंगत करावे, असेही त्यांनी सांगितले.

‘‘कमवा व शिका योजनेचे सशक्तीकरण करावे

यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेचे अधिक सशक्तीकरण करावे, अशी सूचना केली. ते म्हणाले, सध्या या योजनेअंतर्गत काम करीत असणाऱ्या विद्यार्थिनींचे कामाचे तास आणि त्यासाठी त्यांना देण्यात येणारे शुल्कही वाढवावे. यासाठी काही खाजगी उद्योगांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू, जेणे करून योजनेतून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त साधारण अडीच हजार रुपयांचा अधिकचा निधी संबंधित विद्यार्थिनींना मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल, असे ते म्हणाले.

सिंधी, गुजराती, राजस्थानी भाषा अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव द्या

मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर परिसरात सिंधी, गुजराती, राजस्थानी बांधवही कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरीत असताना त्यांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क प्रदान केला पाहिजे. त्या दृष्टीने सुरवातीला या भाषांतील ३ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत, जेणे करून या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मातृभाषा शिक्षण घेता येऊ शकेल. शिवाजी विद्यापीठाने या भाषांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांना केली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच भुयारी मार्ग अस्तित्वात: कुलगुरू डॉ. शिर्के

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास गेले, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले. ते म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या भुयारी मार्गाच्या कामाची घोषणा केली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाच्या कारकीर्दीत त्याला आवश्यक निधीची तरतूद करून त्याच्या कामासाठी शासकीय यंत्रणांचे संपूर्ण सहकार्य मिळवून देण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असा हा मार्ग अस्तित्वात आला.

यावेळी सुरवातीला मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासह सर्वच मान्यवरांनी भुयारी मार्गाची चालत जाऊन पाहणी केली. झालेल्या कामाबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

त्यानंतर मंत्री श्री. पाटील यांनी विद्यापीठाच्या परिसरात लोकांच्या दातृत्वातून साकारत असलेल्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या कामास भेट देऊन त्याविषयी माहिती घेतली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, पुण्याच्या अॅस्टुट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रतिनिधी विनायक पारळकर, स्थापत्य कामाचे ठेकेदार रमेश भोजकर, विद्युत कामाचे ठेकेदार श्रीकांत गुजर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, राहुल चिकोडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. व्ही.एम. पाटील, स्वागत परुळेकर यांच्यासह बांधकाम समितीचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुयारी मार्गाचे काम एक वर्षात पूर्ण

गत वर्षी ३ फेब्रुवारीला भुयारी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतर वर्षभराच्या अवधीत हे काम पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये विद्यापीठ परिसराच्या पूर्व व पश्चिम बाजूचे जोड रस्ते व सेवा मार्ग आणि भुयारी मार्ग यांचा समावेश आहे. पश्चिम बाजूकडील जोड रस्त्याची लांबी १६६ मीटर इतकी तर पूर्व बाजूकडील जोड रस्त्याची लांबी २९.३२ मीटर इतकी आहे. भुयारी मार्गाची लांबी ३१.३२ मीटर असून रुंदी ८.५० मीटर आणि उंची ३ मीटर आहे. भुयारी मार्गातील वाहनमार्ग ५.५० मीटर इतका असून दोहो बाजूला १.२५ मीटरचा पदपथ आहे. पूर्व बाजूस महामार्गावरुन खाली उतरण्यासाठी जिना, पश्चिम बाजूकडील जोड रस्त्यासाठी रिटेनिंग भिंत आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आर.सी.सी. गटर आदी कामेही या अंतर्गत करण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment